बीएमसीच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार शैक्षणिक साहित्य

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १६ जून रोजी सर्व प्रकारचे शालोपयोगी शैक्षणिक साहित्य मोफत वितरित करण्यात येणार आहे. या साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दफ्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. यासह इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टॅबही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक साहित्य मोफत वितरित करण्याचा उपक्रम राबवित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा एप्रिल महिन्यातच महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शालेय साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्या देखरेखीखाली प्रत्येक शाळेत १६ जून रोजी विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित केले जाणार आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची स्थापना सन १९०७ मध्ये करण्यात आली. सध्या महानगरपालिका शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी शालेय साहित्य मोफत दिले जाते. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा आणि शिक्षणाबाबत गोडी लागते. तसेच संपूर्ण वर्षभरातील अभ्यासाचेही नियोजन विद्यार्थ्यांना करता येते.


मोफत वाटप करण्यात येणाऱया साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दफ्तर, बूट, सॅण्डल मोजे आदींचा समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱया साडेतीन लाख विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार आहे. सर्व शाळांमध्ये हे साहित्य पोहोचविण्यात येत आहे. शाळानिहाय वाटपाचे नियोजनही पूर्ण झाले आहे. या साहित्यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होत असतो. तसेच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तके राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत.


इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीच्या अभ्यासासह आधुनिक पद्धतीचाही सराव व्हावा, तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शालेय वेळेत टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या टॅबमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. टॅब कसा हाताळावा, त्याचा अभ्यासात उपयोग कसा करावा, याबाबत शिक्षकही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.


शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. १६ जून रोजी जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील, त्यांना त्याच दिवशी हे साहित्य मिळेल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही ते ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील त्या दिवशी हे शैक्षणिक साहित्य देण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने