दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती
दशदिशा भूपाळी म्हणती
पानोपानी अमृत शिंपित
उषा हासरी हसते धुंदीत
जागी होऊन फुले सुंगधीत
तालावर डोलती... प्रभाती...”
आषाढाच्या पावसांच्या सरीत आशाजींचे हे वसंत प्रभूंच्या बकुल गंधित संगीतात बुडलेले स्वर रमेश अणावकर यांच्या शब्दांना जणू मेघांच्या घनगंभीर वातावरणाला अधिक हलके करत मला माझ्याच नकळत, दशदिशांचे महत्त्व सांगत होती. देवाने निर्माण केलेल्या या दश दिशा म्हणजे एक ब्रह्मांडीय व्यवस्था किंवा दहा दिव्य शक्ती आहेत, जेव्हा जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो, तेव्हा तेव्हा आपल्याला दिसते ते केवळ निळे अथांग आकाश पण, भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने आकाश म्हणजे केवळ रिक्त पोकळी नाही तर ते अनंत शक्तींचे, ऊर्जांचे आणि अदृश्य व्यवस्थेचे विराट विश्व आहे. आपल्या पूर्वजांनी दिशांना केवळ भौगोलिक संकेत मानले नाही, तर प्रत्येक दिशेमागे एक विशिष्ट ऊर्जा, एक अधिपती देवता आणि एक जीवनतत्त्व आहे, असे मानले आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत ‘दशदिक्पाल’ ही संकल्पना अत्यंत गूढ, सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. पूर्वेचा इंद्र जणू सुवर्णकिरणांनी सजलेला परीकथेतील एक तेजस्वी राजकुमार बनून हातात वज्र, डोळ्यांत आशेचा प्रकाश धरतो, तर आग्नेयेत अग्निदेव अगदी लालसर वस्त्रांनी झळकणारा जणू परिवर्तनाची ज्वाला घेऊन उभा असलेला अग्निकुमार. दक्षिणेत यम जो गंभीर, पण न्यायी आहे. ज्याच्या हातात दंड, चेहऱ्यावर कर्माची गडद सावली, जणू जीवनाला जबाबदारी शिकवणारा हा मृत्युदेव. नैऋत्येत ‘विघटन’ म्हणजे हातात खड्ग आणि डोळ्यांत नवसर्जनाची चमक आणि जुने गळून पडावे आणि नवे उमलावे ही आश्वासकता. पश्चिमेत वरुण देवता हातात पाश असून त्याचे वाहन मकर असले तरीही त्याच्या हृदयात करुणेचा अथांग सागर आहे. वायव्येत वायू कुमार ज्याच्या हातात ध्वज असून जो मृगावर आरूढ आहे तो चंचल असला तरीही जीवनाला गती देणारा आहे. उत्तर दिशेत कुबेर धन देवता, गदाधारी आहे; परंतु तो उदारतेने आपल्या संपत्तीला प्रवाह देतो. ईशान दिशेत शिव तत्व जे त्रिशूलधारी, नंदीवर आरूढ, ध्यानमग्न असून ज्ञान, शांती आणि आत्मप्रकाश प्रदान करतो. ऊर्ध्वेत ब्रह्म स्वरूप असून जे हंसावर आरूढ असून हातात चारही वेद धारण करतो जो विचारांची उंची आणि विवेकाची शुद्धता देतो आणि सर्वात शेवटी अधो दिशेत विष्णु स्वरूप असते जे गरुडावर आरूढ असून हातात सुदर्शनचक्रधारी असून ते जीवनाला आधार, संतुलन आणि संरक्षण देते. या दश दिशा म्हणजे दहा शक्ती आणि या सर्वांना जोडणारे एकच अदृश्य तत्त्व म्हणजे तो परमेश्वर!



दहा दिशा म्हणजे केवळ पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण नव्हे. चार मुख्य दिशा, चार कोनदिशा, तसेच ऊर्ध्व आणि अधो अशा दहा दिशांनी हे विश्व व्यापलेले आहे. या प्रत्येक दिशेचा एक दिक्पाल आहे. त्याचे एक विशिष्ट अस्त्र आहे, एक वाहन आहे आणि एक लोक आहे. ही मांडणी केवळ पुराणकथांमध्ये रमणारी कल्पना नसून, निसर्ग, विश्वव्यवस्था आणि मानवी जीवन यांच्यातील सूक्ष्म संतुलन समजून घेण्याचा एक अद्भुत प्रयत्न आहे.
पूर्व दिशा म्हणजे आरंभाची दिशा. या दिशेचा अधिपती आहे इंद्र. त्याचे अस्त्र आहे वज्र, वाहन आहे ऐरावत आणि त्याचा लोक आहे अमरावती. पूर्व म्हणजे उगवता सूर्य. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची पहिली पायरी. म्हणूनच इंद्राच्या हातातील वज्र हे केवळ शस्त्र नाही, ते अज्ञानाचा, अंधाराचा आणि अडथळ्यांचा भेद करणाऱ्या तेजाचे प्रतीक आहे. ऐरावतासारखे विशाल, सामर्थ्यवान आणि स्थिर वाहन म्हणजे शक्ती आणि राजसत्तेचे प्रतीक. प्रत्येक नव्या दिवसाची सुरुवात पूर्वेकडून होते. म्हणूनच जीवनातही प्रत्येक संकटानंतर एक नवा सूर्योदय असतो, ही आशा पूर्व दिशा आपल्याला देते.



आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा. अग्नी म्हणजे शुद्धीकरण, परिवर्तन आणि ऊर्जा. या दिशेचा अधिपती अग्निदेव. त्याचे अस्त्र शक्ती आणि अग्निशिखा, वाहन मेष आणि लोक अग्निलोक. अग्नी जाळतो, पण त्याच वेळी शुद्धही करतो. कच्च्या अन्नाचे पक्क्या अन्नात रूपांतर करणारा अग्नी, धातू वितळवून नवे रूप देणारा अग्नी आणि यज्ञातून प्रार्थना देवांपर्यंत पोहोचवणारा अग्नी अर्थात परिवर्तनाची शक्ती. मानवी जीवनातही दुःख, संघर्ष आणि संकटे ही अग्निपरीक्षाच असतात. त्या आपल्याला जाळतात, पण त्याच वेळी अधिक शुद्ध, अधिक मजबूत आणि अधिक परिपक्व बनवतात. म्हणूनच आग्नेय दिशा आपल्याला सांगते परिवर्तनाला घाबरू नका, अग्नीतूनच सोन्याचे तेज बाहेर येते.
दक्षिण दिशा म्हणजे यमाची दिशा. यम म्हणजे मृत्यूचा देव म्हणून आपण त्यांच्याकडे भीतीने पाहतो. पण यम केवळ मृत्यूचे प्रतीक नाहीत. ते न्याय, धर्म आणि कर्मफळाचे अधिपती आहेत. त्यांचे अस्त्र दंड, वाहन महिष आणि लोक यमलोक. त्यांच्या हातातील दंड म्हणजे शिक्षा नव्हे, तर कर्माच्या परिणामाची जाणीव आहे. जीवनात आपण जे करतो, त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून यमाची दिशा आपल्याला मृत्यूची भीती दाखवत नाही, ती आपल्याला जीवनाची जबाबदारी शिकवते. आपल्याला आपली कर्म करताना सावध राहा, कारण प्रत्येक कृतीची सावली आपल्या मागे चालत असते, हा संदेश दक्षिण दिशा देते.



नैऋत्य दिशा ही नैऋतीची दिशा. या दिशेला विघटन, क्षय आणि विनाशाशी जोडले जाते. तिचे अस्त्र खड्ग आणि वाहन घोडा. परंतु विनाश म्हणजे नेहमीच नकारात्मक गोष्ट नसते. जुने गळून पडल्याशिवाय नवे जन्माला येत नाही. सुकलेली पाने झाड सोडतात म्हणून वसंत ऋतू येतो. जुन्या विचारांचा त्याग झाला म्हणून नवे विचार जन्म घेतात. नैऋत्य दिशा आपल्याला शिकवते की जीवनात काही गोष्टी सोडाव्या लागतात. जुन्या आठवणी, दुःख, अहंकार, चुकीचे संबंध आणि मनाला पोखरणारे विचार हे सारे धरून बसलो, तर नव्या आनंदासाठी जागाच उरणार नाही. म्हणून कधी कधी विनाश हा नवसर्जनाचा पहिला टप्पा असतो.


पश्चिम दिशा म्हणजे वरुणाची दिशा. वरुणदेव जलतत्त्वाचे अधिपती. त्यांचे अस्त्र पाश, वाहन मकर आणि लोक वरुणलोक. पाणी म्हणजे जीवन. ते मऊ असते, पण पर्वतही झिजवू शकते. ते स्वतःचा आकार नसतानाही प्रत्येक पात्राचा आकार स्वीकारते. म्हणून पाणी म्हणजे लवचिकता, संयम आणि जीवनशक्ती. वरुणाच्या हातातील पाश आपल्याला सांगतो, की निसर्गाच्या नियमांपासून कोणीही सुटू शकत नाही. पाणी जीवन देते, पण त्याचा अतिरेक पूर आणतो. भावनाही तशाच असतात. प्रेम आवश्यक आहे, पण अति आसक्ती बंधन बनते. करुणा आवश्यक आहे, पण अति भावुकता निर्णयक्षमता हरवते. म्हणून पश्चिम दिशा आपल्याला भावनांना वाहू द्या, पण त्यांना विवेकाचा किनारा द्या, असे सांगते. वायव्य दिशा म्हणजे वायुदेवाची दिशा. वायू अदृश्य आहे, पण त्याच्याशिवाय जीवन अशक्य आहे. त्याचे अस्त्र ध्वज, वाहन मृग आणि लोक वायुलोक. वायू म्हणजे गती, प्राण आणि स्वातंत्र्य. तो एका ठिकाणी स्थिर राहत नाही. त्याची चंचलता कधी वादळ बनते, तर कधी मंद झुळूक. आपले मनही वायूप्रमाणे असते. एका क्षणी आनंदी, दुसऱ्या क्षणी चिंताग्रस्त, एका क्षणी आशावादी, तर दुसऱ्या क्षणी निराश. मनाला दिशा दिली तर वारा नौका पुढे नेतो, दिशा नसेल तर तो वादळ बनतो. म्हणून वायुदेव आपल्याला शिकवतात गती आवश्यक आहे, पण दिशाहीन गती विनाशकारी असते.


ऋतुजा केळकर
(लेखाचा उर्वरित भाग पुढील गुरुवारी याच पुरवणीत)

Comments
Add Comment

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत एका दिवशी पडणार दोन माळ, अष्टमी आणि नवमी तिथीबाबत जाणून घ्या

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. देवीच्यी नऊ रुपांची