Sachin Ahir : विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड!

- सचिन अहिर निर्भीड आणि न्याय देणारे उपसभापती ठरतील; निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास


- 'तुफान में जो शांत रहे उसे समंदर कहते हैं...' उपमुख्यमंत्र्यांनी शायरीतून केला सचिन अहिर यांचा गौरव


मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे संसदीय परंपरेचा मान राखत शिवसेना (शिंदे गट) नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सचिन अहिर यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला होता. तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (ठाकरे गट) चे जगन्नाथ अभ्यंकर रिंगणात होते. सभागृहातील संख्याबळ पाहता महायुतीचा विजय निश्चित मानला जात असला, तरी सभागृहाचे कामकाज एकमताने आणि परंपरेनुसार चालावे यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षाला आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहाची इच्छा सर्वानुमते निवडीची असल्याचे सांगत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. विरोधी पक्षाने घेतलेल्या या सामंजस्याच्या भूमिकेनंतर सभागृहात आवाजी मतदान घेण्यात आले आणि सचिन अहिर यांची उपसभापतीपदी एकमताने बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती आणि विरोधी पक्षातील सर्व प्रमुख सदस्य सभागृहात उपस्थित होते. (Sachin Ahir)



'सचिन अहिर निर्भीड आणि न्याय देणारे उपसभापती ठरतील' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आणि सभागृहाची उज्ज्वल परंपरा जपत उमेदवारी मागे घेतल्याबद्दल विरोधी पक्षाचेही जाहीर आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी १९९९ सालच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, "मी आणि सचिन अहिर एकाच वर्षी प्रथमच विधानसभेत निवडून आलो होतो. 'अहिर' या शब्दाचा अर्थच मुळात गोपालक आणि निर्भीड असा आहे. ते अत्यंत निर्भीडपणे काम करणारे लोकप्रतिनिधी असून उपसभापतीपदाच्या आसनावर बसल्यानंतर प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याची जबाबदारी ते अत्यंत सक्षमपणे पार पाडतील, असा मला पूर्ण विश्वास आहे." मुख्यमंत्र्यांनी यावेळी माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याही कार्यकाळाचा गौरव केला आणि संघर्षाच्या काळातही त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखत प्रभावी कामकाज चालवल्याचे नमूद केले. तसेच, सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मिल कामगार संघटनेतून राजकारणाची सुरुवात करून सलग तीन वेळा विधानसभेत निवडून येणारे आणि २०१२ मध्ये राज्यमंत्री म्हणून अभ्यासूपणे काम करणारे ते नेतृत्व आहे. तांत्रिक मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, "सचिन अहिर जेव्हा विधान परिषदेत आले, तेव्हा ते धनुष्यबाण चिन्हावरच आले होते, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांनी पक्ष बदललेला नाही."



'एक सचिन निवृत्त झाला, दुसरा मैदान गाजवायला सज्ज' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आपल्या खास शैलीत सचिन अहिर यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. क्रिकेटची उपमा देत उपमुख्यमंत्री म्हणाले, "त्यांच्या नावातच सचिन आहे. एक सचिन (तेंडुलकर) देशाचे नाव उज्ज्वल करून निवृत्त झाला, आता दुसरा सचिन पॅड बांधून नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे आणि हे मैदान तो नक्कीच गाजवेल." सचिन अहिर यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या नावाच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, "प्रत्येकाची काम करण्याची एक वेगळी पद्धत असते आणि प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. आपल्या टीममध्ये ऑलराउंडर आणि विक्रम करणारे खेळाडू असावेत, असे प्रत्येकालाच वाटत असते. मगाशी कोणीतरी म्हटल्याप्रमाणे 'सचिन' हे नावच त्यांचे काम दाखवण्यासाठी पुरेसे आहे. गोलंदाज कोणीही असो किंवा चेंडू कितीही गतीने येऊ दे, सचिन अहिर यांना तो चेंडू नेमका दिसतो आणि त्यांचा फटकाही परफेक्ट असतो." उपमुख्यमंत्र्यांनी सचिन अहिर यांच्या सामाजिक आणि कामगार चळवळीतील कामाचा गौरव करताना, "तुफान में जो शांत रहे उसे समंदर कहते हैं, जो सबके दिल पर राज करते हैं उसे सिकंदर कहते हैं" अशी शायरी सादर करत त्यांचे कौतुक केले. हजारो कामगारांशी नाळ जोडलेले हे नेतृत्व केवळ राजकारणी नसून एक संवेदनशील समाजकारणी आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. (Sachin Ahir)




Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण