Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के सवलत



मुंबई : महाराष्ट्र शासनाने परिचालनासाठी घेतलेल्या कर्जत येथील एन. डी.स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज स्वीकारला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत संचालक मंडळाचे ते पहिले अध्यक्ष ठरले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली एन. डी. स्टुडिओच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. चित्रपट निर्मितीला अधिक चालना देणे, निर्मात्यांसाठी चित्रिकरणाचा खर्च कमी करणे आणि एन. डी. स्टुडिओचा प्रभावीपणे विकास करणे या दृष्टीने बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एन. डी. स्टुडिओ हे चित्रिकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधा आणि वैविध्यपूर्ण स्थळांसाठी प्रसिद्ध असून, येथे मराठीसह हिंदी तसेच इतर भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, वेबसीरिज आणि विविध दृकश्राव्य निर्मितींच्या चित्रिकरणाला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या पार्श्वभूमीवर निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.


या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू , सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, तसेच महामंडळाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयानुसार एन. डी. स्टुडिओतील थीम पार्कच्या प्रवेश शुल्कात, चित्रिकरणासाठी येणाऱ्या निर्माते, कलाकार, कलादिग्दर्शक व इतर मान्यवरांसाठी उपलब्ध निवासव्यवस्थेच्या शुल्कात तसेच चित्रिकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध स्थळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणासाठी लागणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार असून, एन. डी. स्टुडिओमध्ये अधिकाधिक चित्रपट आणि दृकश्राव्य निर्मितींचे चित्रिकरण करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.



विशेषतः चित्रपट निर्मितीच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर स्टुडिओ शुल्क, लोकेशन शुल्क आणि कलाकार व तंत्रज्ञांच्या निवासाचा खर्च हा निर्मिती बजेटमधील महत्त्वाचा भाग असतो. एन. डी. स्टुडिओच्या विविध सुविधांवर देण्यात आलेली ही सवलत निर्मात्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. यामुळे महाराष्ट्रात चित्रपट निर्मितीसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्याबरोबरच राज्यात चित्रिकरणासाठी देशभरातील निर्मात्यांना आकर्षित करण्यास मदत होईल. बैठकीत एन. डी. स्टुडिओचा केवळ चित्रिकरणासाठी वापर न करता त्याचा चित्रपट निर्मिती, मनोरंजन आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीने अधिक प्रभावी विकास करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. स्टुडिओमधील उपलब्ध पायाभूत सुविधा, चित्रिकरण स्थळे, निवासव्यवस्था आणि थीम पार्क यांचा अधिकाधिक वापर होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला. एन. डी. स्टुडिओला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने पुढील काळात विविध उपक्रम राबविण्याचे संकेतही या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीला अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, राज्यात मोठ्या प्रमाणावर चित्रिकरण आणणे आणि त्यातून स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, कामगार तसेच विविध सेवा क्षेत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागील व्यापक उद्देश आहे.


एन. डी. स्टुडिओवरील ५० टक्के सवलतीचा हा निर्णय ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत निर्माते आणि चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांनी एन. डी. स्टुडिओतील उपलब्ध सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, अशी अपेक्षा आहे. या निर्णयामुळे एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणाच्या संख्येत वाढ होऊन महाराष्ट्राला देशातील प्रमुख चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक