महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय घर खरेदी असुरक्षित!

महारेरा नोंदणी क्रमांक नसलेल्या प्रकल्पांत गुंतवणूक करण्याचे टाळण्याचे महारेराचे गुंतवणूकदारांना आवाहन


मुंबई : महारेरा नोंदणी क्रमांक असल्यशिवाय कुठल्याही विकासकाला प्रकल्पाची कुठल्याही प्रकारची जाहिरात, त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी, विक्री, खरेदी करता येत नाही. असे असले तरी काही विकासक या नियमाकडे कानाडोळा करून महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय किंवा ‘महारेरा नोंदणीकृत’ असे फक्त लिहून सर्रास जाहिराती करीत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. महारेराने अशा सर्व प्रकल्पांवर स्वाधिकारे (सु मोटो) कारवाई सुरू केली आहे.


गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध वर्तमानपत्रांत महारेरा क्रमांकाशिवाय प्रसिद्ध होणा-या अशा जाहिरातींची महारेराने स्वाधिकारे नोंद घेऊन १४ प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. या सर्वांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या विहीत मुदतीत चुकांची दुरुस्ती करणे अपेक्षित असून, उचित प्रतिसाद न देणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


याशिवाय महारेरा नोंदणी क्रमांक असूनही काही ठिकाणी नोंदणी क्रमांकाचा उल्लेख करायचे राहत असल्याचेही महारेराच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकल्पांना याबाबत उचित काळजी घेण्याचे कळविण्यात आले आहे. नोंदणी क्रमांकाशिवाय जाहिरात करणा-यांमध्ये मुंबईलगतच्या भागातील ५, पुणे, नागपूर परिसरातील प्रत्येकी ३, नाशिक परिसरातील २ आणि औरंगाबाद परिसरातील एका विकासकांचा यात समावेश आहे.


स्थावर संपदा कायद्यानुसार ५०० स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त किंवा ८ सदनिकांचा कुठलाही प्रकल्प (यात प्लॉटचाही समावेश आहे) असल्यास त्याची महारेराकडे नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. याची नोंद आपली गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित राहावी, यासाठी घर खरेदीदारांनी घेणे आवश्यक आहे. म्हणून घरखरेदीदार आणि स्थावर संपदा क्षेत्रातील तत्सम गुंतवणूकदारांनी महारेरा नोंदणी क्रमांक नसलेल्या प्रकल्पांत गुंतवणूक करण्याचे टाळावे, असे आवाहन महारेराच्या वतीने करण्यात आले आहे.


यासाठी ग्राहकांनी प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे का? महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख दिलेली आहे का? घर खरेदीकरार महारेराने ठरवून दिलेल्या आदर्श घर खरेदी करारानुसारच आहे का? तुम्ही १० टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घर खरेदी, घर नोंदणी करीत असल्यास विकासक घर विक्री करार करतोय का? आणि ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेरांकडे नोंदणीकृत आहेत का? या सर्व बाबींची खात्री करून घ्यायला हवी. तुमची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी हे आवश्यक आहे.


प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असेल तर विकासकांना रेरा कायद्यानुसार ग्राहक हिताच्यादृष्टीने अनेक अटींची पूर्तता करावी लागते. यात त्या प्रकल्पातील गुंतवणुकीपोटी आलेला पैसा स्वतंत्र खात्यात ठेवून प्रकल्पाचे काम प्रमाणित करूनच पैसे काढता येतात. शिवाय विकासकाला दर तीन महिन्याला प्रकल्पस्थितीची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. यात प्रकल्पात काय काम चालू आहे, कसे काम चालू आहे, काम कुठपर्यंत आले आहे, या बाबी घरखरेदीदारांना घरबसल्या महारेराच्या संकेतस्थळावर पाहता येतात.


याशिवाय या सर्व प्रक्रियेत विकासकासोबत होणारा घर खरेदीकरार हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज असतो. याबाबतही महारेराने आदर्श खरेदीकरार जाहीर केलेला आहे. त्यात दैवी आपत्ती, चटई क्षेत्र दोष दायित्व कालावधी आणि प्रकल्प हस्तांतरण करार या बाबी महारेरा कायद्यानुसार आवश्यक असून, त्यात विकासकाला कुठलाही बदल करता येत नाही. याशिवाय आदर्श खरेदी करारात खरेदीदाराच्या संमतीने काही बदल करायचे असल्यास विकासक ते करू शकतात. परंतु खरेदीदाराला ते स्पष्टपणे कळावे, यासाठी ते बदल अधोरेखित करणे बंधनकारक केलेले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.