पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून इस्रायल संरक्षण दल (Israel Defense Forces) आणि हिजबुल्ला (Hezbollah) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहने एफपीव्ही ड्रोनच्या मदतीने इस्त्रायली सैनिकांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला.
हिजबुल्लाहने दावा केला आहे की हा हल्ला इस्त्रायली सैन्याच्या मेडिकल इव्हॅक्युएशन मोहिमेदरम्यान करण्यात आला. हल्ल्यासाठी वापरलेले एफपीव्ही (First Person View) ड्रोन अतिशय वेगवान आणि कमी उंचीवर उडणारे होते, ज्यामुळे ते अचानक लक्ष्यावर झेपावले. मात्र, या हल्ल्यात ड्रोनने आपले मुख्य लक्ष्य अचूकपणे भेदले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
हिजबुल्लाहने हा हल्ला यशस्वी असल्याचा दावा केला असून त्यांनी संबंधित फुटेजही प्रसिद्ध केले आहे. मात्र इस्त्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार हा हल्ला अयशस्वी ठरला असून कोणतीही मोठी हानी किंवा मृत्यू झालेला नाही.
दरम्यान, इस्त्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमध्ये आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. दोन्ही बाजूंनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू असून सीमावर्ती भागात सतत तणावाची स्थिती आहे. अनेक वेळा असे हल्ले लक्ष्य चुकवून निष्फळ ठरत असल्याचेही समोर आले आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत युद्धाचा तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे.






