Pune Drink and Drive Case : पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्ह! कार थेट पुलावरून खाली पडली

पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या डेक्कन (Deccan) परिसरात पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेली कार थेट गरवारे पुलाचे रेलिंग तोडून खाली कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पुण्यातील वाढत्या बेदरकार वाहनचालकांमुळे शहरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५मे रोजी मध्यरात्रीनंतर साधारण १:३० वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडली. आरोपी तरुण अथर्व अमित जैन हा जंगली महाराज रस्त्याने डेक्कन जिमखाना परिसरातून आपल्या कारने जात होता. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर तुलनेने कमी वाहतूक होती. याचाच फायदा घेत आरोपीने भरधाव वेगात आणि अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवले.



डेक्कन जिमखाना येथील गरवारे पुलावरून गुडलक चौकाच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर कारने पुलाच्या रेलिंगला जोरदार धडक दिली. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, पुलाचे लोखंडी रेलिंग तोडून कार थेट खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक आणि इतर वाहन चालक घटनास्थळी धावून आले.


अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुलाखाली कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा या अपघातात अनेकांचा जीव जाऊ शकला असता, अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये होती. विशेष म्हणजे अपघाताच्या वेळी आरोपी तरुण दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.



या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आरोपी अथर्व अमित जैन (वय १९) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच अपघातग्रस्त कार (क्रमांक MH 31 FR 5863) जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.


दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुण्यासारख्या वर्दळीच्या शहरात तरुणांकडून होणाऱ्या अशा बेदरकार वाहनचालकांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात वाढत्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांमुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी