छंद

कथा; रमेश तांबे


विनय आणि त्याची बहीण विनया वर्तमानपत्रातले शब्दकोडे सोडवत बसले होते. खरे तर ही दोन्ही भावंडे इंग्रजी माध्यमात शिकत होती. पण मराठी भाषा त्या दोघांची आवडती भाषा होती. गोष्टीची पुस्तकं वाचणे ही तर त्यांची नित्याची गोष्ट होती. त्यात बहीण विनया तर कविताही करत असे. तिच्या काही कविता शाळेच्या मासिकातदेखील छापून आल्या होत्या. वाचनामुळे दोघांचे मराठी उत्तम होते. पण आज शब्दकोडे सोडवताना त्यांना एक शब्द खूपच अडला होता.


विनया धावतच आईकडे गेली आणि म्हणाली, “आई गं कुत्र्याला पाच अक्षरी शब्द कोणता!” खरंतर आईमुळेच दोघांना मराठी गोष्टींची पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली होती. आईनेदेखील हातातली कामे बाजूला ठेवली आणि विचार करू लागली. पण तिला काही जमेना. आता, बाबांकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. कारण बाबा नेहमीच इंग्रजी कादंबऱ्या आणि वृत्तपत्र वाचत असायचे. तरीदेखील विनय म्हणाला, “चल जरा विचारून तर बघू.” म्हणून विनय-विनया बाबांना म्हणाले, “बाबा कुत्र्याला पाच अक्षरी शब्द सांगा ना!” आणि काय आश्चर्य बाबांनी जराही विचार न करता लगेच उत्तर दिले, “अरे “ग्रामकेसरी.” ग्राम म्हणजे गाव आणि केसरी म्हणजे सिंह गावाचा सिंह!” शब्दकोड्यात तो शब्द चपखल बसला. विनय तर उड्याच मारू लागला. बाबांचं उत्तर बरोबर आलं होतं.


विनया तर चकितच झाली. रोज इंग्रजी पुस्तकांचं वाचन करणारे बाबा मराठी शब्दांची एवढी माहिती ठेवतील याची तिला कल्पना नव्हती. तिने लगेचच बाबांना विचारलं तर बाबा म्हणाले, “अरे बाळांनो, मी इंग्रजी आता वाचतो. पण मी मराठी माध्यमातून शिकलो आहे. मलाही मराठी खूप आवडायचं. मी त्या काळात वाचनही खूप करायचो. पण पुढे नोकरी करताना मराठी वाचन मागे पडलं. मग विनयाच्या हातातला पेपर घेऊन त्यातले उर्वरित शब्दकोडे बाबांनी भराभर पूर्ण केले. मग बाबा म्हणाले, “विनय, विनया तुम्ही शब्दकोडे रोज सोडवता. पण त्यातले जे नवीन शब्द आहेत ते कधी वहीत लिहून ठेवता का? त्या शब्दांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करता का? मग बाबांनी त्यांच्या कपाटातून जुन्या वह्या काढल्या. त्यात वाचन करता करता कठीण शब्दांचे अर्थ लिहून ठेवले होते. अशा पाच-सहा वह्या त्यांनी विनयाच्या स्वाधीन केल्या आणि म्हणाले, “विनया-विनय आपण आपला छंद जोपासावा. पण त्यालाही एक शिस्त असायला हवी. आपल्या छंदातून आपले ज्ञान वाढायला हवे. आपला व्यक्तिमत्त्व विकास व्हायला हवा. कालचा मी आणि आजचा मी यात चांगला फरक दिसायला हवा. विनया विशेषतः तुला मराठी खूपच आवडतं, मग शब्दकोडे सोडविण्या व्यतिरिक्त तू काय करतेस! तुझं मराठी हस्ताक्षर अजूनही सुरेख व्हायला हवे. लिहिताना शुद्धलेखनाच्या चुका टाळायला हव्यात. वाचन मोठ्याने केलेस तर उच्चारही सुधारतील आणि आपण काय चुका करतो तेही कळेल. बाबा बोलत होते. विनय, विनया आणि आईदेखील मन लावून ऐकत होते. बाबांचा मराठीचा व्यासंग, ज्ञान आणि स्मरणशक्ती पाहून तिघेही अवाक् झाले होते.

Comments
Add Comment

तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकीचे भान

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया,

झऱ्यांचा उगम कसा होतो?

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील पाण्याच्या निर्मळ झऱ्यासारखा शिवम मित्रांना माहिती सांगत होता. त्याचे मित्रही ते

मदत

-  कथा; रमेश तांबे एके दिवशी मी समुद्रावर फिरायला गेलो होतो. संध्याकाळचे सहा वाजले होते. सूर्य अस्ताला जाण्याच्या

खर्च

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ साहित्य अकादमीच्या कार्यक्रमात मी निमंत्रित होते. तो कार्यक्रम अहमदाबादला होता.

क्षण कसोटीचे

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर मानवी जीवन म्हणजे सुख-दुःख, यश-अपयश, आशा-निराशा, संधी-अडचणी आणि चढ-उतारांनी

जान है तो जहान है!

- प्रतिभारंग, प्रा. प्रतिभा सराफ चहा बरोबर बाजूला भरपूर ओले खोबरे आणि कोथिंबीर घातलेले पोहे खायला घेतले आणि