Nitesh Rane : चामोर्शीत उभे राहणार आधुनिक मत्स्य प्रशिक्षण केंद्र; गडचिरोलीतील मच्छीमारांना मिळणार नवी दिशा

- प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कार्यवाहीला गती देण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश


मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि प्रशिक्षणाची जोड देण्यासाठी चामोर्शी येथे विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या उभारणीला शासनाने मान्यता दिली असून, कामकाजाला गती देऊन लवकरात लवकर केंद्र कार्यान्वित करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले आहेत.


मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रस्तावित प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थित होते.


गडचिरोली जिल्हा जलसंपत्तीच्या दृष्टीने समृद्ध असून, मत्स्यपालनासाठी मोठ्या प्रमाणात जलस्रोत उपलब्ध आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १ हजार ६४५ तलाव, २३ सिंचन तलाव आणि २ हजारांहून अधिक शेततळी आहेत. याशिवाय अन्य जलस्रोत मिळून ६ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक जलक्षेत्र मत्स्यपालनासाठी उपलब्ध आहे. मात्र, बहुतांश मच्छीमार अद्याप पारंपरिक पद्धतीने मत्स्यव्यवसाय करीत असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.



प्रस्तावित प्रशिक्षण केंद्रामध्ये आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, मत्स्यबीज उत्पादन, मत्स्यखाद्य व्यवस्थापन, जल व माती परीक्षण, मत्स्यरोग निदान आणि मत्स्यप्रक्रिया याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार, आदिवासी बांधव तसेच बेरोजगार युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. (Nitesh Rane)


कनेरी येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या अखत्यारितील २.८९ हेक्टर विनावापर जमीन प्रशिक्षण केंद्र, आधुनिक मत्स्यबीज केंद्र आणि अन्य सुविधांसाठी मत्स्यव्यवसाय विभागाला उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असून ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


केंद्रामध्ये आधुनिक प्रशिक्षण सभागृह, ऑडिओ-व्हिज्युअल शिक्षण सुविधा, मत्स्यखाद्य व पोषण प्रयोगशाळा, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, शेतकरी मार्गदर्शन व सल्ला केंद्र, प्रशिक्षणार्थींसाठी वसतिगृह, माहिती व तांत्रिक साहित्य केंद्र, मत्स्यरोग निदान प्रयोगशाळा, पुनर्चक्रित जलसंवर्धन प्रणालीचे प्रात्यक्षिक केंद्र आणि लघु मत्स्यप्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. (Nitesh Rane)



चामोर्शी हे विभागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने मच्छीमार व मत्स्यकास्तकारांना प्रशिक्षणासाठी ये-जा करणे सोपे होणार आहे. या केंद्रामुळे गडचिरोलीसह नागपूर विभागातील मत्स्य उत्पादनाला चालना मिळण्याबरोबरच मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे आणि युवकांसाठी रोजगारनिर्मितीला हातभार लागणार आहे.


दरम्यान, नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मत्स्यविज्ञान महाविद्यालय परिसरात विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण व सुविधा केंद्राचे काम मे २०२६ पासून सुरू आहे. त्यामुळे नागपूरमध्ये स्वतंत्र केंद्र उभारण्याऐवजी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात विभागीय प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने