Ritu Tawde : कर्करोगाच्या असह्य वेदनांवर प्रेमाची आणि विश्वासाची फुंकर

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे चिमुकल्यांसमवेत रक्षाबंधन


रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसमध्ये साजरा झाला अनोखा रक्षाबंधन सोहळा


मुंबई : सण-उत्सव केवळ चार भिंतींतील औपचारिकतेत न ठेवता, दुर्धर आजाराशी झुंजणाऱ्या चिमुकल्यांच्या आनंदात मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडे प्रत्यक्ष सहभागी झाल्या. दुर्धर आजारांशी दोन हात करीत असलेल्या बालकांना 'केवळ शब्दांची सहानुभूती नको, तर प्रत्यक्ष सहवेदना आणि मदतीचा हात हवा' हा कृतिशील सामाजिक संदेश महापौरांनी दिला आहे. (Ritu Tawde)


कर्करोग असल्याने, वैद्यकीय उपचार म्हणून सुई, सलाईन आणि किमोथेरपीच्या असह्य वेदनांशी रोज दोन हात करणाऱ्या निष्पाप चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले तर हा हळवा प्रसंग अनुभवून उपस्थितांचे डोळे पाणावले. निमित्त होते रक्षाबंधनाचे आणि या अत्यंत भावुक क्षणांच्या दुवा ठरल्या मुंबईच्या प्रथम नागरिक, महापौर रितू तावडे! (Ritu Tawde)


मुंबईतील माहीम येथील 'रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया' येथे गंभीर आजारांवर उपचार घेत असलेल्या कर्करोगग्रस्त मुलांसमवेत महापौरांनी गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी अतिशय आपुलकीने आणि भावनिक वातावरणात रक्षाबंधन साजरे केले. वैद्यकीय उपचारांच्या कठीण प्रवासात मुलांच्या चेहऱ्यावरील निष्पाप हास्य पाहून गहिवरलेल्या महापौरांनी स्वतः मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांना मायेने जवळ घेतले, भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. (Ritu Tawde)



"उपचारांच्या तीव्र यातना सहन करणाऱ्या या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर राखीचा आनंद आणि डोळ्यांतील जगण्याची दुर्दम्य आशा पाहून मी निःशब्द झाले आहे. हा रेशमी धागा केवळ संरक्षणाचे वचन नाही, तर 'तुम्ही या लढाईत अजिबात एकटे नाही, संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे' या दृढ विश्वासाची साक्ष आहे," असे महापौर रितू तावडे यावेळी म्हणाल्या. (Ritu Tawde)



चिमुकल्या हातांनी विणलेले प्रेमाचे रेशमी बंध


या कार्यक्रमाचे हृदयस्पर्शी वैशिष्ट्य म्हणजे रुग्णालयातील वेदना विसरून या कर्करोगग्रस्त लहानग्यांनी स्वतःच्या नाजूक हातांनी बनवलेल्या सुंदर राख्या! जेव्हा या मुलांनी महापौरांना आणि एकमेकांना या राख्या बांधल्या, तेव्हा उपस्थित पालकांच्या व डॉक्टरांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा सोहळा म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमासोबतच जिद्द, आपुलकी आणि एकजुटीची अभेद्य भावना जपणारा ठरला. (Ritu Tawde)



घरच्या मायेची ऊब: रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसचे सेवाकार्य


दूरवरच्या खेड्यापाड्यांतून आपल्या काळजाच्या तुकड्यावर उपचार करण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत येणाऱ्या कुटुंबांसाठी उपचारांचा, निवासाचा व खाण्यापिण्याचा खर्च पेलवणे अशक्यप्राय असते. अशा अत्यंत बिकट काळात रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया ही संस्था या कुटुंबांना केवळ मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करत नाही, तर त्यांना हक्काची कौटुंबिक सुरक्षितता प्रदान करते. माहीम मधील या वास्तूतील १६ सुसज्ज खोल्या व स्वयंपाकघर पाहून महापौरांनी समाधान व्यक्त केले. "येथे आई स्वतःच्या हाताने बाळासाठी आवडीचे जेवण बनवू शकते, ही भावनाच त्या आजारी मुलाला घरात असल्याचा मोठा मानसिक दिलासा देते," असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले. (Ritu Tawde)


प्रत्यक्ष मदतीची कृती करत महापौरांनी स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिका कर्करोगग्रस्त बालकांच्या पाठीशी सदैव कटिबद्ध आहे. या गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या गरजू कुटुंबांसाठी 'महापौर वैद्यकीय मदत कक्ष' मार्फत तत्काळ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संस्था संचालकांना दिले.


महापौरांच्या या स्नेहमयी व आत्मीय भेटीमुळे उपचारांच्या खडतर प्रवासात लढणाऱ्या कुटुंबीयांना नवे मानसिक व भावनिक बळ लाभले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. याप्रसंगी रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडियाचे संचालक निशेत पांडे, सुलक्षणा मुखर्जी यांच्यासह संस्थेचे सर्व समर्पित कर्मचारी व बालरुग्णांचे कुटुंबीय उपस्थित होते. (Ritu Tawde)

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा