Tuesday, September 1, 2026

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावा अशाप्रकारची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे. जेणेकरून मंडळांना स्वच्छता, पाणी, रस्ते, कचरा, परवानग्या, विसर्जन आणि आपत्कालिन सुविधा आदींबाबत अधिकाऱ्यांशी मंडळांच्या प्रतिनिधींना त्वरीत संपर्क साधता येईल असे समन्वय समितीने स्पष्ट केले.

आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणेश आगमन मार्ग, मंडप परवानग्या, विसर्जन व्यवस्था, चौपाट्यांवरील सुविधा व सार्वजनिक गणेश मंडळांच्या सोयी सुविधांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांना पत्र दिले. या समन्वय समितीच्यावतीने गणेश आगमन मार्गाची पूर्वतपासणी व रस्ते दुरुस्ती, मंडप परवानगी प्रक्रिया वेळबध्दता व सुलभ करणे, गिरगाव,दादर व अन्य विसर्जन स्थळांवर पुरेशा सुविधा, मोठ्या मंडळांच्या दर्शन रांगांसाठी मोबाईल टॉयलेट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विसर्जनासाठी क्रेन, सुरक्षा, वैद्यकीय व स्वच्छता व्यवस्था, निर्माल्य व कचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र यंत्रणा, मोठ्या मंडळांसाठी महापालिकेचा समन्वय अधिकारी नेमणे, सर्व संबंधित विभागांचा एकत्रितत कार्यप्रणाली बनवणे, महापालिका व पोलिस तसेच गणेश मंडळांची पूर्वनियोजित समन्वय बैठक तसेच प्रत्येक महत्वाच्या कामासाठी जबाबदार अधिकारी व निश्चित कालमर्यादा आदी प्रमुख मागणींचा विचार करून आगामी गणेशोत्सवापूर्वी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात यावे अशी मागणी समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी केली आहे.

गणेश दर्शन रांगासाठी सुविधा देण्यासाठी मुंबईतील काही प्रमुख गणेश मंडळांकडे भाविकांना अर्धा तास ते एक तास किंवा त्याहून अधिक काळ रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे महापालिकेने मंडळांशी समन्वय साधून मोबाईल टॉयलेट, पिण्याचे पाणी, सावली तथा तात्पुरते शेल्टर, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, महिला व बालकांसाठी आवश्य सुविधा तसेच प्राथमिक उपचार केंद्र आदींची व्यवस्था करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात अशाप्रकारची सूचनाही केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >