निशा वर्तक
भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या बहुभाषिक देशात भाषेचा विषय अत्यंत संवेदनशील मानला जातो. विशेषतः जेव्हा एखादी भाषा ‘सक्तीने’ शिकवली जाते, तेव्हा अनेक प्रश्न उभे राहतात - त्या भाषेचं प्रेम वाढेल का? की उलट भाषाभेद आणि मनभेद? प्रत्येक व्यक्ती आपल्या मातृभाषेशी भावनिकदृष्ट्या जोडलेली असते. ती भाषा त्याच्या आयुष्याचे अनेक पैलू व्यापते - घरातील लहानसं बोलणं, पहिली कविता, पहिलं पुस्तक आणि भावनांचे सूक्ष्म रंग. त्यामुळेच कोणतीही दुसरी भाषा शिकवताना ती आदर आणि समजुतीने शिकवली गेली पाहिजे, नव्हे तर तिचं सौंदर्य उलगडून दाखवलं पाहिजे.
भारतात हिंदी ही राजभाषा आहे; परंतु ती राष्ट्रभाषा नाही. भारतीय संविधान, कलम ३४३ नुसार, देवनागरी लिपीतील हिंदी ही भारताची अधिकृत भाषा आहे; परंतु याचा अर्थ असा नाही की ती राष्ट्रभाषा आहे, असे राज्यघटनेचे अभ्यासक सांगतात. ही बाब अनेकदा गृहीत धरली जाते. हिंदीचा प्रचार-प्रसार सरकारी पातळीवर सतत चालतो, पण अलीकडे काही निर्णयांनी वादाच्या ठिणग्या पेटल्या. अलीकडील उदाहरण : २०२५ च्या सुरुवातीलाच केंद्र सरकारच्या एका समितीने ‘हिंदीला संपूर्ण देशात प्राथमिक शिक्षणाची भाषा बनवावी’ अशी शिफारस केली. तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये हिंदीला प्राधान्य देण्याच्या प्रस्तावांमुळे दक्षिण भारत, ईशान्य भारतातील भाषिक गटांत अस्वस्थता वाढली. तामिळनाडू, केरळ, कर्नाटकसारख्या राज्यांत ‘हिंदी सक्तीविरोधी’ आंदोलने उभारली गेली. सोशल मीडियावर #StopHindiImposition हा हॅशटॅग ट्रेंड झाला. या साऱ्याचा अर्थ असा नव्हता की लोकांना हिंदी नको आहे, तर त्यांच्या मातृभाषेच्या हक्कावर गदा येते आहे असं त्यांना वाटू लागलं.
सक्ती की प्रेम? : भाषा सक्तीने शिकवली की ती ‘ओझं’ वाटते, पण प्रेमाने शिकवली गेली की ‘संपत्ती’ वाटते. जर हिंदी भाषेचा प्रचार चित्रपट, गाणी, साहित्य, क्रीडा यांच्याद्वारे केला गेला, तर ती लोकं आपोआप आत्मसात करतात - हे बॉलिवूडने अनेक दशकांत दाखवून दिलं आहे. पण तीच भाषा जेव्हा “शिका किंवा पर्याय नाही” या दृष्टिकोनातून शिकवली जाते, तेव्हा ती दडपणाची भाषा होते.
भाषाभेद कसा निर्माण होतो? : जेव्हा एका भाषेला दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवले जाते किंवा तिचा आग्रह धरला जातो, तेव्हा इतर भाषिक लोक असुरक्षित वाटू लागतात. त्यांना आपली मातृभाषा, आपली संस्कृती धोक्यात आली आहे असं वाटू लागतं आणि अशा मानसिकतेतून निर्माण होतो ‘भाषाभेद’ - जो समाजाच्या ऐक्याला बाधा पोहोचवतो. भाषा श्रेष्ठ-हीनतेच्या दृष्टिकोनातून पाहिली गेली की, भाषाभेद सुरू होतो. मग ‘आपण मागे पडतोय’ ही भावना निर्माण होते. अशा वेळी एकोपा तुटतो आणि समाजात तणाव वाढतो. एक भाषा दुसऱ्यावर थोपवल्याने संवाद वाढत नाही, उलट संवाद तुटतो. भाषा शिकवताना सक्ती न करता तिचं सौंदर्य, उपयोग आणि व्यापकता दाखवून देणे आवश्यक आहे. शाळांमध्ये बहुभाषिकतेला प्रोत्साहन द्यावं, विविध भाषांमधील साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं. संवादाच्या माध्यमातून एकमेकांच्या भाषेचा सन्मान शिकवला पाहिजे. भाषासक्ती नको भाषाभक्ती असावी. भाषांचा विकास सहअस्तित्वातूनच होतो. एकमेकांच्या भाषेचा आदर ठेवत, प्रेमाने नवीन भाषा शिकणं हेच सामाजिक समतेचं आणि ऐक्याचं मूळ आहे. शाळांमध्ये पर्यायी भाषा शिकवताना सक्ती न करता विविध भाषांतील साहित्य, काव्य, चित्रपट यांचं प्रदर्शन करावं. बहुभाषिक संवाद शिबिरं घ्यावीत. हे मार्ग भाषाप्रेम वाढवतात, भाषाभेद नव्हे. भाषा ही मनाच्या गाभ्यातून शिकली जाते. सक्तीने ती केवळ तोंडी राहते. भारतासारख्या विविधतेच्या देशात, भाषा केवळ शिकवण्याची गोष्ट नाही - ती जपण्याची आणि सन्मानाने स्वीकारण्याची गोष्ट आहे. भाषा टिकते आदराने, वाढते प्रेमाने - आणि संपते सक्तीने.






