Wednesday, September 2, 2026

Mangal Prabhat Lodha : इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी होणार रवाना

Mangal Prabhat Lodha : इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी होणार रवाना

• कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांशी संवाद

मुंबई : इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील १०३ बांधकाम कामगारांपैकी ६० जणांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर रोजी रवाना होत आहे.आगामी कालावधीत टप्प्याटप्याने कामगार रवाना होतील. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा. भारतीय संस्कृतीचा आदर राखत शिस्त, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकता जपावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासात हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 'महाराष्ट्राची कौशल्यशक्ती आता जगभर' या कार्यक्रमांतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या व ३ सप्टेंबर रोजी रवाना होणाऱ्या महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांशी कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी संवाद साधला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि एनएसडीसी इंटरनॅशनल यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यावेळी मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त अमित सैनी, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे अवर सचिव चंद्रहंस राठोड, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि एनएसडीसी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सिंन्हा, चंद्रहास राठोड, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळाचे संचालक योगेश पाटील, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेच्या पूर्ततेत कौशल्य विकास क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. “या उपक्रमात ‘मित्रा’ संस्थेने नावाप्रमाणेच कामातूनही युवकांचा खरा मित्र म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. इस्रायलमध्ये युवकांना दरमहा सुमारे दोन लाख रुपये वेतन, वैद्यकीय सुविधा तसेच शासकीय स्तरावरील सुरक्षित रोजगाराची हमी मिळणार आहे. आयटीआयमधील प्रशिक्षणासोबतच इस्रायलमधील रोजगारासाठी आवश्यक विशेष प्रशिक्षणही राज्य शासनाने दिल्यामुळे हे युवक रोजगारासाठी पूर्णपणे सक्षम झाले आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत येत्या २९ सप्टेंबर रोजी राज्यभरातील एक हजार ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या सर्व युवकांना मंत्री लोढा यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तरुणांना उद्योगाभिमुख कौशल्ये दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी - केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील १०३ बांधकाम कामगारांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर रोजी रवाना होत आहे याबद्दल अभिनंदन केले. इस्रायलमध्ये कुशल बांधकाम कामगारांची मोठी मागणी असून त्यांनी आपल्या तरुणांसाठी नवे मार्ग खुले केले आहेत. एनएसडीसी, इस्रायलचे लोकसंख्या आणि स्थलांतर प्राधिकरण आणि विविध राज्य शासनांच्या सहकार्याने आतापर्यंत ६,७०० हून अधिक भारतीय कामगार यशस्वीरित्या तेथे पाठवण्यात आले आहेत. आपल्या तरुणांना उद्योगाभिमुख कौशल्ये देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत व्यक्त केले. महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध

महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत व इस्रायल सरकारच्या समन्वयाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत बांधकाम क्षेत्रातील गिलावा काम (प्लास्टरिंग), सिरेमिक फरशी बसविणे (सिरेमिक टायलिंग), इमारतींचे सांगाडे/फ्रेमवर्क तयार करणे आणि लोखंड वाकविणे (आयर्न बेंडिंग) या चार व्यवसायांतील कामगारांची निवड करण्यात आली आहे.या उपक्रमासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत सुमारे ४ लाख कामगारांची छाननी करण्यात आली. १२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून खुल्या कॅम्पस भरतीद्वारे उमेदवारांपर्यंत पोहोचण्यात आले. तसेच ३ लाखांहून अधिक कामगारांशी दूरध्वनी व लघुसंदेश द्वारे संपर्क साधण्यात आला. त्यानंतर ९९७ उमेदवार निवडले गेले. वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी आणि इस्रायली नाव पडताळणी प्रक्रियेनंतर ७८३ उमेदवारांना अंतिम मान्यता मिळाली. या उमेदवारांचे टप्प्याटप्प्याने इस्रायलमध्ये रोजगारासाठी प्रस्थान नियोजित आहे. इस्रायली प्रशिक्षक यांनी २२ ते २५ जुलै २०२६ दरम्यान प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. त्यानंतर १०३ उमेदवारांनी इस्रायली मानकांनुसार रिफ्रेशर प्रशिक्षण पूर्ण केले. १०३ कामगारांपैकी ६० कामगारांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईहून इस्रायलकरिता रवाना होणार आहे. सदर कामगार तेल अवीव येथे काम करणार आहेत. यावेळी बांधकाम कामगारांना त्यांच्या प्रस्थानपूर्व मार्गदर्शन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रवासाची कागदपत्रे, आवश्यक माहिती तसेच व्हिसा व विमान तिकिटांचे वितरण करण्यात आले.

मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त अमित सैनी, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >