Saturday, August 29, 2026

Eknath shinde : सिंदूर महारक्तदान यात्रेतून जवानांना सलाम; एकनाथ शिंदेंचा रक्तदानाचा संदेश

Eknath shinde : सिंदूर महारक्तदान यात्रेतून जवानांना सलाम; एकनाथ शिंदेंचा रक्तदानाचा संदेश

नवी दिल्ली : देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी दिल्लीमध्ये ‘सिंदूर महारक्तदान व यात्रा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने क्रांतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले कार्यकर्ते, शिवसैनिक, पैलवान आणि रक्तदाते सहभागी झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदात्यांचे कौतुक करत जवानांच्या सन्मानासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांमुळे नागरिक सुरक्षितपणे जीवन जगत असल्याचे सांगितले. जवानांच्या त्यागाची जाणीव समाजाला करून देणे आणि त्यांच्या सन्मानासाठी रक्तदानाच्या माध्यमातून योगदान देणे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रक्तदानामुळे गरजू रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे रक्तदान ही केवळ सामाजिक सेवा नसून देशसेवेचाही एक मार्ग आहे, असे शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी जवानांच्या सन्मानासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशहित आणि राष्ट्रसेवा ही राजकीय चौकटीपेक्षा मोठी असल्याचे सांगताना शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि स्वाभिमानाच्या परंपरेचा उल्लेख केला. देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय जवानांनी केलेल्या कामगिरीमुळे देशाचा आत्मविश्वास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढत्या क्षमतेचाही उल्लेख करण्यात आला. देशांतर्गत संरक्षण उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञान आणि लष्करी सामर्थ्यामुळे भारत अधिक सक्षम होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रानेही या रक्तदान मोहिमेला साथ दिली. महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पैलवान आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. जवानांच्या सन्मानासाठी पैलवानांनी घेतलेला हा सहभाग सामाजिक बांधिलकीचे उदाहरण असल्याचे शिंदे यांनी म्हटले.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, लष्करी अधिकारी, शिवसेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते. रक्तदान, जवानांचा सन्मान आणि देशसेवा या भावनांना एकत्र आणत ‘सिंदूर महारक्तदान’ उपक्रमातून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा