Tuesday, September 1, 2026

Bhuleshwarcha Raja 2026 : भुलेश्वरच्या राजाचा यंदा मोठा निर्णय; दुर्घटनेनंतर उंच गणेशमूर्तीऐवजी बसवणार छोटी पूजेची मूर्ती

Bhuleshwarcha Raja 2026 : भुलेश्वरच्या राजाचा यंदा मोठा निर्णय; दुर्घटनेनंतर उंच गणेशमूर्तीऐवजी बसवणार छोटी पूजेची मूर्ती

मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात २२ ऑगस्ट रोजी गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान २२ फूट उंच मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर भुलेश्वरचा राजा मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यंदा मंडळात उंच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता केवळ लहान पूजेची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. ही मूर्ती ११ दिवस मंडळात ठेवण्यात येणार असून, तिचे आगमन आणि विसर्जनही साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Bhuleshwarcha Raja 2026)

भुलेश्वरचा राजा मंडळाचे यंदाचे ६३वे वर्ष आहे. दरवर्षी मंडळाकडून साधारण २० ते २३ फूट उंचीच्या भव्य गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाही २२ फूट उंचीची आकर्षक मूर्ती तयार करण्यात आली होती. मात्र आगमन मिरवणुकीदरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर मंडळाने यंदा उंच मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. (Bhuleshwarcha Raja 2026)

दुर्घटनेत मंडळाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू :

२२ ऑगस्ट रोजी भुलेश्वरच्या राजाची गणेशमूर्ती भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेने आगमन मिरवणुकीत आणली जात होती. मंडळाच्या मंडपापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर असताना मूर्तीचा अचानक तोल गेला आणि ती कोसळली. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे (३३) आणि पदाधिकारी ब्रिजेश हेमंत जोशी (३०) यांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये ५ आणि ७ वर्षांच्या दोन मुलींचाही समावेश होता. (Bhuleshwarcha Raja 2026)

वेल्डिंग तुटल्याने मूर्तीचा तोल गेल्याची माहिती :

या दुर्घटनेच्या तपासादरम्यान मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यांच्या जबाबातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यातून बाहेर काढल्यानंतर अवघ्या १५० मीटर अंतरावर मूर्तीच्या पाठीमागील वेल्डिंग तुटल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मूर्ती पुन्हा कारखान्यात आणून तिची दुरुस्ती करण्यात आली. वेल्डिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्ती पुन्हा आगमन मिरवणुकीसाठी नेली. (Bhuleshwarcha Raja 2026)

दरम्यान, वेल्डिंग तुटल्यामुळे मूर्तीचा तोल जाऊन ती कोसळल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. दुर्घटनेत गमावलेल्या सहकाऱ्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहत यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Bhuleshwarcha Raja 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >