Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर मंदिरात ३००० रुपयांत 'व्हीआयपी' दर्शनाचा काळाबाजार; शरद पवार गटाचा नेता गजाआड

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पावित्र्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. तासनतास रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना अवघ्या १० मिनिटांत दर्शन घडवण्याचे आमिष दाखवून ३ हजार रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात धक्कादायक वळण म्हणजे, या गैरव्यवहाराचे धागेदोरे थेट देवस्थान ट्रस्टच्या प्रशासनापर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करून देवस्थानचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते पुरुषोत्तम कडलग यांच्यासह गोटीराम पेहरे यांना अटक केली आहे. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन आर्थिक लूट करणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात आणि भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.



पोलिसांचे धडाकेबाज 'स्टिंग ऑपरेशन'


गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात सशुल्क दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक विशेष 'स्टिंग ऑपरेशन' यशस्वीरीत्या राबवले. या मोहिमेत स्वतः पोलीस कर्मचारीच साध्या वेशात भाविक बनून मंदिरात गेले होते. यावेळी केवळ एका दिवसात तीन वेगवेगळ्या भाविकांकडून जलद दर्शनासाठी प्रत्येकी ३ हजार रुपये वसूल केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. पोलिसांनी पुराव्यासह या लुटीचा पर्दाफाश केला असून, एका एजंटला रंगेहात पकडले. या एजंटच्या चौकशीतून या संपूर्ण रॅकेटचे कनेक्शन थेट देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्याशी असल्याचे स्पष्ट झाले.



७ दिवसांची पोलीस कोठडी


पुरुषोत्तम कडलग यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या निकालामुळे देवस्थान वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रकरणाच्या सखोल तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. "त्र्यंबकेश्वर हे जागतिक स्तरावरील देवस्थान असून, विश्वस्त पदाचा गैरवापर करून हे रॅकेट चालवले जात असल्याचा दाट संशय आहे. या कटात अजून कोणाचे हात गुंतले आहेत, हे शोधण्यासाठी १० दिवसांच्या कोठडीची गरज आहे," असे त्यांनी नमूद केले. बचाव पक्षाच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र उपलब्ध पुरावे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.



त्र्यंबकेश्वर दर्शन घोटाळ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप


या प्रकरणातील मुख्य आरोपी पुरुषोत्तम कडलग हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे युवक कार्याध्यक्ष असल्याने विरोधकांनी यावरून पक्षाच्या विचारधारेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी या कारवाईनंतर आक्रमक पवित्रा घेत थेट शरद पवारांवर निशाणा साधला. "शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली नास्तिक विचारांचे कार्यकर्ते तयार झाल्यामुळेच आज पवित्र देवस्थानांमध्ये भ्रष्टाचाराचा बाजार मांडला जात आहे," अशी टीका भोसले यांनी केली. विश्वस्त पदावर बसून भाविकांची लूट होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कडलग यांच्या अटकेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.



विश्वस्त निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह ?


आता त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त निवड प्रक्रियेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी या संदर्भात अत्यंत स्फोटक आरोप केला असून, या घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर असल्याचे संकेत दिले आहेत. शिंदे यांनी दावा केला आहे की, "देवस्थानच्या विश्वस्त निवडीतच मोठा आर्थिक व्यवहार झाला असून, अटक करण्यात आलेल्या कडलग यांच्यासह अन्य तिघांनी कोट्यवधी रुपये देऊन हे मानाचे पद मिळवले आहे." केवळ भाविकांची लूट हाच एक मुद्दा नसून, मुळात या नियुक्त्या कशा झाल्या याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आरोपामुळे देवस्थान प्रशासन आणि विधी व न्याय विभागाच्या कार्यपद्धतीवर आता संशयाची सुई वळली असून, संपूर्ण प्रक्रियेच्या फेरचौकशीची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

संपत्तीच्या वादात माणुसकी हरवली ! 3 दिवस घरातच पडून राहिला वृद्धाचा मृतदेह, अखेर...

पैसा, संपत्ती आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी माणुसकी हरवत चालल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. तेलंगणातील एका

Andhra Pradesh Temple : नवरात्रीत देवीची अनोखी सजावट! तब्बल 4.42 कोटींच्या नोटांनी मंदिर सजवलं; पाहून व्हाल थक्क!

आंध्र प्रदेशातील अमलापूरम येथील श्री वासवी कन्यका परमेश्वरी अम्मावरू मंदिर सध्या आपल्या अनोख्या सजावटीमुळे

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

Yashasvi Jaiswal ODI Snub : यशस्वी जयस्वालला वनडे संघातून डावललं! आर. अश्विन संतापला; निवडकर्त्यांना सुनावलं, म्हणाला ‘हा अन्याय!’

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी न मिळाल्याने

White House : अवघ्या पाच दिवसांत केटी झकारिया यांची व्हाइट हाऊसमधून एक्झिट; बार परीक्षा वादामुळे पद गमावले!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून