Tuesday, September 1, 2026

FDA Action Navi Mumbai : नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाकडून ७६ लाखांचा माल जप्त

FDA Action Navi Mumbai : नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाकडून ७६ लाखांचा माल जप्त

नवी मुंबई : मुदत संपलेले (Expired) खाद्यपदार्थ फेकून न देता, त्यांच्यावर नवीन तारखा छापून ते बाजारात विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आणि नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. तुर्भे परिसरातील एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात तब्बल ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नामांकित कंपन्यांच्या स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक्सचा साठा

या कारवाईत दररोजच्या वापरातील अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थांचा साठा सापडला आहे. यात नामांकित कंपन्यांचे वेफर्स, पोटॅटो चिप्स, नूडल्स, सूप, मायोनिज (Mayonnaise) चे पॅकेट्स आणि नामांकित ब्रँड्सच्या शीतपेयांच्या (Aerated Drinks) कॅन्सचा समावेश आहे. हा सर्व माल ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळणारा होता.

अशी केली जायची फसवणूक

कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना या ठिकाणी अतिशय धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील मूळ उत्पादन तारीख (Manufacturing Date) आणि मुदत संपण्याची तारीख (Expiry Date) केमिकलच्या साहाय्याने पुसून टाकली जायची. त्यानंतर त्यावर नवीन तारखा छापून किंवा मूळ माहितीवर नवीन स्टिकर्स लावून मुदत संपलेला माल पुन्हा बाजारात विक्रीसाठी तयार केला जात होता.

५ दिवसांची संयुक्त कारवाई आणि तुर्भेतील गोदाम

एफडीए (FDA) आणि नवी मुंबई गुन्हे शाखेने २४ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या काळात ही संयुक्त मोहीम राबवली. तुर्भे येथील 'मेसर्स साधना एंटरप्रायझेस' (M/s Sadhna Enterprises) या ठिकाणी हा बेकायदेशीर धंदा सुरू होता. मुंबई, नवी दिल्ली आणि नोएडा येथील सुमारे १० प्रमुख निर्यातदार कंपन्यांशी संबंधित उत्पादनांचे लेबल्स बदलण्याचे आणि रिपॅकिंगचे काम येथे चालू होते. या छाप्यात प्रशासनाने ७५ लाख २१ हजार २६९ रुपये किमतीचे ४,९४२ कार्टन्स (खोके) जप्त केले आहेत. याशिवाय, १ लाख ३० हजार ६०० रुपयांचा विनालेबलाचा आणि मुदत संपलेला मालही हस्तगत केला आहे. आवश्यक एफएसएसएआय (FSSAI) परवाना आणि खरेदीची बिले नसल्यामुळे काही उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच या पेढीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल आणि कडक कारवाईचा इशारा

या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात साधना एंटरप्रायझेसचे भागीदार आणि त्यांच्याशी संबंधित निर्यातदारांविरुद्ध 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा' तसेच 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या विविध कलमांनुसार एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, "महाराष्ट्रात खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कडक आहे. सर्वसामान्यांच्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. मुदत संपलेले किंवा बनावट अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरूच राहील."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >