मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता साजरी करणारा दिवस नसून हा त्या हक्कांचा इतिहास आहे, जे मिळवण्यासाठी महिलांनी शतकानुशतकं संघर्ष केला. एक काळ असा होता, जेव्हा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, निर्णय प्रक्रियेत स्थान नव्हतं आणि अनेक मूलभूत हक्कांसाठीही त्यांना संघर्ष करावा लागत होता. याच संघर्षाला ऐतिहासिक वळण मिळालं अमेरिकेत. २६ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्ती लागू झाली आणि महिलांना मतदानाचा घटनात्मक अधिकार मिळाला. पण हा प्रवास तिथेच थांबला नाही. १९७० मध्ये हजारो अमेरिकन महिला आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या. या आंदोलनाची दखल घेत अमेरिकन काँग्रेसने १९७३ मध्ये २६ ऑगस्ट हा ‘Women’s Equality Day’ म्हणून अधिकृत केला. आणि या दिवसाचा संदेश आज अमेरिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही. (Women's Equality Day)
भारताचा विचार केला, तर महिलांच्या समानतेच्या लढ्याला आपला स्वतंत्र आणि समृद्ध इतिहास आहे. सावित्रीबाई फुले यांनी १९व्या शतकात मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडली. सामाजिक विरोधाचा सामना करत त्यांनी स्त्रीशिक्षणाची ज्योत पेटवली. आज त्याच विचारांची व्याप्ती शिक्षण, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, राजकारण आणि अंतराळ संशोधनापर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते. विशेषतः मतदानाच्या ज्या अधिकारासाठी अमेरिकेतील महिलांना लढा द्यावा लागला त्याची गरज भारतात पडलीच नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत महिला आणि पुरुष दोघांनाही मतदानाच्या सामान संधी आणि अधिकार देण्यात आले. त्यामुळे समानतेच्या वाटेवर भारत नेहमीच अग्रस्थानी होता. (Women's Equality Day)
पण काही प्रश्न अजूनही कायम आहेत. समान कामासाठी समान वेतन, कार्यस्थळावरील भेदभाव, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताण, निर्णय प्रक्रियेत महिलांचा कमी सहभाग असं बराच काही. दुसरीकडे डिजिटल युगात पहायला गेलं तर सायबर छळ, ऑनलाइन आक्षेपार्ह वक्तव्ये, यांसारखी आव्हाने आहेतच. म्हणून खरी समानता म्हणजे फक्त महिलांना संधी देणं नाही; तर प्रत्येक मुलीला स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, सुरक्षितता, शिक्षण आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्याची समान संधी मिळणं ही आहे. सोबतच हा मुद्दा फक्त स्त्रियांचाच नाही तर पुरुषांबाबतही तितकाच आहे. कारण समाजाची प्रगती तेव्हाच शक्य आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान संधी आणि समान सन्मान मिळतो. या महिला समानता दिनी, समानतेचा फक्त उत्सव नको… त्याची सुरुवात आपल्या विचारांपासून आणि कृतीपासून करूया. (Women's Equality Day)






