Thursday, October 15, 2026

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली जात असून, तपासाला प्रचंड वेग आला आहे. आतापर्यंत या गुन्ह्याशी संबंधित तब्बल १० जणांचे अधिकृत जबाब नोंदवण्यात आले आहेत. शुक्रवारी मुख्य आरोपी सियाचा भाऊ साहिल याची कसून चौकशी केल्यानंतर, आज पोलिसांनी थेट सियाच्या आई-वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण केले. लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या नेतृत्वाखाली ही सखोल चौकशी सुरू असून, यातून अनेक गुपिते उलगडण्याची शक्यता आहे.

"आमची मुलगी दोषी असेल, तर तिलाही..."

या भयंकर कटामुळे सियाच्या कुटुंबालाही मोठा मानसिक धक्का बसला आहे. लोणावळा पोलीस ठाण्यात सलग दोन तासांहून अधिक काळ सियाच्या आई-वडिलांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान एका क्षणी उद्विग्न झालेल्या तिच्या पालकांनी पोलिसांसमोरच आपला संताप आणि हतबलता व्यक्त केली. "जर या हत्या प्रकरणात आमची मुलगी सिया खरोखरच दोषी असेल, तर केतनला ज्या ठिकाणावरून दरीत ढकलून दिले, अगदी त्याच ठिकाणावरून तिलाही दरीत ढकलून द्या," अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस त्यांना सोडून देणार आहेत.

पोलिसांनी कोणते ९ प्रश्न विचारले ?

  1. सिया आणि चेतन मित्र होते. त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का?  
  2.  सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का?
  3. सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का?
  4. सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का?
  5. सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का?
  6. लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती. याची तुम्हाला माहिती नव्हती का?
  7. साहिल आणि चेतन मित्र आहेत हे पण तुम्हाला माहित नव्हतं का?
  8. लोहगडावर ते तीन वेळा गेले होते. त्यावेळी सियाने काय कारणं सांगितली होती?
  9.  केतनच्या हत्येचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?

मित्तल कुटुंबाचा जबाबही नोंदवला

या तपासात केवळ सियाचे कुटुंबीयच नव्हे, तर केतन आणि सियाचे लग्न जुळवण्यात महत्त्वाची मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या मित्तल कुटुंबालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रेनू मित्तल आणि नरेंद्र मित्तल यांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. मित्तल आणि अग्रवाल कुटुंबीयांचे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासूनचे अत्यंत घनिष्ठ आणि कौटुंबिक संबंध आहेत. काल प्रवीण गोयल यांनी दिलेल्या मुलाखतीतही या मित्तल कुटुंबाचा संदर्भ आला होता. त्यामुळे लग्नाची जुळवाजुळव करताना दोन्ही कुटुंबांमध्ये नेमकी काय चर्चा झाली होती, याचाही धांडोळा पोलीस आता घेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >