Eknath Shinde : उबाठाच्या ६ बंडखोर खासदारांचा शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती दिला भगवा; लोकसभा अध्यक्षांकडे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची प्रतिक्रिया



मुंबई : 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत बंडखोरी केलेल्या उबाठा गटाच्या सहा खासदारांनी सोमवारी (दि. २२) शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हाती भगवा दिला. त्याचवेळी, "कायद्याच्या आणि संसदीय चौकटीत लोकसभा अध्यक्षांकडे आम्ही ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आम्ही कोणतेच ऑपरेशन अर्धवट करीत नाही, फुल प्रुफ करतो. आज सगळे तुमच्यासमोर आहे. 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाले आहे", अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.


यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर बंडखोर खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, रामदास कदम उपस्थित होते. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आज व्यासपीठावर शिवसेनेचे सहा 'टायगर' उपस्थित आहेत. माध्यमांनी ज्याला 'ऑपरेशन टायगर' नाव दिले होते, ते आज शंभर टक्के यशस्वी झाले आहे. विशेष म्हणजे आमच्याकडे आता 'ट्रिपल संजय' आले आहेत. खासदार संजय जाधव, संजय दिना पाटील आणि संजय देशमुख. त्यामुळे आता बाकी संजयची (संजय राऊत) गिनती शून्य झाली आहे, त्याचे नाव घेण्याचीही मला गरज वाटत नाही. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ विचारांवर निष्ठा ठेवणारे कट्टर शिवसैनिक खासदार खऱ्या शिवसेना परिवारात सामील झाले आहेत", असेही ते म्हणाले.



उबाठा गटाने केलेल्या तुडवा-तुडवीच्या भाषेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, "आम्ही कोणाला उगाच अडवायला किंवा कोणाला तुडवायला आलेलो नाही, तर बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्रभर वाढवायला आलो आहोत. पण, जर कोणी आमच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हाला आडवे आले, तर त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अस्सल हिसका काय असतो, हे दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कुणीही मालक नाही, आम्ही सगळे एकमेकांचे सहकारी आहोत. एकनाथ शिंदे देखील तुमच्यासोबत मुख्य नेता म्हणून नाही, तर एक साधा कार्यकर्ता म्हणून वागेल. या सर्व ६ खासदारांचा आणि त्यांच्यासोबत आलेल्या हजारो कार्यकर्त्यांचा मानसन्मान पक्षात राखला जाईल. राज्यात आणि केंद्रात 'डबल इंजिन' सरकार आहे, त्यामुळे तुमच्या मतदारसंघातील विकासाचा एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही, हा विश्वास मी देतो," असा शब्द शिंदेंनी दिला.




आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही!
शिंदे पुढे म्हणाले, "चार वर्षांपूर्वी २२ जून २०२२ रोजी आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांची विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी उठाव केला होता. तेव्हा सुरुवातीला आमच्यासोबत ४० आमदार आले होते. त्यावेळी विरोधक म्हणायचे की हे परत निवडून येणार नाहीत, मात्र आम्ही ४० चे ६० आमदार करून दाखवले. चांदा ते बांदापर्यंत शिवसेना भक्कम केली. आता आपल्या या लढ्याचा 'दुसरा टप्पा' सुरू झाला आहे. खासदारांच्या या पक्षप्रवेशामुळे आमची ताकद आता शतपट वाढली आहे. ऑपरेशन टायगरबाबत मला अनेक जण विचारत होते, त्यांना मी कालही सांगितले होते की, आम्ही कोणतेही ऑपरेशन कधीच अर्धवट सोडत नाही, 'फुल प्रुफ' करतो. चित्र आज तुमच्यासमोर आहे. 'मैने एक बार कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नही सुनता!', असा डायलॉग ऐकवत त्यांनी उबाठा गटाला चिमटा काढला.




ओमराजे निंबाळकर 'रियल स्टार'
एकनाथ शिंदे यांनी यावेळी पक्षप्रवेश केलेल्या सर्व ६ खासदारांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. संजय जाधव हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत, तर संजय दिना पाटील हे गरिबांचे कैवारी आणि मैत्री जपणारे नेते आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, "ओमराजे हे मनाचे राजे आहेत. त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि कुटुंबाच्या न्यायासाठी आमच्यासोबत येण्याचा धाडसी निश्चय केला. काही लोकांनी त्यांना सोशल मीडियावरून हिणवले, त्यांना 'रील स्टार' म्हटले. पण मी सांगू इच्छितो, ओमराजे हे रील स्टार नसून जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे 'रियल स्टार' आहेत." तसेच संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे सर्वच नेते मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी खऱ्या शिवसेनेत आले असून, त्यांच्या राज्यातील आणि केंद्रातील सर्व अडचणी सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांसोबत विशेष बैठक लावणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी