पुण्यनगरीत अवतरला भक्तीचा महासागर ; माउली व तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत

पुणे : आषाढीची वारी आहे माझे घरी ।
         आणिक न करी । तीर्थव्रत ।।


पावलागणिक होणारा विठुनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष अन् या नादासवे पुढे सरकणारा वैष्णवांचा महाप्रवाह, अशा भारलेल्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी शुक्रवारी पुण्यनगरीत प्रवेश केला. पुणेकरांनी अत्यंत भक्तिभावात दोन्ही पालख्यांचे स्वागत केले.



तुकोबांची पालखी आकुर्डीहून, तर माउलींची पालखी आळंदीहून सकाळी मार्गस्थ झाली. सकाळच्या न्याहारीमुळे बळ प्राप्त झालेले वारकरी टाळ-मृदंगाच्या गजर, अभंगाचा ताल व पावसाच्या साथसंगतीत झपझप पावले टाकू लागले. पावलागणिक वारकऱ्यांचा उत्साह वाढू लागला. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुन्हा पंढरीच्या मार्गावर आली. तोवर वाकडेवाडीतील मरिआई गेट चौक ते पाटील इस्टेटपर्यंतचा सारा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला. तुकोबा-माउलींच्या दर्शनाकडे सगळ्यांचेच डोळे लागले होते.


पाटील इस्टेट चौकात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील नगारा झडला अन् भाविकांचे डोळे एकवटले. अश्वांचे आगमन होतात भाविकांनी त्यांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर बरोबर विविधरंगी फुलांनी सजविलेला तुकोबांचा रथ दृष्टीस पडला. तुकोबांची पालखी येताच दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली. सायंकाळी पाचच्या सुमारास पालखीचे आगमन झाले. महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. रथातील तुकोबांची पालखी अन् पादुकांवर माथा टेकवत अनेकांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला. तर काहींनी डोळे भरून पादुकांचे दर्शन घेतले.


तुकोबांच्या पालखीच्या आगमनानंतर भाविकांच्या नजरा संगमवाडी पुलावर स्थिरावल्या. दिघी, कळस, विश्रांतवाडी, फुलेनगरमार्गे पालखी संगमवाडीच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागली. पालखी सोहळ्याचा नगारा झडलाच, सर्वांची उत्सुकता ताणली गेली.


अश्वांच्या आगमनाने वातावरणात चैतन्य पसरले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात अन् दिंड्यादिंड्यातून होणा-या हरिनामाच्या गजरासवे माउलींची पालखी अवतरली. माउलींच्या पादुकांवर माथा टेकवण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. पुणे महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.


दोन्ही पालख्यांचा संगम होताच वैष्णवांच्या या सागराला महासागराचे रूप प्राप्त झाले. या पालखी सोहळय़ावर हेलिकॉप्टरलमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. वैष्णवांचा हा महाप्रवाह संचेती चौक, फर्ग्युसन रस्तामार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौकात आला. ग्यानबा-तुकारामचा एकच गजर जाहला. अवघी पुण्यनगरी दुमदुमून गेली. पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी पालख्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. माउलींची पालखी रात्री पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामासाठी विसावली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या रविवारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी