विठूची पुरणपोळी भक्तीचा उत्सव

"शिखरशिंगणापुरची आख्यायिका जुनी..."
"विठ्ठलाला पुरणपोळी अर्पणाची धुनी..."
"वाद नको नियमांचा, भावच खरी कळी..."
"भक्तीच्या ओंजळीतच देवाची खरी गळी..."
पुरणपोळीच्या नैवेद्याच्या ताटाभोवती पाणी फिरवून जेव्हा ब्राह्मणाच्या पंक्तीत “हर हर महादेव” असा गजर होऊन ब्राह्मण भोजनाची सुरुवात झाली आणि माझ्या भाविक मनाच्या पटलावर हे शब्द सहजच उमटून गेले. चैत्री एकादशीला पंढरपुरी पुरणपोळीच्या नैवेद्याभोवती उठलेला वाद म्हणजे जणू मृदुंग आणि वीणेचा आहे, नियमांचा मृदुंग आणि परंपरेची वीणा यांचा. नियमांचे मृदुंग कठोर सूर छेडतात तर परंपरेची वीणा भावकाव्याचा गोड नाद उमटवते. शिखर शिंगणापूरच्या आख्यायिकेतून उमटलेला हा नाद आजही भक्तांच्या अंतःकरणात झंकारतो. चैत्र शुद्ध एकादशीला शनी शिंगणापूर येथे महादेवाच्या विवाहाच्या पंक्तीत विठूराया प्रसाद भक्षण करतो, म्हणून विठ्ठलाला गेली तीनशे वर्षे या तिथीला पुरणपोळी अर्पण केली जाते. ही परंपरा म्हणजे श्रद्धेच्या गंधाने भरलेली ओंजळ, जी भक्तीच्या दीपाला उजळते.



वाद करणाऱ्यांना ती उपवासभंग वाटते, पण भक्ताला ती परंपरेची सुवासिक फुलं वाटतात. जसं नदीला प्रवाहाशिवाय अर्थ नसतो, तसंच भक्तीला भावाशिवाय तेज नसतं. पुरणपोळी ही त्या भावाची गोड चव आहे. देवाला पदार्थाची भूक नाही, तो तर प्रेमाचा भुकेला आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराजांनी कोळी भक्ताचे मासे स्वीकारले, कारण त्यामागे श्रद्धेचा ओलावा होता. त्याच धाग्यावर विठ्ठल पुरणपोळी स्वीकारतो, कारण त्यामागे भक्तांचा विश्वास आणि महादेवाच्या विवाहाची आख्यायिका गुंफलेली आहे. म्हणूनच तर नियमांच्या चौकटीत अडकून राहिलो तर आपण भोगपरायणतेकडे जाऊ; पण भावाच्या ओंजळीतून अर्पण केलेले अन्न मुक्तीचा मार्ग खुला करते. पुरणपोळीचा नैवेद्य हा वाद नव्हे, तर भक्तीचा उत्सव आहे. श्रद्धेच्या निरांजनाने उजळलेली ही परंपरा सांगते की, देवाला हवे आहे ते प्रेमाचे दीप, पदार्थाचे अवडंबर नव्हे.



भारताची सांस्कृतिक परंपरा म्हणजे जणू विविध रंगांनी विणलेली जरतारी चादर. प्रत्येक प्रदेशाचा आपला खास नैवेद्य असतो, पण त्यामागचा भाव मात्र एकच भक्तीचा. महाराष्ट्रात पुरणपोळी ही नैवेद्याची राणी मानली जाते. गूळ आणि चण्याच्या डाळीचे वेलचीच्या स्वादाचे गोड सारण भरलेली ही मऊसूत गव्हाची पोळी आणि सोबत साजूक तूप आणि कधी कधी आमरस देखील म्हणजे जणू श्रद्धेचा सुवासिक दीपच. चैत्री एकादशीला विठ्ठलाला पुरणपोळी अर्पण केली जाते आणि भक्तांच्या मनात गोडीचा भाव उमटतो.

दक्षिण भारतात मात्र नैवेद्याचा रंग वेगळा. तेथील पायसममध्ये दूध, तांदूळ आणि गूळ यांचा सुरेल संगम असतो, जो देवाला अर्पण केला जातो. पायसम म्हणजे जणू भक्तीच्या प्रवाहात मिसळलेली गोड लय. उत्तर भारतात खीर हीच भूमिका निभावते. दूध, तांदूळ आणि साखरेचा हा गोड संगम म्हणजे श्रद्धेची ओंजळ. प्रत्येक प्रदेशात पदार्थ वेगळा असला तरी त्यामागचा भाव एकच देवाला अर्पण केलेली प्रेमाची ओंजळ.
कोकणात मात्र नैवेद्याला समुद्राचा स्पर्श आहे. तिथे नारळ, गूळ-वेलची एकत्रित करून तांदळाच्या पारित भरून केलेल्या उकडीच्या पांढऱ्याशुभ्र मोदकात जेव्हा साजूक तुपाची धार पडते तेव्हा तो नैवेद्य गणपती बाप्पाला भक्ताच्या मदतीला धावून येण्याच्या वाचनाला जगण्याकरिता दिलेला टोळच असतो जणू. समुद्राच्या लाटांमध्ये भक्तीचा गंध मिसळलेला हा नैवेद्य म्हणजे मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या प्रवासातील देवाने आपली सोबत आपला सखा, आनंद यात्री व्हावे म्हणूनच केलेला प्रवास आहे. गौरीपूजनातही नैवेद्याला विशेष स्थान आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणून गौरीला नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्या अर्पणात घरातील स्त्रियांच्या श्रद्धेचा गोड सुवास पसरतो.



हे सारे भारतातील आहे, पण आखाती देशात जिथे हिरवाई नाही, पाण्याचे देखील दुर्भिक्ष आहे तिथे देवाला मांस हाच नैवेद्य अर्पित केला जातो. पण म्हणून तेथील भक्तांचा भाव हा त्यांच्या देवाप्रती काही वेगळा असता नाही. त्यामुळे भाव तिथे देव हेच खरेतर विश्वाचे नव्हे तर माणुसकीचे तसेच भक्तीचे बीज आहे, नाही का ?
म्हणूनच या सर्व प्रांतिक नैवेद्यांचा सार एकच देवाला पदार्थाची भूक नाही, तर भावाची आहे. पुरणपोळी असो, पायसम असो, खीर असो नारळ-गुळाचा नैवेद्य असो किंवा अगदी मांस असो देवाला प्रिय आहे ती भक्तीची गोडी. जसं नदीचे प्रवाह वेगवेगळ्या दिशांनी वाहतात पण शेवटी समुद्रात विलीन होतात, तसंच प्रत्येक प्रदेशाचा नैवेद्य शेवटी भक्तीच्या महासागरात मिसळतो. म्हणूनच नैवेद्य मग तो कुठलाही असो हा वादाचा विषय नसून भक्तीचा उत्सव आहे. पदार्थ वेगळे असले तरी भाव एकच आहे श्रद्धेचा दीप, प्रेमाची ओंजळ आणि भक्तीचा सुवास.

इथे मला संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या कोळी भक्ताची कथा आठवते. एकदा महाराजांच्या एका कोळी भक्ताने आपल्या साध्या जीवनातून मिळालेला मासा महाराजांना अर्पण केला. त्याच्या मनात नियमांची चौकट नव्हती, तर श्रद्धेचा ओलावा होता. महाराजांनी तो मासा स्वीकारला पण, पारंपरिक भक्तांना भात नाराज झाले तेव्हा योग सामर्थ्याने महाराजांनी तो मासा जसाच्या तसा जिवंत उलटीद्वारे बाहेर काढला आणि म्हणाले “भूतदया दाखवणे किंवा प्राणीमात्रांना जीवदान देणे हे आपले आद्य कर्तव्य आहेच पण निशंक तसेच निर्भेळ भक्तीचा भाव हा अर्पणाच्या पदार्थापेक्षा श्रेष्ठ आहे. देवाला अन्नाची भूक नसते, तर प्रेमाची भूक असते.” अर्थात बाहेरून पाहणाऱ्याला तो अर्पण नियमभंग वाटला असेल, पण महाराजांनी तो स्वीकारला कारण त्यामागे होती श्रद्धेची ओंजळ.



जसं फुलाला सुगंध त्याच्या पाकळ्यांतून येतो, तसंच भक्तीचा सुवास अर्पणाच्या भावातून येतो. मासा हा फक्त बाह्य पदार्थ होता, पण त्यामागे कोळी भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा सुगंध होता. महाराजांनी तो स्वीकारला म्हणजे जणू सूर्याने ढगांच्या आडूनही प्रकाश पसरवावा तशा भावाने तेज अंधार वितळवतं. ही कथा म्हणजे भक्तीच्या महासागरातील एक लाट आहे. प्रत्येक लाट वेगळी दिसते, पण तिचा गाभा समुद्राशी जोडलेला असतो. पुरणपोळी असो वा मासा हा एकच श्रद्धेचा प्रवाह. जसं बासरीला चीर पडल्याशिवाय स्वर जन्मत नाहीत, तसंच भक्तिभावाशिवाय अर्पणाला अर्थ नसतो. गजानन महाराजांच्या या कथेतून स्पष्ट होतं की, नियमांच्या चौकटीत अडकून राहणं म्हणजे कुंपणात अडकलेल्या वेलीप्रमाणे आहे, ती वाढते पण फुलत नाही. भावाच्या ओंजळीतून अर्पण केलं की, ती वेल फुलांनी बहरते. म्हणूनच तर सर्वच संतकथा आपल्याला शिकवतात की, देवाला प्रिय आहे ती प्रेमाची ओंजळ, श्रद्धेचा दीप आणि भक्तीचा सुवास. पदार्थ हा फक्त निमित्त असतो, पण भाव हा खरा नैवेद्य असतो.

भक्ती ही केवळ परंपरेत गुंफलेली नसते, तर ती मनाच्या गाभ्यातून उमलणारी असते. अर्पण केलेल्या पदार्थाचा आकार वा स्वरूप देवाला महत्त्वाचा नसतो त्यामागे असलेला भावच त्याला प्रिय असतात. म्हणूनच विविध प्रदेशांत वेगवेगळ्या नैवेद्याच्या परंपरा दिसतात, तरी त्यांचे सार एकच असते आणि ती म्हणजे श्रद्धेची ओंजळ. संतकथांनी आपल्याला शिकवलेच आहे की, भक्ती ही नियमांच्या चौकटीत अडकलेली नसून ती मुक्त प्रवाहासारखी असते. जिथे प्रेमाचा ओलावा आहे, तिथे देवाचा स्वीकार आहे. पुरणपोळीचा वाद हा प्रत्यक्षात भक्तीच्या गोडीचा उत्सव आहे. ही परंपरा आपल्याला सांगते की देवाशी नाते जोडण्यासाठी पदार्थ नव्हे, तर अंतःकरणातील प्रेम आणि श्रद्धा आवश्यक आहे. भक्तीचा हा उत्सव आपल्याला एकात्मतेचा, करुणेचा आणि प्रेमाचा मार्ग दाखवतो आणि हाच मार्ग जीवनाला खऱ्या अर्थाने उजळवतो.

___ऋतुजा केळकर
Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये