Crime News : ‘माझ्या मामाच्या मुलीशी लग्न केले असते तर मला खूप पैसे मिळाले असते. तू घरी बसून फुकट खातेस,’ असे म्हणत पत्नीला मानसिक त्रास देणाऱ्या पतीने कापडी उपरण्याने तिच्या गळ्याला फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कासोदा (ता. एरंडोल) येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पती निलेश भगवान पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. (Crime News)
नेमकं काय घडलं ?
आरोपानुसार, १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास निलेश पाटील आणि त्यांची पत्नी सुनाक्षी निलेश पाटील (वय २४) हे घरातील बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले होते. यावेळी निलेशने पत्नीच्या शिक्षणावरून तसेच ती नोकरी किंवा व्यवसाय करून कमाई करत नसल्याच्या कारणावरून तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. माझ्या मामाच्या मुलीशी लग्न केले असते तर मला खूप पैसे मिळाले असते. तू घरी बसून फुकट खातेस,असे म्हणत पतीने मानसिक त्रास दिल्याचे सुनाक्षी यांनी दिलेल्या जबाबात नमूद आहे. पतीच्या बोलण्यामुळे सुनाक्षी यांना रडू आले. (Crime News)
गुन्हा दाखल, संशयिताला अटक
पत्नी रडत असल्याचे पाहून निलेशने तिचे डोळे पुसण्याच्या बहाण्याने पांढऱ्या रंगाचे कापडी उपरणे घेतले. याच उपरण्याने पत्नीच्या गळ्याला फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सुनाक्षी यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. या जबाबाच्या आधारे कासोदा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी निलेश पाटील याला अटक केली असून, पुढील तपास कासोदा पोलिस करीत आहेत.






