जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक : ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात असून, सोमवारी निकाल जाहीर होणार आहे.


राज्य निवडणूक आयोगाने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक जाहीर केली होती. सुरुवातीला ही निवडणूक ५ फेब्रुवारीला होणार होती; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला आणि मतदानाची तारीख बदलण्यात आली. त्यानुसार, शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.

मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणेंनी मतदानाचा हक्क बजावला


राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदारांना विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि गावांच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करावे असे आवाहन केले. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी देखील मतदान केले. मागील २७ वर्षांपासून नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात निष्कलंक कारभार राहिला. त्यामुळे महायुतीचा निश्चित विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी आधीच शस्त्र टाकले असून उपद्रवी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

कोल्हापुरात दोन गटात बाचाबाची


कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात राशिवडे येथील ग्रामपंचायत केंद्रावर वयस्कर मतदारांना मतदानासाठी नेण्यावरुन दोन गटात किरकोळ बाचाबाची झाली. या वेळी दोन्ही गटांच्या जमावाने परिस्थिती तणावपूर्ण केली, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांचे नियंत्रणात आणले.

खेडमध्ये राष्ट्रवादी नेत्यावर हल्ला


पुण्याच्या खेड तालुक्यात मतदानाच्या दिवशी आंबेठाण-पाईट गटात राजकीय वैमनस्यातून हिंसाचार झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांचे पती आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बुट्टे पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वासुली फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आमदार विलास भुमरेंमुळे नवा वाद


छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे आपल्या मुलाला घेऊन मतदानकेंद्रात दाखल झाले. मतदानकेंद्रातील अधिकाऱ्यांनी मुलाच्या बोटावर शाई लावली. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवत, कारवाईची मागणी केली. तसेच निवडणूक यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाल्याच टीकाही करण्यात आली. त्यावर, भुमरे यांनी स्पष्ट केले की, मतदान मी स्वतः केले, मुलाच्या बोटावर फक्त शाई लावली गेली.

अलिबागमध्ये मतदान यंत्रात बिघाड
अलिबागमधील सहाण येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड झाला. मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधीच हा बिघाड लक्षात आला. तांत्रिक टीमला त्वरित दुरुस्तीसाठी बोलावण्यात आले.

परभणीमध्ये मतदान केंद्रावर वाद


परभणीच्या राणीसावरगावमध्ये काही महंतांना मतदान करण्यापासून रोखल्यामुळे मतदान केंद्रावर वाद निर्माण झाला. महंतांनी थेट अधिकाऱ्यावर भाजपची दलाली करण्याचा आरोप केला. पोलिसांनी मध्यस्थी केली, मात्र वाद सुरु राहिला. अखेर महंतांनी मतदान न करताच मतदान केंद्र सोडले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. या वेळी पार्थ पवार, शर्मिला पवार आणि युगेंद्र पवार या कुटुंबातील सदस्यांनीही मतदान केले.

कोल्हापुरात महाडिक विरुद्ध सतेज पाटील सामना


कोल्हापुरात महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र लढत लढत असल्याने निवडणूक रंगतदार झाली. कोल्हापूर दक्षिण, कागल, चंदगड, करवीर, हातकणंगले, राधानगरी मतदारसंघात चुरशीच्या लढती होत्या. महाडिक विरुद्ध सतेज पाटील, मंडलिक विरुद्ध मुश्रीफ, आमदार विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील, राहुल पाटील विरुद्ध आमदार चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील अशा प्रकारे सत्तासंघर्ष रंगला.

करमाळ्यातील केडगावमध्ये सर्वात कमी मतदान


सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केडगाव येथे २ हजार ६१ मतदारांपैकी फक्त ३४ मतदारांनी मतदान केले. ग्रामस्थांनी रस्ता नसल्याने मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता.

अकलूजमध्ये लहान मुलाने दाबले बटण


अकलूजच्या मतदान केंद्रावर एका लहान मुलाला ईव्हीएमचे बटण दाबायला दिल्याने वाद निर्माण झाला. खासदार धैर्यशील मोहित पाटलांच्या चुलत भावाने हा प्रकार केल्याने चौफेर टीका झाली. केंद्राध्यक्षांनी यावर आक्षेप घेतला.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे