Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात
• श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक


मुंबई  : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौंडी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. चोंडीचा विकास सर्वसमावेशक व नियोजनबद्ध पद्धतीने करत दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनास चालना देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ, चोंडी येथील जतन, संवर्धन व विकास आराखड्यासंदर्भात बैठक वर्षा निवासस्थान येथे झाली. या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, नियोजन विभागाच्या शैला ए, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर विशेष भर


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी 681 कोटींची तरतूद करण्यात आली असून, या प्रकल्पांतर्गत स्मारक परिसरात भव्य पुतळा, सुशोभित उद्यान, नदीकाठाचा विकास, आधुनिक संग्रहालय, ओपन एअर थिएटर आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत. स्मारक परिसरात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. तसेच हरित क्षेत्र आणि मोकळ्या जागांचा समतोल राखत परिसराचे सौंदर्यीकरण करावे.



बुडीत बंधाऱ्यांऐवजी ‘बॅरेज’ उभारण्याबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. मंदिर परिसरातील भूसंपादन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावे. प्रकल्पातील काही सुविधा उभारणी व देखभालीसाठी खासगी भागीदारी (पीपीपी मॉडेल) आणण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून, यामुळे पर्यटन सुविधा अधिक दर्जेदार, कार्यक्षम व दीर्घकालीन टिकाऊ पद्धतीने विकसित करता येणार असल्याचे श्री फडणवीस म्हणाले.


सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 360 कोटींच्या रस्ते प्रकल्पातील दोन कामांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक जागेच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी वन, सार्वजनिक बांधकाम, जलसिंचन विभाग आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्त मोजणी केली असून सीमारेषा निश्चित करण्यात आल्या आहेत. चोंडी येथील स्मारकाचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने केला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, चोंडी विकास आराखड्यात इतिहास, संस्कृती आणि पर्यटन यांचा समन्वय साधत स्थानिक विकास व रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा शासनाचा मानस आहे. याशिवाय परिसराचे सौंदर्यीकरण, जलसौंदर्य, हरित क्षेत्र, तसेच पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करून चोंडीला आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून उभारण्याचे नियोजन आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने