एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) आपल्या केबिन क्रू आणि विमानतळावरील फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी एक नवा आणि अत्यंत आकर्षक गणवेश लागू केला आहे. १ सप्टेंबरपासून जगभरातील सर्व उड्डाणांवर वापरण्यात येणाऱ्या या गणवेशात भारताच्या पाच प्रमुख राज्यांतील पारंपरिक वस्त्रकलेची सुरेख झलक पाहायला मिळत आहे. 'टेल्स ऑफ इंडिया' या उपक्रमाचा विस्तार करत कंपनीने तामिळनाडूचे 'कांजीवरम', हिमाचल प्रदेशचे 'पट्टू', गुजरातची 'पटोला', आसामचा 'गामोसा' आणि मध्य प्रदेशची 'बाग' प्रिंट या प्रसिद्ध हस्तकलांचा समावेश कर्मचाऱ्यांच्या कपड्यांमध्ये केला आहे.
पाकिस्तान : पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या २४ तासांत घडलेल्या घटनांनी क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान ...
हा नवा गणवेश भारतीय परंपरा आणि आधुनिक कॉर्पोरेट लुक यांचा उत्तम मेळ आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी पारंपरिक कुर्तीला आधुनिक स्वरूप देत त्यावर टेलर्ड जॅकेट, स्कार्फ आणि पॉकेट स्क्वेअरची जोड देण्यात आली आहे. एअरलाइनची मूळ ओळख जपण्यासाठी या गणवेशात 'एक्सप्रेस ब्लू' या मुख्य रंगासोबत 'एक्सप्रेस ऑरेंज' रंगाची आकर्षक डिझाइन वापरण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांचे कपडे कंपनीच्या इन-हाउस डिझायनर पूजा कृष्णन यांनी डिझाइन केले आहेत, तर पुरुषांचा गणवेश 'ट्रेंट लिमिटेड' या प्रसिद्ध रिटेल ब्रँडच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.
विमानतळ आणि विमानातील कर्मचाऱ्यांची धावपळ आणि वेगवेगळ्या हवामानाचा विचार करून हा गणवेश विशेष 'बनाना क्रेप फॅब्रिक' (केळीच्या धाग्यांपासून बनवलेले कापड) वापरून तयार करण्यात आला आहे. हे कापड अत्यंत हलके, मजबूत, लवचिक आणि शरीराला हवा खेळती ठेवणारे असल्याने कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ काम करताना आराम मिळतो. एअर इंडिया ग्रुपचे मार्केटिंग प्रमुख सुनील सुरेश यांच्या मते, हा नवा गणवेश कर्मचाऱ्यांमधील सकारात्मक ऊर्जा, व्यावसायिकता आणि प्रवाशांप्रती असलेली आपुलकी दर्शवतो. तसेच, कंपनीने गेल्या काही वर्षांत घडवून आणलेल्या महत्त्वपूर्ण बदलांचे आणि विकासाचे हे एक सुंदर प्रतीक आहे.






