महिमा एकादशीचा

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे


एकादश्यां निराहारः
स्थित्वाद्याहं परेऽहनि।
भोक्ष्यामि पुण्डरीकाक्ष
शरणं मे भवाच्युत॥
अज्ञानतिमिरान्धस्य
व्रतेनानेन केशव।
प्रसीद सुमुखो भूत्वा
ज्ञानदृष्टिप्रदो भव॥


अर्थ : हेकमलनयन भगवान अच्युता, मी एकादशीच्या दिवशी निराहार राहून द्वादशीला अन्न प्राशन करतो. मी तुला शरण आलो आहे. हे केशवा, अज्ञानरूपी अंधारात अंध झालेल्या माझ्यावर या व्रताने प्रसन्न होऊन मला ज्ञानदृष्टी प्रदान कर.


‘एकादशी’ म्हणजे भारतीय कालगणनेनुसार दर महिन्यातील अमावस्येपासून अकरावी तिथी येणारा दिवस आणि पुन्हा पौर्णिमेपासून अकरावी तिथी येणारा दिवस. अशाप्रकारे महिन्यात दोन ‘एकादशी’ येतात. शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला ‘हरिदिनी’, असेही म्हणतात. ही विष्णूंची तिथी मानली आहे. हे व्रत शुक्ल आणि कृष्ण अशा दोन्हीही एकादशींना करतात. एकादशीत ‘स्मार्त’ आणि ‘भागवत’ असे दोन भेद आहेत. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी ‘स्मार्त’ आणि दुसऱ्या दिवशी ‘भागवत’ असे लिहिलेले असते. हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक एकादशी हा दिवस देवाला शुभ आणि अनुकूल दिवस मानला जातो आणि काही धार्मिक विचारसरणीचे लोक त्यांच्या शक्ती आणि आरोग्यानुसार एकादशीच्या दिवशी पूर्ण किंवा अंशतः उपवास करतात. एकादशीला एवढे महत्त्व प्राप्त होण्याचे कारण असे की, त्या तिथीला सर्व प्राणीमात्रांची गती उर्ध्व दिशेने झेपावते. प्रत्येक एकादशीचे आपले असे एक महत्त्व आहे. दर पंधरवड्यात येणाऱ्या एकादशीची नावे खालीलप्रमाणे आहेत. कामदा एकादशी, वरूथिनी एकादशी, मोहिनी एकादशी, अपरा एकादशी, निर्जला एकादशी, योगिनी एकादशी, देवशयनी (आषाढी) एकादशी, कामिका एकादशी, पुत्रदा एकादशी, अजा एकादशी, परिवर्तिनी एकादशी, इंदिरा एकादशी, पाशांकुशा एकादशी, रमा एकादशी, प्रबोधिनी एकादशी, उत्पत्ती एकादशी, मोक्षदा एकादशी, सफला एकादशी, पुत्रदा एकादशी, षट्तिला एकादशी, जया एकादशी, विजया एकादशी, आमलकी एकादशी, पापमोचनी एकादशी, कमला एकादशी, पद्मनि एकादशी इत्यादी.


एकादशीच्या दिवशी उपवास करणे आणि भगवान विष्णूंची पूजा करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. एकादशीचा उपवास निर्जला, क्षीरभोजी, फलहारी किंवा जलाहार या पद्धतीने केला जातो. निर्जला एकादशीला पाण्याशिवाय पूर्ण उपवास केला जातो. एकादशीची एक पौराणिक कथा सांगितली जाते. सत्ययुगात एकेकाळी मूर नावाचा एक अद्भुत भयानक राक्षस राहत होता. त्याने शंकरांना प्रसन्न करून अमरत्वाचे वरदान मागून घेतले. नंतर त्याने देवतांशी युद्ध पुकारले. स्वर्गाचा राजा इंद्र, सूर्यदेव विवस्वान, आठ वसू, भगवान ब्रह्म, वायुदेव आणि अग्निदेव यांचा पराभव केला. त्याच्या भयानक शक्तीने त्याने त्या सर्वांना आपल्या अधिपत्याखाली आणले. मग देवतांनी महादेवांकडे जाऊन त्यांची मदत मागितली. शंकरांनी त्यांना भगवान विष्णूंकडे पाठवले. सर्व देवतांनी भगवान विष्णूंकडे जाऊन त्यांची प्रार्थना केली व त्यांची मदत मागितली. इंद्राची प्रार्थना आणि विनंती ऐकून भगवान विष्णू त्या मूर राक्षसावर खूप क्रोधित झाले आणि म्हणाले: “हे शक्तिशाली देवतांनो, आता तुम्ही सर्व मिळून मूराची राजधानी चंद्रवतीवर चाल करून जाऊ शकता.” सर्व देवतांनी भगवान हरी यांच्या नेतृत्वाखाली चंद्रवतीवर चाल केली. त्यानंतर मूराच्या सैनिकांमध्ये आणि देवतांमध्ये मोठे युद्ध झाले. भगवानांच्या हातून हजारो राक्षस मारले गेले. शेवटी मुख्य राक्षस मूराने प्रथम शस्त्रांनी आणि नंतर उघड्या हातांनी परमेश्वराशी युद्ध सुरू केले. भगवान विष्णूंनी एक हजार स्वर्गीय वर्षे मूराशी युद्ध केले आणि नंतर ते थकले तेव्हा, ते विश्रांतीसाठी बदरिका आश्रमाला निघून गेले. तेथे ते हिमावती नावाच्या एका अतिशय सुंदर गुहेत राहिले. तिथे त्यांना निद्रा लागली. राक्षस त्यांच्या मागे मागे गुहेत गेला आणि त्यांना झोपलेले पाहून, तो मनात विचार करू लागला: “आज मी या हरिचा वध करीन,” जेव्हा दुष्ट राक्षस मूर विष्णूंना मारण्यासाठी शस्त्र घेऊन त्यांच्यावर धावून गेला तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एक सुंदर स्त्री प्रकट झाली जिचा रंग अतिशय तेजस्वी होता. मूराने पाहिले की ती विविध तेजस्वी शस्त्रांनी लढण्यास सज्ज आहे. त्या स्त्रीने युद्ध करण्याचे आव्हान दिल्यावर, मूराने स्वतःला युद्धासाठी सज्ज केले आणि नंतर तिच्याशी युद्ध करु लागला; परंतु ती स्त्री त्याच्याशी न थांबता लढत असल्याचे पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला. राक्षसांचा राजा म्हणाला: “हे तेजस्वी शक्तिशाली देवी तुला कोणी निर्माण केली आहे जी तू माझ्यावर वीज कोसळत असल्याप्रमाणे लढत आहे,?”


अचानक त्या तेजस्वी देवीने मूराची सर्व शस्त्रे तोडली आणि क्षणार्धात त्याचा रथ हिरावून घेतला. तो आपल्या उघड्या हातांनी तिच्यावर हल्ला करण्यासाठी तिच्याकडे धावला; परंतु जेव्हा तिने त्याला तिच्याकडे येताना पाहिले तेव्हा तिने क्रोधाने त्याचे डोके कापून टाकले. अशाप्रकारे राक्षसाचा वध झाला. इतक्यात भगवान विष्णू जागे झाले आणि त्यांनी मृत राक्षसाला त्या देवीसमोर हात जोडताना पाहिले. त्या देवीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला वरदान देण्याचे ठरवले आणि तिला वरदान मागायला सांगितले. ती देवी म्हणाली: “हे प्रभू, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला वरदान देऊ इच्छित असाल, तर या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीला सर्वात मोठ्या पापांपासून मुक्त करण्याची शक्ती मला द्या. मी अशी इच्छा करते की, श्रद्धेने आणि निष्ठेने उपवास करणाऱ्या व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होऊन त्यांना वैकुंठात स्थान मिळेल. भगवंतांनी म्हटले: “हे परमपूज्य देवी, तू जे मागितले आहेस ते मी तुला देत आहे. या जगातील माझे सर्व भक्त तुझ्या प्रगट दिनादिवशी निश्चितच उपवास करतील आणि अशा प्रकारे ते तिन्ही लोकांत प्रसिद्ध होतील आणि शेवटी माझ्या धामात येऊन राहतील. कारण तू, माझी दिव्य शक्ती, अस्ताच्या चंद्राच्या अकराव्या दिवशी तू प्रकट झाली आहेस म्हणून तुझे नाव एकादशी असे पडेल. जर एखाद्या व्यक्तीने एकादशीचा उपवास केला, तर मी त्याचे सर्व पाप जाळून टाकीन आणि त्याला माझे दिव्य धाम प्रदान करीन.”
ब्रह्मवैवर्त पुराणात असे म्हटले आहे की, जो एकादशीच्या दिवशी उपवास करतो तो सर्व प्रकारच्या पापकर्मांच्या प्रतिक्रियांपासून मुक्त होतो आणि धार्मिक जीवनात प्रगती करतो. पद्मपुराणात म्हटले आहे की, एखाद्याने एकादशीचे कठोर पालन केले तर त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला वैकुंठधाम अगदी सहजपणे प्राप्त होते.

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये