कहत कबीर सुनो भाई साधो...

भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी


अत्यंत शुभ असा ब्रह्ममुहूर्ताचा समय होता. रात्रीच्या काळोखालाच जणू स्वतःला उजळून घेण्यासाठी पहाटेची आंस लागली होती. नक्षत्रांच्या अस्फुट तेजात गंगेचे पाणी चमकत होते. गंगेच्या घाटाच्या पायरीवर वसलेले कबीर याचवेळी आपल्या सद्गुरूंची वाट पाहात होते. गंगास्नानासाठी तेथे नित्य येणारे स्वामी रामानंद आजही तेथे येऊन घाटाच्या पायऱ्या उतरू लागले. अजून पुरते उजाडले नसल्याने अंधारात त्यांचा पाय गुरूदीक्षेसाठी आतुरलेल्या शिष्याला लागला. स्वामींच्या तोंडून 'राम राम' शब्द बाहेर पडले. ते शिष्याच्या अंतःकरणात तत्क्षणीच कोरले गेले.'राम' ही फक्त दोन अक्षरे, पण संत कबिरांना त्यात साऱ्या अध्यात्माचे रहस्य गवसले. नानाविध भेदांनी भरलेले हे जग एका आत्मारामात सामावले

असल्याची त्यांना प्रतीती आली.
भेद नही अभेद हुवा
मन राम भयो जग सारा।।
कहत कबीर सुनो भाई
साधो जगमो रहकर न्यारा।।

संत कबिरांच्या व्यक्तिमत्त्वात विविध पैलूंचे अद्भुत रसायन होते. ते जसे भक्त होते तसेच तत्त्वज्ञ, योगी, सिद्ध साधकही होते. अज्ञान, अंधश्रद्धेने पछाडलेल्या जनसामान्यांच्या उद्धाराचा त्यांना विलक्षण कळवळा होता. ते स्वतः कुठल्याही एका धर्मसंप्रदायाच्या चौकटीत अडकले नाहीत. सर्व धर्मांच्या, संप्रदायांच्या उत्तमोत्तम तत्त्वांचा त्यांनी उत्कृष्ट समन्वय केला. अद्वैत वेदान्ताचा पुरस्कार मात्र त्यांनी प्राधान्याने केलेला दिसतो. त्यांची भक्ती पराविद्येने संपन्न, डोळस होती.

घुंगट का पट खोल तुझे राम मिलेगा।
घट घट बिच मे रामरमैया
झुटा पचरंग खोल।।
शून्य मेहेलमे दीप बिराजे
बाजे अनुहत ढोल।।
कहत कबीर सुनो भाई
साधो रामनाम भर तोल



कबीर म्हणतात, “देह म्हणजेच मी, या भावनेचा घुंगट दूर करून पाहा. तुला स्वतःमध्ये तसेच या चराचरामध्ये भरलेला राम मिळेल. अहंकारशून्य अंतःकरणातच ज्ञानदीप तेवतो, अनाहत नादाचा ढोल वाजतो. तू रामनाम तोलून भरभरून आत्मसुख घे.”कबिरांनी व्यापक नैतिक नियमांच्या पालनाचा सदैव आग्रह धरला,छोटीसी जिंदगानी उपर क्या मगरुरी करना।।क्या ले आया क्या ले जायेगा कायकु गाफल करना।।असे क्षणभंगुर जीवनाचे चित्र रंगवून अंतिम सत्याचा शोध घेण्यास ते प्रवृत्त करतात. आजची जीवनशैली कितीही बदललेली असली तरी इ. स.च्या पंधराव्या शतकातला हा संत आजही आपणास चुकलेल्या वाटेवरून योग्य मार्गाकडे येण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करू शकतो. ज्येष्ठ पौर्णिमा हा कबिरांचा जन्म दिवस. पतीच्या अपमृत्यूला टाळणाऱ्या सावित्रीचे पूजन जसे या दिवशी करावयाचे तसेच या दिवशी आपणास नैतिक अधःपतनापासून वाचवून सर्वात्मकतेकडे नेणाऱ्या संत कबिरांचेही स्मरण करून त्यांना मनोभावे वंदन करावयाचे.



'बीजक' हा संत कबीर यांच्या मूळ शिकवणींचा आणि रचनांचा सर्वात मुख्य, अधिकृत आणि पवित्र ग्रंथ मानला जातो. कबीरपंथीय अनुयायांसाठी हा ग्रंथ अत्यंत आदरणीय आहे.'बीजक' या शब्दाचा अर्थ 'गुप्त धन किंवा रहस्य सांगणारे शब्द' असा होतो. ज्याप्रमाणे जमिनीत पुरलेले गुप्त धन शोधण्यासाठी एका सांकेतिक शब्दाची गरज असते, त्याचप्रमाणे मानवी मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून आत्मज्ञानाचे गुप्त धन मिळवून देणारा हा ग्रंथ आहे, अशी मान्यता आहे. संत कबिरांनी स्वतः या ग्रंथाचे लेखन केले नाही, ते म्हणतात "मसि कागद छूयो नहीं, कलम गह्यो नहिं हाथ" पण स्वतः रचलेली पदे मात्र त्यांच्या मुखातून निघत असत. त्या पदांचे आणि दोह्याचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून कबिरांचे मुख्य शिष्य भागोदास आणि धर्मदास यांनी ते संकलित करून ग्रंथबद्ध केले. त्यांनी 'बीजक' ग्रंथाची विभागणी वेगवेगळ्या काव्यप्रकारांत केली कारण प्रत्येक भागाचा एक विशिष्ट उद्देश आहे.
या ग्रंथातील रमैनी या प्रकारामध्ये कबिरांनी जगाची उत्पत्ती, अध्यात्म आणि माया यावर प्रकाश टाकला आहे. हे चौपाई छंदात लिहिले आहे.

शब्द या प्रकारात संगीतमय पदे (गाणी) आहेत. यात बाह्य कर्मकांडांवर कडक टीका करत अंतरंगातील ईश्वराचा शोध घेण्याचा संदेश दिला आहे.साखी नावाचा या ग्रंथात अजून एक प्रकार आहे. साखी म्हणजे साक्षी. यामध्ये कबिरांचे जगप्रसिद्ध दोन ओळींचे दोहे आहेत. यात व्यावहारिक ज्ञान, नीतिमत्ता आणि गुरूचे महत्त्व सांगितले आहे. उदा.ऐसी बानी बोलिये,मन का आपा खोय |औरन को शीतल करै,आपहु शीतल होय ||माणसाने आपल्या मनातील अहंकार बाजूला ठेवून इतरांशी नेहमी अत्यंत नम्र आणि गोड भाषेत बोलले पाहिजे. अशा शब्दांमुळे ऐकणाऱ्या व्यक्तीचे मन शांत आणि आनंदी होतेच, पण तसे गोड बोलल्यामुळे बोलणाऱ्याच्या स्वतःच्या मनालाही एक वेगळाच संतोष आणि शीतलता लाभते.त्यांची अजुन एक साखी बघु या,बुरा जो देखन मैं चला,बुरा न मिलिया कोय |जो दिल खोजा आपना,मुझसे बुरा न कोय ||



कबीर म्हणतात की, मी आयुष्यभर इतरांमधील वाईट गोष्टी आणि दोष शोधत फिरत होतो; पण मला समाजात कोणीही पूर्णपणे वाईट माणूस सापडला नाही. मात्र, जेव्हा मी अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनात डोकावले आणि स्वतःचे आत्मपरीक्षण केले, तेव्हा मला जाणीव झाली की, इतरांपेक्षा जास्त दोष आणि वाईट विचार तर माझ्याच मनात आहेत. म्हणजेच, इतरांवर बोट ठेवण्यापूर्वी माणसाने आधी स्वतःच्या चुका सुधारल्या पाहिजेत.संत कबिरांचे काव्यात असा विलक्षण पारदर्शीपणा होता. त्यांचे काव्य अतिशय मर्मग्राही दांभिकतेवर प्रहार करणारे होते. त्यांनी कर्मकांडाचा, अंधश्रद्धेचा कडाडून विरोध केला. त्यांची निर्गुण परमात्म्यावर श्रद्धा होती. कोरड्या पूजापाठापेक्षा नैतिक वागणूक त्यांना महत्त्वाची वाटे.हिंदू-मुस्लीम दोघांच्या दोषांवर त्यांनी टीका केली.काँकर पाथर जोरि कै,मसजिद लई बनाय |ता चढ़ि मुल्ला बाँग दे,क्या बहरा हुआ खदाय ||खडे आणि दगड एकत्र करून मशीद तर बांधली, पण त्यावर चढून मुल्ला एवढ्या मोठ्याने बांग का देतो? देव काय बहिरा आहे का? तो तर मनातील हळू आवाजही ऐकू शकतो.जातीभेदाचाही त्यांनी निषेध केला.जाति पाति पूछे नहिं कोई |हरि को भजै सो हरि का होई ||अर्थ: देवाला किंवा निसर्गाला माणसाची जात विचारण्यात रस नाही. जो चांगल्या भावनेने सत्याची सेवा करतो, तोच देवाचा होतो. माणूस हा जन्माने नाही, तर कर्माने श्रेष्ठ ठरतो. एकंदरीत संत कबीर ही अशी विभूती होती की ती सर्वांशीच आत्मीय भावाने निगडीत होती. कोणत्याही धर्म, पंथात बंदिस्त नव्हती. तर केवळ मानवाला जीवनाचे मूळतत्त्व समजावून सांगत नैतिकतेच्या पथावरून नेणारी होती. ‘राम’ या शब्दात जो हृदयाला मिळणारा आराम, शांती आणि असीम आनंद भरलेला आहे, तो सर्वांनी लुटावा, हेच त्यांचे जीवनध्येय होते.
Comments
Add Comment

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत एका दिवशी पडणार दोन माळ, अष्टमी आणि नवमी तिथीबाबत जाणून घ्या

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. देवीच्यी नऊ रुपांची