आत्मबोधाचा शाश्वत आनंद

अर्चना सरोदे


मातेच्या गर्भात असताना जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते . पण गर्भामध्ये “ सोहं सोहं ” करणारा हा जीव जन्माला आल्यानंतर मात्र त्याला देहबुद्धी प्राप्त होते आणि “ कोहं कोहं ” असा आक्रोश करायला लागतो. मायेच्या प्रभावामुळे परमात्म्यापासून हा जीव दूर जातो. मी म्हणजे देहच याच भ्रमात तो जीवन जगतो आणि अहं मध्ये बद्ध होतो. स्वताचा अहं कुरवाळण्यात आनंद मानणारा हा जीव या भवसागरातून पार कसा होणार ? मायेत गुरफटलेल्या आणि स्वस्वरूप विसरलेल्या अशा या जीवाला या मायानदीतून पार व्हायचे असेल तर त्याचा उगम ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाणे हा जरी मायेचा स्वभाव असला तरी त्याच्या प्रभावापासून वाचण्यासाठी नदीच्या प्रवाहा बरोबर वाहत न जाता त्याच्या विरुद्ध दिशेने पोहत जाऊन भगवंता चरणी विलीन होणे हेच अंतिम ध्येय असायला हवे.या मोहरूपी मायेपासून अत्यंत सावधपणे जीवाने स्वत:ला बाजूला नेऊन परमेश्वराचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आत्मा हाच ईश्वर आहे आणि हे जाणून घ्यायचे असेल तर प्रथम अहंचा त्याग करणे गरजेचे आहे. देहबुद्धी मध्ये अडकलेला जीव कनिष्ठ देवांमध्ये अडकतो अन मुख्य देवापासून दूर राहतो.


मानवी मन हे अत्यंत चंचल आहे पण या मनाचा, प्रवृत्तीचा जर अभ्यास केला तर सत पासून जन्माला आलेले मन मूळात सज्जनच आहे. पण कल्पनेमध्ये रमणारे चंचल मन आपल्या मूळ प्रवृत्ती पासून दूर जाऊन इतर गोष्टींमध्येच रमते. आणि अशाश्वत जगात रमलेले मनच जीवाला शाश्वत सुखापासून दूर ठेवते म्हणून मनालाच उत्तम विचार करायला प्रवृत्त केले पाहिजे. उत्तम विचार, उत्तम संगत, उत्तम चिंतन मननाची सवय लावून परमेश्वर प्राप्ती कशी करुन घ्यावी हे आपल्याला श्रीमद्भगवद्गीता, दासबोध या ग्रंथातून शिकायला मिळते. शुद्धज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मानवी मनावर जो अज्ञानाचा पडदा आहे तो दूर झाला पाहिजे. खरे तर जीव आणि ईश्वर यामध्ये द्वैत नाही पण मायेमुळे जीवाला ईश्वराचे विस्मरण झाले आहे. ‘मी म्हणजे देह’ आणि माझ्यापेक्षा ईश्वर काही वेगळा हा भ्रम जीवाला झाला. परंतु जीवशिव हे एकरूपच आहेत ही एकरूपत्व जाणून घेण्यासाठी जीवाने भक्तिमार्गाचा अवलंब करावयास हवा.


माणसाला आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यावयाचा असेल तर त्यासाठी मायेचा त्याग करावा लागेल. भगवंताचे कर्तुत्व विलक्षण आहे तसेच ही माया मोठी विचित्र आहे. या मायेमध्ये रमल्यामुळेच माणसाचे मन अस्थिर राहते. माणसाचे मन कायम कल्पनेमध्ये रमून जाते. यामुळे त्याचे मन कधीच एकाग्र होऊ शकत नाही.


चंचल मनालाच सतत भगवंताचे चिंतनात रमवायला हवे.


मन इंद्रियांच्या पातळीवर विषयसुखाचा विचार करत राहते. तेव्हा ती माया माणसाच्या बंधनास अथवा पुनर्जन्मास कारणीभूत ठरते. पण मनातील विचार भगवंतासंबंधीचे असतील तर हळूहळू हेच मन साधकाला निविर्चार करून हीच माया साधकाला बंधनातून मुक्त करण्यास उपयोगी ठरू शकते. त्यासाठी साधकाने एकांतात राहून सतत साधना करणे गरजेचे आहे. अहंकार आणि वासना यामुळे माणूस दृश्य जगातील सगळ्यांना माझे माझे म्हणत राहतो. इतरांकडून अपेक्षा करीत राहतो आणि इतरांच्या अपेक्षापूर्ती करू शकत नाही . अशा या विचित्र चक्रात तो सापडतो आणि या अपेक्षापूर्तीच्या खेळात मनुष्य अधिकाधिक मायेत गुरफटत जातो. या चक्रातून सुटण्यासाठी अहंकाराचा आणि वासनेचा त्याग करायला हवा. देहबुद्धी ते आत्मबुद्धी साध्य करण्यासाठी साधना उपासना याच्या माध्यमातून शाश्वत आनंद प्राप्त करून घ्यायला. सर्व सुखाचा सागर असणा-या भगवंताला आपले सर्वस्व मानले तरच या मनाला खरा शाश्वत आनंद प्राप्त होणार आहे. मन हे सिद्धीचे कारण आहे . मनाच्या प्रसन्नतेवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत हे जाणून तसेच मनाचे सामर्थ्य ओळखून मनाला विवेकाने आवर घालून त्याला रामरूपी करायला हवे तेंव्हाच आत्मबोधाचा शाश्वत आनंद प्राप्त होईल.

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये