Monday, August 31, 2026

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून 'मुंबई बँक' जिंकण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून 'मुंबई बँक' जिंकण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे

- वर्ष अखेरीस निवडणूक; प्रवीण दरेकर आणि संजय घाडी हे मित्र येणार आमनेसामने

मुंबई (सुहास शेलार) : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता आपला मोर्चा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबई बँक) निवडणुकीकडे वळवला आहे. येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या या निवडणुकीत विजय मिळवण्याची जबाबदारी शिंदे यांनी मुंबई पालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांच्याकडे सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच एक बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला असून, यामुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या मुंबई बँकेच्या मैदानात भाजप आणि शिवसेनेत सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (Eknath Shinde)

सध्या मुंबई बँकेवर भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांचे एकहाती वर्चस्व असून, २०१७ आणि २०२१ च्या निवडणुकीत त्यांच्या 'सहकार पॅनेल'ने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून विक्रम नोंदवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण दरेकर आणि त्यांचे खंदे समर्थक आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली ही बँक कार्यरत आहे. मात्र, महायुतीमध्ये एकत्र असतानाही सहकार क्षेत्रात शिवसेने स्वतंत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ज्या संजय घाडी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ते आणि प्रवीण दरेकर हे दोघेही शालेय जीवनप्रवास मित्र असल्याने या निवडणुकीतील राजकीय चुरस अधिकच वाढणार आहे. (Eknath Shinde)

रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग नियमन कायद्यातील सुधारित नियमांनुसार, कोणतीही व्यक्ती कोणत्याही सहकारी बँकेत सलग १० वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक पदावर राहू शकत नाही. जर एखाद्या संचालकाने सलग दोन टर्म म्हणजेच १० वर्षे पूर्ण केली असतील, तर त्याला पुढील निवडणूक लढवण्यापूर्वी ३ वर्षांचा सक्तीचा 'कूलिंग-ऑफ' कालावधी पूर्ण करावा लागतो. या नियमांमुळे विद्यमान संचालक मंडळातील अनेक चेहऱ्यांना आगामी निवडणुकीस मुकावे लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रकाश दरेकर आणि तेजस्वी घोसाळकर वगळता उर्वरित बहुतांश संचालकांच्या दोन टर्म पूर्ण होत असल्याने या नियमाचा तिढा कसा सुटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Eknath Shinde)

मुंबई बँक का महत्त्वाची?

राजकीय प्रभावाच्या दृष्टीने मुंबई सहकार क्षेत्रात मुंबई बँकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुंबईतील हजारो सहकारी गृहनिर्माण संस्थांना विशेषतः सेल्फ-रिडेव्हलपमेंट (स्वयं-पुनर्विकास) प्रकल्पांसाठी या बँकेकडून आर्थिक मदत व कर्जे पुरवली जातात. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन आणि सार्वजनिक संस्थांच्या ठेवी हाताळल्यामुळे बँकेचे वर्किंग कॅपिटल तब्बल १० हजार २८२ कोटी रुपयांहून अधिक आहे. दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचे कर्जवाटप करणाऱ्या या संस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता शिवसेनेने कंबर कसली असून, महायुतीमधील हा अंतर्गत सामना आगामी काळात तापण्याची चिन्हे आहेत. (Eknath Shinde)

मुंबई बँकेचे विद्यमान संचालक मंडळ

प्रवीण दरेकर (अध्यक्ष) सिद्धार्थ कांबळे (उपाध्यक्ष) संदीप घनदाट (संचालक) प्रसाद लाड (संचालक) शिवाजीराव नलावडे (संचालक) विठ्ठल भोसले (संचालक) पुरुषोत्तम दळवी (संचालक) तेजस्वी घोसाळकर (संचालक) सुनील राऊत (संचालक) आनंदराव गोळे (संचालक) प्रकाश दरेकर (संचालक) विष्णू घुमरे (संचालक) जयश्री पांचाळ (संचालक) नंदकुमार काटकर (संचालक) जिजाबा पवार (संचालक) सोनदेव पाटील (संचालक) कविता देशमुख (संचालक) शिल्पा सरपोतदार (संचालक) विनोद बोरसे (संचालक) नितीन बनकर (संचालक) अनिल गजरे (संचालक)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा