'निसर्गाची शाळा' कविता आणि काव्यकोडी


  • कविता : एकनाथ आव्हाड


निसर्गाची शाळा


फाल्गुन ,चैत्रात
फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य
नसे सृष्टीला उसंत

वैशाख, ज्येष्ठात
ग्रीष्माचा तडाखा
त्यातही गुलमोहर
हसतो सारखा

आषाढ, श्रावणात
पावसाच्या सरी
शेत डोलते झोकात
सुख येते घरोघरी

भाद्रपद, आश्विनात
शरदाचे चांदणे
शोभिवंत आकाश
गाई सुरेल तराणे

कार्तिक, मार्गशीर्षात
हेमंताचा गारवा
हुरडा, शेकोटीला चला
सांगे अवखळ पारवा

पौष, माघात
शिशिराचे आगमन
पानगळीनंतर झाडाचे
उमलते पान पान

प्रत्येक ऋतूचा
आहे महिमा वेगळा
नाना रूपांतून भरे
इथे निसर्गाची शाळा

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


१) लाल आणि पांढरे
असे याचे दाणे
पोपटाचे हे फार
आवडीचे खाणे

माणसांसाठी नेहमीच
उपयोगी ठरलेले
माणकांसारख्या दाण्यांनी
कोण आतून भरलेले?

२) बळकट पाय त्याचे
त्याला शोभून दिसे
खूप खूप वेगाने
तो धावत असे

पंख असूनही नाही
उडत आकाशी
आकाराने सर्वांत मोठा
हा कोणता पक्षी?

३) जेव्हा फिरतो गरगर
घर करतो गार
आळशासारखा बसतो तेव्हा
घाम फुटतो फार

तीन पाय असूनही
पळत जेव्हा नाही
खडखड बोलून कोण
लक्ष वेधून घेई?

उत्तरे :- 


१) डाळिंब

२) शहामृग

३) पंखा 
Comments
Add Comment

तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकीचे भान

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया,

झऱ्यांचा उगम कसा होतो?

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील पाण्याच्या निर्मळ झऱ्यासारखा शिवम मित्रांना माहिती सांगत होता. त्याचे मित्रही ते

मदत

-  कथा; रमेश तांबे एके दिवशी मी समुद्रावर फिरायला गेलो होतो. संध्याकाळचे सहा वाजले होते. सूर्य अस्ताला जाण्याच्या

खर्च

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ साहित्य अकादमीच्या कार्यक्रमात मी निमंत्रित होते. तो कार्यक्रम अहमदाबादला होता.

क्षण कसोटीचे

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर मानवी जीवन म्हणजे सुख-दुःख, यश-अपयश, आशा-निराशा, संधी-अडचणी आणि चढ-उतारांनी

जान है तो जहान है!

- प्रतिभारंग, प्रा. प्रतिभा सराफ चहा बरोबर बाजूला भरपूर ओले खोबरे आणि कोथिंबीर घातलेले पोहे खायला घेतले आणि