Sant Dnyaneshwar : ज्ञानदेवांची विनम्रता; आपण ती आचरिता...


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


भगवद्गीता मराठीत रूपांतरित करताना त्यातील संवादमय, नाट्यमय रचना यामुळे ज्ञानदेवांचा वाचकांवर प्रभाव अधिक पडतो. आपल्या ‘ज्ञानी’ डोळ्यांनी काही गोष्टी अचूक हेरून ते त्यातून वाचक, श्रोते यांची ज्ञानदृष्टी व्यापक करतात, विस्तारित करतात. शिवाय ज्ञानेश्वरीत वेळोवेळी दिलेल्या दाखल्यांतून त्यांची विलक्षण नम्रता दिसून येते. त्यांची ही नम्रता आपण अंशतः जरी बाणवली तरी आयुष्य सुखी होईल.


विरोधाभासातून सौंदर्य खुलवणं ही ज्ञानदेवांची खास लकब! त्याचप्रमाणे विचार स्पष्ट करताना एकामागोमाग एक अप्रतिम दाखले देणं हीसुद्धा त्यांची खासियत! हे सारं करूनही मनात अतिशय नम्र भाव!


‘महामुनी व्यासांनी भगवद्गीता या महान ग्रंथाची रचना केली. म्हणून माझ्यासारख्या पामराने त्या ग्रंथाचं मराठीत केलेलं रूपांतर अयोग्य नव्हे’ हा विचार मांडताना ज्ञानदेवांच्या रसवंतीला असा बहर येतो! त्यापैकी ही ओवी पाहूया -
‘अरुण हा सूर्याच्या जवळ आहे, म्हणून सूर्यास पाहतो आणि भूतलावरील मुंगी पाहत नाही काय?’
ओवी अशी -
अरुण आंगाजवळिके। म्हणोनि सूर्यातें देखें ।
मा, भूतळींची न देखे। मुंगी काई?॥ ओवी क्र. १७१९
‘मा’ या शब्दाचा अर्थ ‘नाही’ असा आहे.


अरुण हा सूर्याचा सारथी, आकाशात राहणारा, तेजस्वी, सूर्याच्या सन्निध (जवळ) असणारा. याउलट मुंगी ही भूतलावरील एक अतिशय लहान जीव. कुठे आकाशीचा अरुण नि कुठे एक यःकश्चित मुंगी!


अशा दोन परस्परविरोधी, पराकोटीच्या वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी! ज्ञानदेव त्या एकत्र आणतात त्यांच्या ‘ज्ञानी’ डोळ्यांनी! त्यातून वाचक, श्रोते यांची ज्ञानदृष्टी व्यापक करतात, विस्तारित करतात. ओवीच्या शेवटी येतं ‘न देखे मुंगी काई?’ मुंगी पाहत नाही काय? म्हणजेच मुंगी पाहते; परंतु अशी नकारार्थी रचना केल्यामुळे ज्ञानदेव जे सांगू पाहतात, त्याला अधिक ठसठशीतपणा येतो. वाचकांवर त्याचा प्रभाव अधिक पडतो याचं कारण त्यातील संवादमय, नाट्यमय रचना!


पुन्हा यात त्यांची विलक्षण नम्रता आहे. व्यासमुनींना ते ‘अरुण’ याची उपमा देतात. स्वतःला मुंगीची उपमा देतात, ज्ञानाचा महामेरू असूनदेखील. पुन्हा या दाखल्यात म्हटलं आहे की, अरुण सूर्याला पाहतो, त्याप्रमाणे मुंगीदेखील सूर्याला पाहते. याचा अर्थ असा - व्यासमुनींनी ‘अरुणा’प्रमाणे तेजस्वी डोळ्यांनी ज्ञान पाहिलं. त्यातून ‘महाभारत’ हा ग्रंथ संस्कृतमध्ये आणला. ज्ञानदेवांनी त्यांच्या डोळ्यांना दिसलेलं ज्ञान ‘ज्ञानेश्वरी’ रूपाने मराठीत आणलं. यातून व्यासमुनींविषयीचा ज्ञानदेवांचा प्रचंड आदर व्यक्त होतो, तर स्वतःविषयीचा विलक्षण विनय. पुढे समुद्र आणि डबकं, गरूड आणि लहान पाखरू, पाण्याचा कलश आणि चूळ, मशाल आणि वात, बाप आणि मूल अशा दाखल्यांनी व्यासांना ते खूप उंचीवर नेऊन ठेवतात आणि स्वतःला सामान्य, लहान करतात.


पुन्हा आपल्याकडून झालेलं हे काम आहे, त्याचं श्रेय व्यासमुनी व आपले गुरू निवृत्तीनाथ यांना देतात. ते म्हणतात, सर्व जगावर उपकार करणारे समर्थ सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ माझ्या अंतःकरणात शिरून वास करीत आहेत (ओवी क्र. १७२८) तेव्हा आता आयती तयार जी गीता, ती मी जगताला मराठी भाषेतून सांगण्याला समर्थ झालो आहे. यात आश्चर्य ते काय? (ओवी १७२९)
तो सर्वोपकारी समर्थु । सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथु ।
राहाटत असे मजही आंतु । रिघोनियां॥ (ओवी क्र. १७२८)
आता आयती गीता जगीं । मी सांगे मर्हाठिया भंगी ।
तेथ कें विस्मयालागीं । ठावो आहे॥ (ओवी क्र. १७२९)
माऊलींची ही नम्रता,
अंशतः तरी बाणवावी आता..
सुख येईल मग जीवनी पाहता...


(manisharaorane196@gmail.com)



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये