Sunday, August 30, 2026

निर्माल्य

निर्माल्य

पूर्णिमा शिंदे

सकाळ झाली. पहाटे-पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट कानावर येत होता. मात्र सुधाला सारी रात्र झोप लागली नव्हती. पेंगुळलेल्या मनाने ती उठली आणि नेहमीप्रमाणे कामाला लागली. ‘रोज एरे माझ्या मागल्या... आयुष्यभर कष्ट केले. मुले मोठी झाली तरी बाईला घरातून काही सुटका नसते. हेच खरं! कष्ट, स्वयंपाक, पाणी... सारे पाचवीला पुजलेले. रांधा, वाढा, उष्टी काढा!’ मनात घोंगावणारे विचार काही केल्या थांबत नव्हते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. उषा आली होती. “आत्या... आत्या... अगं, काय झालं? काल तू चक्कर येऊन पडलीस म्हणे! मला शेजारच्या गीता काकूंचा फोन आला होता.” “पण... नेहमीचंच!” “काय झालं?” “नेहमी माझ्याच मागे... नवरा रात्री दारू पिऊन तीन वाजता आला. खूप मारहाण केली, मला आणि मुलांना. त्याची बडबड, भांडणं... मला कंटाळा आला आहे या जगण्याचा! रात्री उशिरा येणे, व्यसन करणे... त्यामुळे घराचे घरपणच विस्कटून गेले आहे बघ.” “आत्या...” उषा म्हणाली, “हो गं बाई, मी समजू शकते तुझी व्यथा!” “चहा घे. गरम आहे. चल, आधी घे!”

उषा चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर एक-एक विचार बोलून दाखवत होती आणि एक-एक घोट घेत होती. आत्या मात्र शांतपणे ऐकून घेत होती. तेव्हा उषाच्या लक्षात आले की, आज आत्या नेहमीसारखी बोलत नव्हती. ती शांत, स्तब्ध होती. “मग आत्या, कसला विचार करतेस? सांग ना!”

“सांगितलं ना उषा, बाईला बाईपणाच्या वेदना काही वेगळ्याच असतात. माणसाचा जन्म हा उद्याच्या आशेवर असतो. उद्याच्या आशेवर जगतो आपण माणसं; पण तो उद्या उदयास कधी येतच नाही. हेच खरं जीवन... संग्राम, संघर्ष!” उषाने होकारार्थी मान हलवली. चहाचा कप धुऊन ठेवला. घाईघाईने, लगबगीने ती म्हणाली,“आत्या, आता चल, मी निघते. मला ऑफिसला जायचं आहे. धावती भेट दिली तुला. उद्यापासून मुलाची दहावीची परीक्षा सुरू होते. मला काही वेळ मिळत नाही यायला. पण फोन मात्र नक्की करीन. काळजी घे. येते मी...” सुधा पुन्हा कामाला लागली. लग्न, संसार, बाळंतपण, मुलांचे संगोपन, घरातल्यांचे घरपण, कुटुंबाचे सावरलेपण, ज्येष्ठांचे आजारपण... बया, या सगळ्या दगदगीत बाईचे पार मातेरं होऊन जाते. मुलांचे शिक्षण झाले. दोन्ही मुलं भुर्रकन उडून अमेरिकेला निघून गेली. बोलता-बोलता चौदा-पंधरा वर्षे तिकडेच गेली आणि त्यांनी तिथेच लग्न करून आपापले संसार थाटले. गेल्या वर्षी त्यांचे बाबा गेले, तर आठ दिवसांसाठी फक्त एक मुलगा आला. दुसरा आलाच नाही. त्यांच्या बायका तर आता भारतात यायचंच नाही, असं म्हणतात.

‘चालायचंच...’ सुधा देवाला साकडं घालून रोज म्हणायची, ‘माझी मुलं मोठी होऊ देत. सुखात राहू देत. सधन, समृद्ध होऊ देत.’ पण विचारांनी प्रगल्भ, संवेदनशील, सत्कार्यशील, सेवाभावी आणि आज्ञाधारक... या सगळ्यांचा अभाव मात्र राहिला, तो राहिलाच. त्यांना आयुष्याचं मोलच कळलं नाही. सासूबाई नेहमी म्हणायच्या, “सुधे, अगं, कॅलेंडरची पानं पलटावीत ना, तसं बघ, आयुष्य सरकन निघून जातं. कापरासारखे दिवस उडून जातात. अन् हातात फक्त उरतं... आठवणींचं गाठोडं!” ते त्यावेळी मनोमन पटलं होतं.

आता विनय आणि विकास दोघांनाही मी खूप संस्कारी बनवलं होतं. माझ्याशिवाय न जेवणारी माझी मुलं आज परदेशात आपापल्या विश्वात रमली आहेत. चालायचंच... पण त्यांच्या जाण्याने मी अगदी एकटी झाले आहे. हा एकटेपणा वेड लावतो माणसाला. चार घास कमी जातात. रोज पंक्तीत जेवताना आपल्याबरोबर सोबतीला कोणी असेल, तर चार घास जास्त जातात. घर खायला उठतं मुलांच्या आठवणीने. आईचं मन कोमेजून जातं. आपण फोन केला तर त्यांना बोलायला सवड नसते. मन मोकळं करायला आपलं म्हणून कोणी नाही. एखादा आवडीचा पदार्थ केला तरी घश्याखाली घास उतरत नाही. सणवार आले तरी काही करावंसं वाटत नाही. आनंद नसतो. उत्साह नसतो. ऊर्जा नसते. त्यामुळे अशी हजार दुखणी डोकं वर काढतात. मनातल्या या विचारांबरोबर सुधाही क्षणाक्षणाने पुढे सरकत होती. वेळ सरत होता.

तेवढ्यात तिच्या लक्षात आलं - आज अलकाचा वाढदिवस आहे. तिने सगळ्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसमोर आपला वाढदिवस साजरा करण्याचे निमंत्रण दिले आहे. सात वाजता सगळ्यांनी ठरलेल्या ठिकाणी जमायचं आहे. करपलेल्या भाजीचं पातेलं खाली उतरवत असताना अचानक तिचा हात भाजला. तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. एकदा असाच हात भाजला होता तेव्हा खाटेवरून विकासने उडी मारली होती. डोळ्यांत पाणी आणून तो म्हणाला होता,“आई, खूप दुखतंय का गं? भाजलीस का तू? जपून कर गं!” आता आईला दुखलं काय आणि भाजलं काय? मुलं दूर गेली, हे मात्र इतकंच खरं! सुधाने पटकन आवरलं.

संध्याकाळी सात वाजता सगळे ज्येष्ठ नागरिक ठरलेल्या ठिकाणी जमले. प्रभा, चित्रा, गीता, सुमन, लता, कुसुम, रेखा, रुबीना, सुखविंदर... सगळ्याजणी आज अलकासाठी भेटवस्तू घेऊन आल्या होत्या. भजन, गाणी आणि संगीत रजनीचा कार्यक्रमही होता. सगळ्याजणी एकमेकींना पाहून हातात हात मिळवत होत्या. हसतमुखाने एकमेकींचं स्वागत करत होत्या. गळाभेटी घेत होत्या. वृद्धाश्रमातील आधार केंद्राच्या व्यवस्थापक दामलेबाईंनी चहा-पाणी आणि नाश्त्याची सोय केली होती. चार-दोन भाषणे होणार होती. त्यानंतर गाणी आणि सांगता समारंभ... असा एकंदरीत सोहळा संपन्न होणार होता. गणेशवंदना झाली आणि त्यानंतर गाणी सुरू झाली. दुसरंच गाणं होतं - “या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या...” या गाण्याने तर सगळ्यांचे डोळे पाणावले.

जेमतेम तीन-चार जणांची मुलं भारतात असतील. बहुतेकांची मुलं परदेशात स्थायिक झाली होती. आधार देण्याच्या वयातच मुलं परदेशात स्थायिक होणं... जवळ कोणी नाही, सोबत नाही, आधार नाही... या कल्पनेनेच मन दुर्बल होतं. मनाचं स्वास्थ्य बिघडलं की वाढत्या वयात त्याचा शरीरावरही खूप परिणाम होत राहतो, हेच खरं. अशाच काहीशा सर्वमान्य, बेसूर जीवनाच्या तक्रारींमध्ये एक तरतरीत मुलगी बोलायला उठली. तिचं नाव होतं - अनघा कीर. दामलेबाईंनी तिची ओळख करून देताना सांगितलं,“आजपासून ही मुलगी रोज आपल्याला वेळ देणार आहे. आपल्यासाठी आपली मैत्रीण म्हणून तिचं मनोगत ऐकूया... तिच्याच तोंडून.” टाळ्या वाजवत, थरथरणारे हात आणि नजरेत चमक आणून सगळेजण तिच्या तेवीस-चोवीस वर्षांच्या कोवळ्या वयाकडे पाहत बसले. तिच्या बोलण्यातून समजलं की, समुपदेशन विषयातील तिचं कार्य, त्यावर मिळवलेली डॉक्टरेट, अभ्यास, वाचन आणि अनुभव दांडगा होता. यापेक्षाही तिचे सकारात्मक विचार खूप काही शिकवून गेले. रंजल्या-गांजल्यांची सेवा-सुश्रूषा करणं ही तिची आवडच बहुधा तिला इथे घेऊन आली असावी. सर्वांना तिच्या गप्पा-गोष्टींनी तिने जिंकून घेतलं. सर्वांची मतं आणि मनं एकमत झाली.

बघता-बघता सगळेजण आपलं दुःख विसरून जादुई आनंद, उत्साह, ऊर्जा आणि समाधानात रमले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदरशी हास्यछटा निर्माण झाली. जणू जगण्याची पाऊलवाटच सापडली होती. अनघाच्या रूपाने आशेचा किरण सापडला होता. वृद्धाश्रमाच्या रखरखीत वाळवंटात हिरव्यागार पालवीचा बहर आला होता. काळ्याघोर अंधारामध्ये आशेचा एक किरण, एक कवडसा गवसला होता. तेथील प्रत्येक आई आणि बाबांच्या मनात प्रश्न होते —

‘माझा दत्ता कधी येईल मला न्यायला?’ ‘माझा सुरेश कसा असेल?’ ‘माझा विकास मला फोन कधी करेल?’ ‘माझी उज्वला मला न्यायला येईल का?’ ‘किती वर्षं लोटली... कोणीच आलं नाही भेटायला. कसं होणार आपलं?’ या सगळ्या असंख्य प्रश्नांमध्ये अनघा हे एकच उत्तर होतं—सकारात्मक दृष्टिकोन. आपापलं आयुष्य इतरांसारखंच, इतरांसाठी आनंदाने जगावं. एकमेकांच्या सहवासात राहावं. वास्तव स्वीकारावं. एकमेकांसाठी ‘निर्माल्य’ बनून जगावं. जगण्यासाठी अनघा हे उत्तर होतं. वाटत होतं, अनघाने बोलत राहावं आणि आपण क्षणोक्षणी ऐकत राहावं! प्रसन्न, प्रफुल्लित, प्रभावी, सळसळतं व्यक्तिमत्त्व. झुळझुळणारा माणुसकीचा झराच! सर्वांच्या मनावर जादूची फुंकर घालणारं एक व्यक्तिमत्त्व. माझं दुःख मी विसरून गेले. तसेच सर्वजण तिच्या योगा, भजन, गाणी, हसत-खेळत गप्पा, सुख-दुःखात सामावून घेणं, समुपदेशन, आपापले छंद, वाचन, कला जोपासणे, मन व्यक्त करणे... या सगळ्यात रमू लागले. दिवसांमागून दिवस असेच पुढे जात होते.

कालांतराने समजलं की, ही दुसरी-तिसरी कोणी नसून भारतातून परदेशी गेलेल्या एका सुशिक्षित, स्मार्ट, करिअरिस्ट माणसाची मुलगी आहे. आई-वडील परदेशात स्थायिक झाले होते. तिच्या जन्मानंतर ते घटस्फोट घेऊन वेगळे झाले. रोजचं व्यसन, भांडणं, दुःख या वातावरणापेक्षा दुःखी, पीडितांची सेवा करणं तिला अधिक महत्त्वाचं वाटलं आणि ती भारतात आली. ती आल्यानंतर तिच्या मामा-मामींनी तिला फक्त एकच दिवस राहता येईल, असं सांगितलं. राहायला जागा नाही, असं स्पष्ट केलं. म्हणून ती नोकरीच्या शोधात, उपजीविकेसाठी या वृद्धाश्रमात दामलेबाईंकडे आली. दामलेबाईंनी तिला येथे राहू दिलं. “मलाही आता माझ्या पायवाटेवरून चालताना या जगात माझी माणसं मिळाल्याचा खूप आनंद सापडला,” असं सांगणारी अनघा आणि आम्ही... समभावनेतूनच एकमेकांसाठी जगण्याची नवी उमेद बाळगून होतो.

यावर सुधाला कविता सुचली — “पिकल्या पानाने पालवी फुटलेल्या पानाकडे पाहिलं... आधारासाठी मोठ्या आशेने पिकलेलं पान पालवी फुटलेल्या पानाला बिलगलं...”

एकमेकींचं दुःख जाणलं. एकमेकींना आपलं मानलं. एकमेकांसाठी जगण्यात खूप मोठा अर्थ आहे आणि जगण्याचं सार्थक आहे. तरुणपणी हातून होणारी सर्व कार्यं नव्या उमेदीने, ऊर्जेसह सहज होतात. पण मन पंगू होतं, शरीर दुर्बल होतं. जसजसं वय वाढत जातं, तसतसं माणूस मनानेही खचत जातो. म्हणून खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी अनघाने आयुष्यात घेतलेल्या या सोनेरी निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं. अनघा आता सर्वांची लाडकी, सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनली होती. या सगळ्यांच्या जीवनात आनंद पेरून तिने आपल्या आयुष्याचं ‘निर्माल्य’ केलं होतं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा