Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा. कल्वर्टच्या पातमुखाला मजबूत (टिकावू) जाळ्या बसवाव्यात. जेणेकरून लोकवस्तीतून पावसाच्या पाण्याबरोबर येणारा कचरा नाल्यांमध्ये अडकणार नाही. तसेच पातमुखाला अडकलेला कचरा काढून पावसाळ्यापूर्वी सर्व कल्वर्टची स्वच्छता करावी. रेल्वे रुळांवर आणि रेल्वे स्थानक शेजारील परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये, तसेच जोरदार पावसावेळी मुंबई पूरमुक्त राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाला दिल्या.



पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. या अंतर्गत स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे यांनी पूर्व उपनगरांतील नालेस्वच्छता आणि रेल्वे कल्वर्टच्या सफाई कामांची सोमवारी १८ मे २०२६ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान शिंदे यांनी रेल्वे कल्वर्ट, नालेसफाई, पाणी उपसा करणारे उदंचन पंप आदी कामांचा आढावा घेतला. पूर्व उपनगरातील मुलुंड (पूर्व) मधील देवीकृपा गृहनिर्माण संस्था येथील नीलम नगर नाल्यावरील कल्वर्ट, मुलुंड (पूर्व) येथील रेल्वे यार्ड मधील नानेपाडा नाल्यावरील रेल्वे कल्वर्ट, उषानगर येथील नाल्यावरील रेल्वे कल्वर्ट, कांजुरमार्ग (पश्चिम) येथील क्रॉम्प्टन नाल्यावरील कल्वर्ट, घाटकोपर (पूर्व) मधील देवकीबाई चाळ येथील गौरीशंकर वाडी नाला कल्वर्ट आणि विद्याविहार (पूर्व) येथील रेल्वे स्थानकाशेजारील जॉली जिमखाना नाल्यावरील रेल्वे कल्वर्टची प्रभाकर शिंदे यांनी पाहणी केली. स्थानिक नगरसेविका राखी जाधव, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) सुनीलदत्त रसाळ, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पूर्व उपनगरे) संजय इंगळे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता सचिन पांचाळ यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.



मुलुंड (पूर्व) येथील रेल्वे यार्डातील नानीपाडा नाल्यावरील कल्वर्टच्या पाहणीदरम्यान नाल्याच्या पश्चिम बाजुला मोठी लोकवस्ती असून त्या लोकवस्तीतील कचरा थेट नाल्यात येत असल्याचे आढळून आले. हा कचरा थेट मोठ्या नाल्यात वाहत येत असल्याने नाला तुंबण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेता लोकवस्ती असलेल्या पश्चिम बाजुच्या पातमुखाला मजबूत लोखंडी जाळ्या बसवाव्यात. जेणेकरून कचरा थेट नाल्यामध्ये येणार नाही, अशा सूचना शिंदे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.



सध्या सुरू असलेली नाले स्वच्छतेची कामे समाधानकारक आहेत. परंतु, पावसाचे पाणी साचू नये यासाठी कामाला वेग देऊन उर्वरित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत. नाले स्वच्छतेची सर्व कामे झाली तर यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही, यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाचा समन्वय महत्त्वाचा आहे. योग्य समन्वय ठेवून दोन्ही प्रशासनाने कामे करावीत, असे शिंदे यांनी नमूद केले.



कांजुरमार्ग (पश्चिम) येथील टोयो इंजिनिअरिंग कंपनी जवळील क्रॉम्प्टन नाल्यावरील कल्वर्टसह इतर सर्व कल्वर्टच्या भिंतींची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करावी. तसेच कल्वर्टची पातमुखे आणखी विस्तारित होतील, याकडे रेल्वे प्रशासनाने अधिक प्राधान्याने लक्ष द्यावे. कल्वर्टच्या पातमुखाला लागून असलेल्या रेल्वेच्या केबल जमिनीपासून जास्तीत जास्त अंतरावर राहतील, याची काळजी घ्यावी. जेणेकरून या केबल्समध्ये वाहून येणारा कचरा अडकणार नाही. एकूणच, यंदा मुंबईत पाणी न साचता पूरमुक्त मुंबईसाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश शिंदे यांनी दिले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने