गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍पातील जुळ्या बोगद्याच्‍या खोदकामासाठी बोगदा खनन संयंत्राचे सुटे भाग 'शाफ्ट'मध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई: गोरेगाव -मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्रचे (TBM)  सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्याची प्रक्रिया आज (दिनांक ११ मार्च २०२६) औपचारिकरीत्या सुरू करण्यात आली. नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत तब्बल तीन महिने अगोदर ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार आहे.  महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी कार्यस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून या प्रक्रियेची पाहणी केली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे बोगद्याच्या प्रत्यक्ष खनन कार्याला लवकरच गती मिळणार आहे.


पश्चिम आणि पूर्व उपनगरांना रस्‍तेमार्गे जोडण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग हा महत्‍त्‍वाचा प्रकल्‍प हाती घेतला आहे. या प्रकल्‍प अंतर्गत पश्चिम उपनगरांमध्‍ये गोरेगावस्थित दादासाहेब फाळके चित्रनगरी ते पूर्व उपनगरामध्‍ये मुलुंड येथे खिंडीपाडा पर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्‍यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्‍येकी ४.७० किलोमीटरचे आहेत. या समांतर बोगद्यांचा व्‍यास १४.२० मीटर तर संजय गांधी राष्‍ट्रीय अभयारण्‍य परिसरात १३ मीटरचा असेल. पर्यावरणपूरक असलेले हे बोगदे अभयारण्‍याच्‍या डोंगराच्‍या खाली पूर्णपणे जमिनीखालून जाणार आहेत. समांतर बोगद्यांमध्‍ये प्रत्‍येकी ३ मार्गिका असतील. बोगद्यामध्‍ये हवा खेळती ठेवण्‍यासाठी यंत्रणा, आग प्रतिबंधात्‍मक अद्ययावत यंत्रणा तसेच, पर्जन्‍य जलवाहिन्‍या आणि इतर संस्‍थांच्‍या उपयोगिता वाहिन्‍यादेखील विकसित करण्‍यात येणार आहेत. समांतर बोगदे हे बोगदा खनन संयंत्र (Tunnel Boring Machines) च्‍या माध्‍यमातून खणले जाणार आहेत.


मुंबईतील आजपर्यंतचा सर्वात मोठा १४.४९ मीटर व्यास असलेले S-118 व S-119 हे दोन बोगदा खनन संयंत्रे (टेराटेक कंपनीद्वारे निर्मित व प्रत्येकी २१७५ मेट्रिक टन वजनाची) या प्रकल्पात वापरली जाणार आहेत.


दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या प्रक्षेपण कूप (Launching Shaft) चे पहिल्‍या टप्‍प्‍यातील काम पूर्ण झाले आहे. या शाफ्टचे एकूण परिमाण अंदाजे २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३० मीटर खोल इतके आहे. बोगदा खनन संयंत्र (TBM) ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्यासाठी आवश्यक असलेले संपूर्ण खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, शाफ्टच्या तळाच्या स्तरावर २० मीटर × २० मीटर × २.५ मीटर आकारमानाचा आणि वक्र (Curved) स्वरूपाचा मजबूत काँक्रीट साचा (Cradle) तयार करण्यात आला आहे. हा साचा बोगदा खनन संयंत्र सुरक्षितरीत्या स्थिर ठेवण्यासाठी आणि खनन प्रक्रियेच्या प्रारंभी योग्य दिशेने प्रक्षेपित (Launching) करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे बोगदा खनन संयंत्र कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली साच्याची कामेही यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत.


आज (दिनांक ११ मार्च २०२६) पासून बोगदा खनन संयंत्रा (TBM) चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्याची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कार्यस्थळी ८०० मेट्रिक टन आणि ३५० मेट्रिक टन क्षमतेच्या अत्याधुनिक क्रेन कार्यरत असून, त्यांची आवश्यक भार चाचणी (Load Test) यापूर्वी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. या उच्च क्षमतेच्या क्रेनच्या साहाय्याने बोगदा खनन संयंत्राचे विविध सुटे भाग टप्प्याटप्प्याने शाफ्टमध्ये सुरक्षितरित्या उतरविण्यात येत आहेत. आज (दिनांक ११ मार्च २०२६) १३५ मेट्रिक टन वजनाचे टाईप ‘ए’शिल्ड म्हणजे, खनन करणारा मुख्य घटक यशस्वीपणे उतरवण्यात आला आहे.


बोगदा खनन संयंत्राचे महत्त्वाचे तांत्रिक घटक, जसे की मेन शिल्ड (Main Shield), कटर हेड (Cutter Head), स्क्रू कन्वेयर (Screw Conveyor), मेन बेअरिंग (Main Bearing) आणि इरेक्टर (Erector) यांची जुळवाजुळव (Assembling) प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली असून, पुढील टप्प्यात हे घटक शाफ्टमध्ये उतरवून बोगदा खनन संयंत्राची अंतिम संरचना उभारण्यात येणार आहे. त्यानंतर बोगद्याच्या प्रत्यक्ष खनन प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे.


दादासाहेब फाळके चित्रनगरी - संजय गांधी राष्‍ट्रीय उद्यान ते मुलुंड - अमर नगर पर्यंत जमिनीखाली बोगदा खनन पूर्ण करण्यात आल्यानंतर मुलुंड - अमर नगर येथे पुन:प्रापण कूप (Retrieval Shaft) येथे बोगदा खनन संयंत्र जमिनीवर पुनश्च प्राप्त होऊन, त्याचे भाग सुटे करण्यात येतील.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने