फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. कारण प्रत्येक फाईल अजित पवारांकडे जायची आणि तिथून थेट मुख्यमंत्र्यांकडे म्हणजेच फडणवीसांकडे पाठवली जात होती. फक्त शिंदेंच्या खात्याशी संबंधित फायलीच अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अशी त्रिस्थळी यात्रा करत होत्या. इतर फायली बघण्याची संधी शिंदेंना मिळत नव्हती. यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले होते. पण भाजपाच्या नेत्यांनी शिंदेंची नाराजी दूर केली आहे.
भविष्यात होणार असलेल्या मुंबई महापालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून भाजपाच्या नेत्यांनी शिंदेंची नाराजी दूर केली आहे. निवडणुकांच्या काळात किंवा त्याआधी महायुतीत फूट पडू नये यासाठी भाजपाने खबरदारी घेतली आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शासन आदेश काढून राज्य शासनाच्या कामकाजाशी संबंधित प्रत्येक फाईल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मंजुरी नंतरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी जाईल, असे जाहीर केले आहे.
महायुतीत प्रमुख नेत्यांची एकजूट कायम असल्यामुळे विरोधकांचे फूट पडण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आणि राज्याची झपाट्याने प्रगती करणार, असा विश्वास महायुतीकडून पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला आहे.