Nashik Jewellery Shop : नाशिकमध्ये ६ दरोडेखोरांचा ज्वेलर्सवर सिनेस्टाईल हल्ला; कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, दोन आरोपींना बेड्या

नाशिक : नाशिक शहरात एका अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शहरातील गजबजलेल्या हिरावाडी (Hirwadi area) परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी एका दागिन्यांच्या दुकानावर सिनेस्टाईल दरोडा टाकला. हत्यारांसह दुकानात घुसलेल्या या लुटारूंनी थेट गोळीबार करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि सोन्याच्या दागिन्यांची लूट करून पोबारा केला. या घटनेमुळे संपूर्ण नाशिकमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 'न्यू समृद्धी ज्वेलर्स'मध्ये घडली आहे. या संपूर्ण थराराचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यात दरोडेखोरांचा राडा आणि महिला दुकान मालकाने दाखवलेले धाडस स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

बंदुकेचा धाक आणि महिलेचा अभूतपूर्व प्रतिकार


रात्री दुकान बंद करण्याची लगबग सुरू असतानाच, तीन दुचाकींवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने दुकानात अचानक प्रवेश केला. त्यावेळी दुकानाच्या मालकीण नयना पगारिया, एक महिला कर्मचारी आणि अमित श्रीमाळी हे कर्मचारी उपस्थित होते. आरोपींनी थेट त्यांच्यावर पिस्तूल रोखले आणि विरोध केल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली. मात्र, या जीवघेण्या प्रसंगातही नयना पगारिया यांनी जराही न डगमगता त्या सशस्त्र दरोडेखोरांशी दोन हात करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्यांना कडवा विरोध केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आणि दुकान मालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, लुटमारीला विरोध होताच एका दरोडेखोराने दुकानात गोळीबार केला, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यादरम्यान, दुकानातील धाडसी कर्मचारी अमित श्रीमाळी यांनी दरोडेखोरांना पकडण्याचा आणि त्यांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, आरोपींनी त्यांच्यावर क्रूरपणे हल्ला चढवला.


डोक्यावर पिस्तुलाचे वार, कर्मचारी 'आयसीयू'मध्ये


पोलिसांनी सांगितले की, दरोडेखोरांनी अमित श्रीमाळी यांच्या डोक्यावर पिस्तुलाच्या मागच्या भागाने सपासप वार केले. या अमानुष मारहाणीत श्रीमाळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

"मी अजिबात घाबरले नाही..." मालकिणीने सांगितला थरार


या भयंकर प्रसंगाचे वर्णन करताना नयना पगारिया म्हणाल्या की, गोळीबार होऊनही त्यांनी आपला प्रतिकार थांबवला नाही. "आम्ही दुकानातील दागिने पिशव्यांमध्ये भरत होतो, तितक्यात तोंडाला रुमाल बांधलेले सहा जण आले आणि त्यांनी थेट आमच्यावर बंदुका रोखल्या. मी अजिबात घाबरले नाही आणि त्यांना रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला," असे त्या म्हणाल्या. नयना पगारिया पुढे म्हणाल्या, "माझा सहकारी श्रीमाळी यानेही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मी दरोडेखोरांना पळवून लावण्यासाठी काऊंटरवरून थेट त्यांच्या अंगावर ताट भिरकावले आणि त्यांना पकडण्यासाठी मी काऊंटरवरही चढले." त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि आरडाओरडीमुळे दरोडेखोरांचे धाबे दणाणले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी दागिन्यांचे काही बॉक्स घेतले आणि तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि विविध पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. उर्वरित फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात असून लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Add Comment

IDFC Bank Scam : IDFC बँक घोटाळ्यात CBI ची मोठी कारवाई; 6 IAS अधिकाऱ्यांची आरोपपत्रात नावे

चंदीगड : हरियाणा सरकारच्या विविध विभाग आणि संस्थांशी संबंधित कथित ₹504 कोटींच्या IDFC First Bank घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल स्थगित करावा 

मंत्री आदिती तटकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय

Government Canteens : चहा-समोसा विसरा! सरकारी बैठका आणि उपहारगृहांमध्ये आता पौष्टिक मेन्यू

मुंबई : महाराष्ट्रातील शासकीय उपहारगृहे तसेच सरकारी बैठका आणि विविध कार्यक्रमांमध्ये आता आरोग्यदायी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाची उघडीप कायम; विदर्भ-मराठवाड्यात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून अनेक भागांत पावसाची उघडीप पाहायला मिळत

Nepal Flood 2026 : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील नागरिक बेपत्ता; नातेवाईकांच्या मदतीसाठी MMRC कडून राज्यव्यापी मोहीम

मुंबई : नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे अनेक जण बेपत्ता झाल्याने महाराष्ट्रातील कुटुंबांची चिंता वाढली आहे.

Mumbai Sawantwadi Daily Express : मुंबई-सावंतवाडी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून दैनंदिन एक्सप्रेस सेवा सुरू

मुंबई : कोकणातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज