Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल


२०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड वर्षात तीन हात नाका वाहतूक कोंडीमुक्त होणार


ठाणे : ठाणे शहराच्या विकासात आणखी एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले असून, आशिया खंडातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या कायमस्वरूपी विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ठाणेकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार असून, शहरातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पांपैकी एक म्हणून त्याची ओळख निर्माण होत आहे.ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यामध्ये इंदिरानगर–रूपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्प, विविध रस्ते व पायाभूत सुविधा तसेच यशवंत रामा आंतरराष्ट्रीय तरण तलाव आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा समावेश होता.



यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री असताना मंजूर केलेला हा सुमारे २०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे तीन हात नाक्यावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या सात प्रमुख वाहतूक प्रवाहांपैकी चार प्रवाह सिग्नलमुक्त आणि सुरळीत होतील. त्यामुळे लाखो वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचणार आहेत.तीन हात नाका हा आशिया खंडातील सर्वाधिक गजबजलेला वाहतूक चौक मानला जातो. या चौकावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून उपाययोजनांची अपेक्षा होती. मात्र, अशक्यप्राय वाटणाऱ्या या प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे मंजुरी मिळाली आणि आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुढील दीड वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानंतर ठाण्याच्या वाहतुकीत आमूलाग्र बदल अनुभवायला मिळणार आहे.



"विकास हीच आमची ओळख आहे. ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. 'ठाणे बदलतंय' ही केवळ घोषणा नसून ती प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू आहे," असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.यावेळी बोलताना विकास हा घोषणांचा नव्हे तर प्रत्यक्ष कृतीचा विषय असल्याचे अधोरेखित करत, "भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी विकासकामे थांबवू नका; सर्व प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा," अशा स्पष्ट सूचना त्यांनी एमएमआरडीएचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना दिल्या. विकासकामांमध्ये कधीही राजकारण केले नाही आणि पुढेही करणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शिंदे म्हणाले की, अनेक प्रकल्प अशक्य वाटत होते; मात्र ठाम इच्छाशक्ती, नियोजन आणि प्रशासकीय समन्वयाच्या बळावर ते पूर्ण करण्यात यश आले आहे. त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई, ठाणे, नाशिक आणि परिसरातील शहरांदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. हे प्रकल्प खऱ्या अर्थाने 'गेम चेंजर' ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



"सोपी कामे कोणालाही करता येतात; मात्र कठीण आणि आव्हानात्मक कामे पूर्ण करण्यातच खरी कसोटी असते," असे सांगत त्यांनी या सर्व प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय मान्यता वेळेत मिळवून दिल्याचे स्पष्ट केले.कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे, छेडानगर, आनंदनगर, साकेत, गायमुख आणि फाउंटनपर्यंतच्या एलिव्हेटेड रोडसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीटी आणि मुंबईकडून येणारी जड वाहतूक शहराबाहेरील मार्गाने वळविण्यात येणार असल्यामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रदूषणात मोठी घट होईल, असेही ते म्हणाले.ठाणे–बोरिवली भुयारी मार्गामुळे अवघ्या २० मिनिटांत प्रवास शक्य होणार असल्याची माहिती देताना त्यांनी बांद्रा–वरसोवा सी-लिंक प्रकल्पात स्थानिक कोळी बांधवांच्या हिताचे पूर्ण संरक्षण केले जाईल, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर याबाबत तातडीने निर्णय घेतल्याची आठवणही त्यांनी करून दिली.पुण्यातील मिसिंग लिंक प्रकल्प, मेट्रो-३, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी मागील काळात रखडलेल्या प्रकल्पांना महायुती सरकारने गती दिल्याचा दावा केला. "आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत," असे सांगत पॉड टॅक्सी, इंटरनल मेट्रो यांसारखे भविष्यातील वाहतूक प्रकल्पही राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.



इंदिरानगर–रूपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्पाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, या भागासाठी स्वतंत्र जलसंप उभारण्याची आवश्यकता अनेक वर्षांपासून होती. मात्र जागेअभावी हा प्रकल्प रखडला होता. २००८ मध्ये आमदार असताना एमआयडीसीची जमीन महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी ७२ लाख रुपये भरून ही जागा उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे आज हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्णत्वास गेला.रूपादेवीचा पाडा पंप आणि इंदिरानगर पंप सुरू झाल्यामुळे नागरिकांना दररोज आणि वेळेवर पाणी मिळणार असून पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी होईल, मुलांच्या शिक्षणावर होणारा परिणाम टळेल आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.



या प्रकल्पामुळे इंदिरानगर, रूपादेवीचा पाडा, साठेनगर, हनुमान नगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसन नगर, भटवाडी, शांतीनगर, वारली पाडा, रामनगर, शिपीतला, जुना गाव आणि कैलासनगर या भागांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. इंदिरानगरसाठी ३१ एमएलडी आणि रूपादेवीचा पाड्यासाठी २१ एमएलडी, अशी एकूण ५२ एमएलडी पाणीपुरवठा क्षमता निर्माण करण्यात आली असून ठाण्याच्या इतिहासात या भागासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा यापूर्वी कधीच झाला नव्हता, असे त्यांनी सांगितले. नगरसेवक एकनाथ भोईर यांनी आणखी ३ एमएलडी पाण्याची मागणी केल्यानंतर त्यालाही सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती वाढ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तीन हात नाका उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, तर रस्ते, मेट्रो आणि पॉड टॅक्सीमुळे ठाण्याची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत या योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.
परिसरातील मुलांसाठी मैदान कायम खुले राहील, या जागेवर कोणतेही बांधकाम होणार नाही, असा शब्द देत रूपादेवी मंदिर परिसर आणि हँगिंग गार्डनच्या सुशोभीकरणासाठी ३० कोटी रुपयांची घोषणा त्यांनी केली.



यशवंत रामा साळवी आंतरराष्ट्रीय तरण तलाव आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनावेळी बोलताना शिंदे यांनी विकासकामांमध्ये राजकारण न करण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. "मुंब्रा परिसरात विकासकामे करताना कोणताही राजकीय भेदभाव केला नाही. जनतेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक कामाला प्राधान्य दिले," असे ते म्हणाले.विरोधी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख करताना त्यांनी नगरविकास मंत्री असताना त्यांच्या मतदारसंघातील कामांच्या फाईलवर रात्री अडीच वाजताही सही केल्याचे सांगितले. तसेच नाट्यगृहासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.यशवंत रामा साळवी आंतरराष्ट्रीय तरण तलाव, इंडोअर स्टेडियम आणि अन्य क्रीडा सुविधा उच्च दर्जाच्या आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या. ठाण्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आनंद दिघे यांचे आधुनिक ठाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत, "कोणालाही बेघर करून विकास करायचा नाही," अशी भूमिका त्यांनी मांडली. वरळीसह विविध भागांतील स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन विकासकामे केली जातील, असेही त्यांनी सांगितले.



एअर ॲम्बुलन्स थेट रस्त्यावर उतरू शकेल, अशा आधुनिक सुविधांची उभारणी, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि पर्यावरणाचा समतोल राखत विकास करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन करत ठाण्याला देशातील अग्रगण्य आणि अत्याधुनिक शहर बनविण्यासाठी सरकार सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.या प्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नगरसेवक विकास रेपाळे, राजेंद्र फाटक, राजेश कदम, मंदार केणी, एकनाथ भोईर, नगरसेविका नम्रता भोसले-जाधव, नगरसेविका मीनल संख्ये, प्रमिला केणी तसेच शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.