Jailer 2 release date : ‘जेलर २’ चित्रपट १५ ऑक्टोबरलाच होणार रिलीज; पुढे ढकलण्याच्या अफवांवर निर्मात्यांचा पूर्णविराम
September 2, 2026 04:15 PM
सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांच्या बहुप्रतिक्षीत ‘जेलर २’ (Jailer 2) या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध अफवा पसरल्या होत्या. चित्रपटाचे काही भाग पुन्हा शूट केले जात असल्यामुळे प्रदर्शन लांबणीवर पडणार असे म्हटले जात होते. मात्र, बुधवारी निर्माती संस्था ‘सन पिक्चर्स’ने (Sun Pictures) या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर एक नवे पोस्टर शेअर करत, चित्रपट ठरलेल्या वेळेतच म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या संयुक्त मोजणीला अवधान परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. आज रोजी प्रशासनाचे ...
नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा चित्रपट २०२३ मधील ब्लॉकबस्टर 'जेलर'चा सिक्वल आहे. या भागात रजनीकांत आणि रम्या कृष्णन पुन्हा एकदा 'टायगर मुथुवेल पांडियन' आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत योगी बाबू, मिरना आणि ऋत्विक हे कलाकारही जुन्या भूमिकांमध्ये परतणार आहेत. जुलै महिन्यात रिलीज झालेल्या धमाकेदार टीझरने आणि ऑगस्ट महिन्यात अनिरुद्ध रविचंदरच्या 'अला बोलेलो' या गाण्याने आधीच प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे.
'जेलर २' मधील कलाकारांची स्टारकास्ट अत्यंत तगडी असणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच मोहनलाल, शिव राजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांचे खास कॅमिओ दुसऱ्या भागातही पाहायला मिळतील. याशिवाय एस. जे. सुर्या, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन, सुराज वेंजरामुडू, ॲना राजन आणि जतीन सरना हे नवे चेहरे यात जोडले गेले आहेत. हृतिक रोशन आणि विजय सेथुपती यांच्याही खास भूमिका असण्याची चर्चा असल्याने दसऱ्याच्या वीकेंडला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रेकॉर्ड रचण्याची शक्यता आहे.