'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात BESTने तात्पुरत्या वीज जोडणीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंडपांना वीज जोडणी घेताना आवश्यक परवानग्या, विद्युत सुरक्षा, अर्ज प्रक्रिया, सुरक्षा ठेव, मीटर शुल्क आणि वीज दर यांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी अर्ज करण्यापूर्वी या नियमांची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.



ऑनलाइन अर्जाची सुविधा


BESTने मंडळांना अर्ज प्रक्रियेत मदत करण्यासाठी आपल्या सर्व ग्राहक सेवा विभागांमध्ये सुविधा कक्ष उपलब्ध करून दिले आहेत. आयोजक BESTच्या वेबसाइटवरून तात्पुरत्या वीज जोडणीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंटआउट आवश्यक कागदपत्रे आणि हमीपत्रासह संबंधित ग्राहक सेवा विभागात सादर करावी लागेल. अर्जामध्ये मंडळाचे नाव, संपूर्ण पत्ता, वीज जोडणी आवश्यक असलेला कालावधी, जबाबदार प्रतिनिधीची माहिती आणि मंडळाच्या बँक खात्याचे तपशील देणे आवश्यक आहे. सुरक्षा ठेव परत मिळवण्यासाठी मंडळांनी विहित अर्जही सादर करावा लागेल. वीज वापराचे अंतिम बिल समायोजित केल्यानंतर उर्वरित सुरक्षा ठेव परत केली जाईल. आवश्यक अर्ज सादर केल्यास ही रक्कम एका महिन्याच्या आत NEFTद्वारे मंडळाच्या बँक खात्यात जमा केली जाईल. अर्ज सादर न केल्यास BESTकडून ९० दिवसांच्या आत चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे परतावा केला जाईल.



मंडपासाठी कोणत्या परवानग्या आवश्यक?


खासगी जमीन किंवा गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर मंडप उभारणाऱ्या मंडळांना जमीनमालक किंवा संबंधित सोसायटीची परवानगी घ्यावी लागेल. त्याचबरोबर विद्युत निरीक्षकाची परवानगी किंवा संबंधित विभागाकडे केलेल्या अर्जाची प्रत सादर करावी लागेल. रस्ते किंवा पदपथावर मंडप उभारणाऱ्या मंडळांना BMCचे ना-हरकत प्रमाणपत्र अर्थात NOC आवश्यक आहे. याशिवाय संबंधित पोलीस ठाण्याची चालू वर्षाची परवानगी सादर करावी लागेल. परवानगी अद्याप मिळाली नसल्यास, चालू वर्षाच्या पोलीस अर्जाची साक्षांकित पावती स्वीकारली जाऊ शकते.



विद्युत सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व


BESTने तात्पुरत्या वीज जोडणीसाठी विद्युत सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले आहेत. मंडळांनी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून मंडपातील एकूण विद्युत भाराचे मूल्यांकन करून घ्यावे. या भाराची माहिती अर्जात नमूद करावी लागेल. कंत्राटदाराने मंडपात वापरल्या जाणाऱ्या सर्व विद्युत उपकरणांचा एकूण भार नमूद असलेला चाचणी अहवाल द्यावा लागेल. त्यासोबत ELCB अर्थात Earth Leakage Circuit Breakerचा चाचणी अहवालही आवश्यक आहे. मंडपातील वायरिंग योग्य क्षमतेचे आणि भारतीय विद्युत नियमांनुसार असणे आवश्यक आहे. वायरिंग केवळ परवानाधारक कंत्राटदाराकडूनच करून घ्यावी. वीज तारा थेट जमिनीवर टाकू नयेत किंवा पथदिव्यांच्या खांबाभोवती गुंडाळू नयेत. अपघात टाळण्यासाठी सर्व विद्युत जोडण्या सुरक्षित पद्धतीने करणे बंधनकारक आहे.



कनेक्शन आणि मीटर शुल्क किती?


तात्पुरत्या जोडणीसाठी सिंगल-फेज मागणी अर्जासाठी ९० रुपये, तर थ्री-फेज अर्जासाठी १४५ रुपये शुल्क आकारले जाईल. ज्या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा आधीपासून उपलब्ध आहेत, तिथे सिंगल-फेज जोडणीसाठी १५० रुपये, तर थ्री-फेजसाठी २०० रुपये कनेक्शन शुल्क आकारले जाईल. पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यास प्रत्यक्ष खर्च मंडळाकडून वसूल केला जाऊ शकतो. सुरक्षा ठेवेसाठी २०२५च्या गणेशोत्सवातील वीज बिलाइतकी रक्कम किंवा नवीन मंडळांसाठी प्रति किलोवॅट प्रति दिवस २० रुपये, यापैकी जी रक्कम अधिक असेल ती लागू होईल. मीटरसाठी स्वतंत्र ठेवही आकारली जाईल. सिंगल-फेज मीटरसाठी ३,५०० रुपये, ६० किलोवॅटपर्यंतच्या थ्री-फेज मीटरसाठी ४,७०० रुपये, तर ६० किलोवॅटपेक्षा जास्त भारासाठी CT मीटरसाठी १०,५०० रुपये ठेव निश्चित करण्यात आली आहे.



गणेश मंडळांना सवलतीचा वीज दर


BESTच्या माहितीनुसार, तात्पुरत्या वीज जोडणीचे बिल महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग अर्थात MERCने मंजूर केलेल्या २०२६-२७च्या दरपत्रकानुसार आकारले जाईल. गणेशोत्सव मंडळांना १ एप्रिल २०२६पासून लागू असलेल्या सवलतीच्या निवासी श्रेणीतील दराचा लाभ मिळेल. ० ते १०० युनिट वापरासाठी स्थिर शुल्क १३५ रुपये, ऊर्जा शुल्क २.०२ रुपये प्रति युनिट आणि वहन शुल्क १.८२ रुपये प्रति युनिट आहे. १०१ ते ३०० युनिटसाठी स्थिर शुल्क २०२.५० रुपये आणि ऊर्जा शुल्क ५.३४ रुपये प्रति युनिट आहे. ३०१ ते ५०० युनिटसाठी ऊर्जा शुल्क १०.०४ रुपये प्रति युनिट, तर ५०० युनिटपेक्षा अधिक वापरासाठी स्थिर शुल्क २४० रुपये आणि ऊर्जा शुल्क ११.२५ रुपये प्रति युनिट आहे. सर्व टप्प्यांमध्ये वहन शुल्क १.८२ रुपये प्रति युनिट राहते.


त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी शेवटच्या क्षणी अर्ज न करता आवश्यक परवानग्या, विद्युत भार चाचणी, ELCB अहवाल आणि इतर कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी, असे BESTने आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित BEST ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधता येणार आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने