अंतिम सामन्यात सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आमनेसामने होते. या लढतीत निळी जर्सी घातलेल्या महेंद्र गायकवाडने आक्रमक पवित्रा घेतला. पृथ्वीराज मोहोळ प्रतिकार करत होता. नियमानुसार ३० सेकंदाच्या कालावधीत महेंद्रने एकही गुण न घेतल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला. या गुणाच्या आधारे पृथ्वीराजने पहिल्या फेरीत शून्य - एक अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत पृथ्वीराज मोहोळच्या निष्क्रियतेचा फायदा महेंद्र गायकवाडला झाला. यामुळे गुणांची एक - एक अशी बरोबरी झाली. सामना संपण्यासाठी शेवटची काही सेकंद शिल्लक होती. झटपट गुण मिळवण्याच्या प्रयत्नात महेंद्र गायकवाड मॅटच्या अर्थात गादीच्या बाहेर गेला. पंचांनी पृथ्वीराज मोहोळला एक गुण दिला. यानंतर महेंद्र गायकवाडनेही गुणासाठी अपील केले. पृथ्वीराज मोहोळ मॅटच्या बाहेर गेला, असे त्याचे म्हणणे होते. पण पंचांनी अपील फेटाळले. यानंतर नाराज झालेल्या महेंद्र गायकवाडने मैदान सोडले. महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्यामुळे पंचांनी पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. पृथ्वीराज मोहोळला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि 'थार' जीपची चावी देण्यात आली. या प्रसंगी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, दत्तात्रय भरणे उपस्थित होते.📍अहिल्यानगर | महाराष्ट्र केसरी अंतिम सामना
६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावत पै. पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला, तर उप महाराष्ट्र केसरी हा पै. महेंद्र गायकवाड ठरला. महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावल्याबद्दल पै. पृथ्वीराजचं मानाची… pic.twitter.com/704BjbJEzG — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 2, 2025
निकालानंतर महेंद्र गायकवाड आणि त्याच्या हितचिंतकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी लाठीमार करुन महेंद्र गायकवाड आणि त्याच्या हितचिंतकांना मैदानातून बाहेर काढले. महेंद्र गायकवाडच्या वर्तनाची गंभीर दखल घेऊन त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घातली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांना तीन वर्षे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खेळता येणार नाही. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळणे अपेक्षित आहे. पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याबाबत निश्चित असे नियम आहेत. या नियमांच्या चौकटीत राहून निर्णय झाले आहेत. पंचांना लाथ मारणे, शिव्या देणे हे खेळाडूला शोभत नाही. पण खेळाडू अशोभनीय आणि क्रीडा भावनेच्या विरोधात जाणारे असे वर्तन करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल, अशी भूमिका घेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांवर कारवाई केल्याचे जाहीर केले.‘महाराष्ट्र केसरी’ पै. पृथ्वीराज मोहोळ !💪🏼 pic.twitter.com/TB3ACpK4kF
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 2, 2025






