Sant Dnyaneshwar : भाव-भक्तीची भूक भगवंता...


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांतील नात्यातील प्रेम उत्कट आहे! तीच जवळीक, उत्कटता ज्ञानदेव आपल्या ओव्यांत ओततात. ज्ञानदेवांच्या ठिकाणी या नादाचं, लयीचं विलक्षण भान आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरीत याचा अनुभव पुन्हा पुन्हा येतो. श्रीकृष्ण-अर्जुन या दोघांतील भक्तिभावाचं वर्णन करताना आपल्या दाखल्यांद्वारे ज्ञानोबा वाचक, श्रोत्यांचं उन्नयन करतात, त्यांची पातळी उंचावतात.


ज्ञानेश्वरीतील अठरावा अध्याय म्हणजे कळसाध्याय. यात भगवान श्रीकृष्ण लाडक्या अर्जुनाला पुन्हा एकवार आत्मज्ञान देण्यास तत्पर आहेत. त्यावेळच्या प्रसंगाचे वर्णन करणाऱ्या ज्ञानदेवांच्या ओव्या म्हणजे काव्याचा कळस होय! श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील अतूट प्रेम, जिव्हाळा, शब्देवीण संवाद इतक्या उत्कटतेने ज्ञानदेव रेखाटतात! त्यातील रत्नासारख्या काही ओव्या पाहूया.


श्रीकृष्ण म्हणतात, ‘तर आणखी एक वेळ अवधान चांगले विस्तीर्ण करून माझे निर्मळ
वचन ऐक.
तरी अवधान पंघळ। करुनियां आणी एक वेळ।
वाक्य माझे निर्मळ। अवधारीं पां॥ ओवी क्र. १३४१


‘पंघळ’ म्हणजे विस्तीर्ण करून, ‘अवधारी’चा अर्थ आहे ‘ऐक’. पंघळ, एक वेळ आणि निर्मळ। ‘ळ’ या अक्षराच्या पुन्हा पुन्हा येण्यातून या ओवीत किती लाडिकपणा आला आहे! नादात हा लडिवाळपणा आहे, कारण तो श्रीकृष्ण आणि अर्जुन या नात्यात आहे. त्या दोघांतील प्रेम इतकं उत्कट आहे! तीच जवळीक, उत्कटता ज्ञानदेवांनी या ओवीत ओतली आहे. ज्ञानदेवांच्या ठिकाणी या नादाचं, लयीचं विलक्षण भान आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरीत याचा अनुभव पुन्हा पुन्हा येतो.


इथे याचं नादगुणाचं साजिरं रूपडं आहे. तसेच त्यातील अर्थही किती महत्त्वाचा आहे! श्रीकृष्ण हे गुरू म्हणून किती श्रेष्ठ आहेत, हे यातून कळतं. ‘गुरू’ शब्दाचा अर्थ आहे ‘अंधाराचा नाश करणारा!’ त्यानुसार श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनातील मोह, अंधार दूर केला आहे. त्याला ‘आत्मज्ञान’ दिलं आहे. श्रीकृष्ण एक समर्थ गुरू! म्हणून ते जाणतात. हे ज्ञान पुन्हा एकदा अर्जुनाला द्यायला हवं. कारण ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्जुनाच्या मनात हीच इच्छा आहे की, गुरूंनी पुन्हा एकवार हे ज्ञान द्यावं.


गुरू-शिष्याचं असं हे अनोखं नातं! हे नातं कसं आहे? तर ज्ञानदेव पुढे दाखला देतात, कासवीच्या दृष्टीला, पिल्लं पाहताक्षणीच पान्हा फुटतो आणि ती तृप्त होतात किंवा आकाश हे चातक पक्ष्यांसाठी सर्व काळ पाणी पोटात बाळगते. या दाखल्यांत किती उत्कटता आहे आणि विविधताही आहे!


जमिनीवर असणारी कासवी नजरेनेही पिल्लांवर प्रेम करणारी! तिथून पुढे येणारा दाखला आकाशाचा. त्यातून पडणाऱ्या पावसाचा. ज्ञानदेव जमिनीवरून एकदम उंच आकाशात आपल्याला नेतात आणि पुन्हा जलधारांच्या रूपाने भूमीवर आणतात. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेची ही उंच भरारी आहे, जी या दाखल्यांतून दृश्य होते. या ओवीतून ते आपल्याला जणू जमीन ते अंतराळ आणि पुन्हा भूमी असा प्रवास, नव्हे यात्रा घडवतात.


श्रीकृष्ण-अर्जुन प्रेमाचं वर्णन करताना याप्रमाणे ज्ञानेश्वर वाचक, श्रोत्यांचं उन्नयन करतात, त्यांची पातळी उंचावतात.श्रीकृष्ण-अर्जुन या दोघांतील भक्तिभावाचं वर्णन करताना या दाखल्यांच्या पुढे एक ओवी येते. त्यात श्रीकृष्णांच्या तोंडी येतं, ‘आमच्या अगदी जीवीचे गुह्य तुला मी सांगतो. कारण एकनिष्ठ भक्ताचे आम्ही भुकेले आहो.’ ती ओवी अशी -
म्हणौनि जिव्हारींचें गुज। सांगतसें जीवासी तुज।
हें अनन्यगतींचे मज। आथी व्यसन॥ ओवी क्र. १३४९


भक्त अर्जुन, देव श्रीकृष्णांचा भुकेला आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या भक्तीचे भुकेले! हाच भाव आणि हीच भक्ती आजच्या काळात आपली शक्ती!


जय श्रीकृष्ण! जय ज्ञानदेव!


(manisharaorane196@gmail.com)



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये