मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार


भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी अखेर सुरू झाली असून, आज (मंगळवार, ११ नोव्हेंबर) मिरारोड येथील डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया पार पडली आणि यंदाही शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून प्रभाग निहाय आरक्षणाचे चित्र स्पष्ट करण्यात आले. पालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी ही सोडत जाहीर केली असून, ज्या नागरिकांना किंवा राजकीय पक्षांना यावर हरकती किंवा सूचना मांडायच्या असतील, त्यांनी १७ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत महापालिका मुख्यालयात त्या सादर कराव्या लागतील.


मिरा-भाईंदर शहरात एकूण २४ प्रभाग असून, त्यापैकी २३ प्रभाग चार सदस्यीय आणि १ प्रभाग तीन सदस्यीय आहे. महापालिकेत एकूण ९५ सदस्यसंख्या असून, यापैकी तब्बल ४८ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे महापालिकेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. शहरातील २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ८ लाख ९ हजार ३७८ असून, अनुसूचित जातीची लोकसंख्या ३० हजार २४३ आणि अनुसूचित जमातीची १२ हजार ५९६ आहे.


या सोडतीनुसार, एकूण ९५ जागांपैकी ३० जागांवर विविध आरक्षित प्रवर्गाची मोहोर उमटली आहे. अनुसूचित जातीसाठी ४ जागा आरक्षित झाल्या आहेत. यात प्रभाग क्रमांक ११, १३, १४ आणि १८ चा समावेश आहे आणि विशेष म्हणजे प्रभाग ११ आणि १४ मध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी केवळ १ जागा आरक्षित झाली आहे, जी प्रभाग क्रमांक १४ मध्ये आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी सर्वाधिक २५ जागा आरक्षित झाल्या आहेत. या २५ जागांपैकी १३ जागा महिलांसाठी (प्रभाग १, ३, ४, ५, ६, ८, ११, १३, १४, १८, २०, २१ व २३) आणि उर्वरित १२ जागा पुरुष (खुला) ओबीसीसाठी (प्रभाग २, ४, ७, ९, १०, १२, १५, १६, १७, १९, २२ व २४) निश्चित झाल्या आहेत.


महापालिकेत ६५ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. या ६५ पैकी ३३ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असून, उर्वरित ३२ जागा महिला/पुरुष (खुला) गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, प्रभाग १, ३, ४, ५, ६, ८, १३, १८, २०, २१, २३ मध्ये प्रत्येकी एक जागा महिलांना मिळाली, तर प्रभाग २, ७, ९, १०, १२, १५, १६, १७, १९, २२, २४ मध्ये प्रत्येकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. महिलांसाठी आरक्षित असलेल्या अनुसूचित जातीच्या २, ओबीसीच्या १३ अशा एकूण १५ जागा आरक्षित आहेत, तर सर्वसाधारण प्रवर्गाच्या ३३ जागा महिलांसाठी राखीव आहेत, अशी माहिती सचिव दिनेश कानगुडे यांनी दिली आहे.


या संपूर्ण प्रक्रियेच्या वेळी पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त सचिन बांगर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि सर्वच पक्षांचे राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. मिरा-भाईंदर महापालिकेचा कार्यकाळ २७ ऑगस्ट २०२२ रोजीच संपुष्टात आला असल्याने, तेव्हापासून येथे प्रशासक राजवट सुरू आहे. या आरक्षण सोडतीमुळे आता निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण