आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू


दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं माझ्याच बाबतीत का?” अभ्यासाचा ताण, मोठा अभ्यासक्रम, टेस्टचे गुण, अपेक्षा, तुलना, पुढे काय होईल याची चिंता… आणि मग मन म्हणतं, “माझ्यासाठी सगळं इतकं कठीण का आहे? इतरांना सगळं सहज कसं जमतं?” पण इथेच आपल्या विचारांची दिशा बदलण्याची गरज असते. कारण प्रश्न कठीण आहे की आपण त्याच्याकडे कसं पाहतो, यावर आपल्या पुढच्या कृती ठरतात. आव्हानं आली की पहिला विचार असतो—“Why me?” पण एकदा स्वतःला विचारा, “Why not me?” जर ही परीक्षा माझ्यासमोर आली आहे, तर कदाचित माझ्यात ती पार करण्याची क्षमता निर्माण करण्याची हीच संधी आहे. जीवन नेहमी सोपा रस्ता देईलच असं नाही. काही रस्ते चढाचे असतात, काही वळणावळणाचे असतात; पण त्यावरून चालताना आपली ताकद वाढत जाते.


समजा तुमच्यासमोर दहावीचा किंवा बारावीचा मोठा अभ्यासक्रम आहे. मन म्हणतं, “इतकं सगळं कसं होणार?” इथेच प्रॉब्लेम माईंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट यांच्यात फरक पडतो. प्रॉब्लेम माईंडसेट म्हणतो, “हे माझ्याकडून होणार नाही.” ग्रोेथ माईंडसेट विचारतो, “हे माझ्याकडून होण्यासाठी मला काय शिकायला हवं?” पहिला विचार आपल्याला थांबवतो; दुसरा विचार आपल्याला पुढे नेतो. मानसशास्त्रात याला cognitive reframing म्हणजेच परिस्थितीकडे पाहण्याची चौकट बदलणे असं म्हणता येईल. परिस्थिती लगेच बदलत नाही; पण त्या परिस्थितीबद्दलचा आपला अर्थ बदलला की, आपली भावना आणि कृती बदलू शकतात. “माझ्यावर अभ्यासाचा खूप ताण आहे” या विचाराऐवजी “आज मी त्यातील एक भाग पूर्ण करतो” असा विचार केला, तर मोठी समस्या छोट्या कृतींमध्ये विभागली जाते. आणि एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा - “मी या आव्हानाला तोंड देण्यासाठी माझे मजबूत हात, शांत आणि विचार करणारा मेंदू आणि पुढे चालणारे पाय वापरणार आहे का?” हात म्हणजे मेहनत करण्याची तयारी, मेंदू म्हणजे योग्य नियोजन आणि विचार करण्याची क्षमता, आणि पाय म्हणजे थांबून न जाता पुढे जाण्याची कृती. फक्त “मला जमायला हवं” म्हणणं पुरेसं नाही; जमवण्यासाठी रोज काहीतरी करणं महत्त्वाचं आहे.


परीक्षेच्या काळात स्वतःशी बोलण्याची पद्धतही बदला. “माझे मार्क्स कमी आहेत” ऐवजी, “माझे मार्क्स सध्या कमी आहेत; पण ते सुधारण्यासाठी मी काय करू शकतो?” “मला गणित जमत नाही” ऐवजी, “गणितातील हा भाग मला अजून समजलेला नाही.” या दोन वाक्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. पहिलं वाक्य स्वतःवर शिक्का मारतं; दुसरं वाक्य सुधारण्याची शक्यता उघडतं. दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे फक्त पुस्तकातील ज्ञानाची परीक्षा नाही. ती स्वतःला व्यवस्थित ठेवण्याची, वेळेचं नियोजन करण्याची, अडचणी आल्या तरी पुन्हा सुरुवात करण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचीही एक संधी आहे. त्यामुळे एखाद्या दिवशी कमी अभ्यास झाला, टेस्टमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले किंवा एखादा विषय कठीण वाटला, तर स्वतःला अपयशी घोषित करू नका. चूक म्हणजे शेवट नाही; ती पुढची स्ट्रॅटेजी बदलण्याची माहिती आहे. एक साधी सवय लावा. जेव्हा मनात “Why me?” येईल, तेव्हा तीन प्रश्न विचारा - “माझ्या हातात काय आहे?” “आता मी काय करू शकतो?” “पुढची छोटी पायरी कोणती?” कारण माईंडसेट म्हणजे सतत पॉझिटिव्ह राहणं नाही. “सगळं छान होईल” असं स्वतःला सांगत बसणं म्हणजे माईंडसेट नाही. कठीण आहे हे मान्य करूनही, “मी यावर काम करणार” असं ठरवणं म्हणजे मजबूत माईंड सेट.


तुम्हाला नेहमी सोपा मार्ग मिळेलच असं नाही. पण प्रत्येक कठीण रस्ता तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो - तुम्ही स्वतःला वाटतं त्यापेक्षा जास्त सक्षम आहात.  म्हणून पुढच्या वेळी अभ्यासाचा मोठा डोंगर समोर दिसला, तेव्हा “हे माझ्याच वाट्याला का?” असं म्हणत बसू नका. स्वतःला सांगा - “हो, हे कठीण आहे. पण मीही कमकुवत नाही. माझ्याकडे विचार करणारा मेंदू आहे, मेहनत करणारे हात आहेत आणि पुढे चालत राहण्याची ताकद आहे. मला संपूर्ण डोंगर आज चढायचा नाही…. मला फक्त आजची पुढची पायरी चढायची आहे.” हाच माइंड सेट दहावी-बारावीच्या परीक्षेला सामोरं जाण्याची खरी ताकद बनू शकते.

Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व

निर्माल्य

पूर्णिमा शिंदे सकाळ झाली. पहाटे-पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट कानावर येत होता. मात्र सुधाला सारी रात्र झोप लागली