Wednesday, September 2, 2026

Abhinandan Varthaman : पाकिस्तानी F-16 पाडणारे अभिनंदन वर्धमान आता नव्या भूमिकेत; भारतीय हवाई दलानंतर खासगी एअरलाइनमध्ये पायलट

Abhinandan Varthaman : पाकिस्तानी F-16 पाडणारे अभिनंदन वर्धमान आता नव्या भूमिकेत; भारतीय हवाई दलानंतर खासगी एअरलाइनमध्ये पायलट

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि वीर चक्र विजेते अभिनंदन वर्धमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 2019 मध्ये पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानाला लक्ष्य केल्यानंतर जगभरात त्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात गेलेल्या अभिनंदन यांची काही दिवसांनी सुटका करण्यात आली होती. आता त्यांनी भारतीय हवाई दलातील सेवेनंतर आपल्या कारकिर्दीला नवी दिशा दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनंदन वर्धमान हे गोवास्थित खासगी एअरलाइन FLY91 मध्ये व्यावसायिक पायलट म्हणून रुजू झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांनी एअरलाइनमध्ये प्रवेश केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सध्या ते व्यावसायिक एअरलाइन पायलट म्हणून प्रशिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

मात्र, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीचा हवाला देत FLY91 च्या प्रवक्त्यांनी अभिनंदन वर्धमान यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

2019 मध्ये पाकिस्तानला दिले होते प्रत्युत्तर

फेब्रुवारी 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई संघर्ष झाला होता. त्यावेळी अभिनंदन वर्धमान हे भारतीय हवाई दलात विंग कमांडर म्हणून कार्यरत होते.

पाकिस्तानी लढाऊ विमानांचा गट नियंत्रण रेषेच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अभिनंदन यांना त्यांचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर झालेल्या हवाई संघर्षात त्यांनी पाकिस्तानचे F-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा आहे. मात्र, या कारवाईदरम्यान त्यांचे MiG-21 Bison विमानही लक्ष्य झाले आणि त्यांना शत्रूच्या हद्दीत इजेक्ट करावे लागले. त्यानंतर ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते.

सुमारे तीन दिवसांनंतर पाकिस्तानने त्यांना भारताकडे सोपवले.

2021 मध्ये वीर चक्राने सन्मान

अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 2021 मध्ये वीर चक्र प्रदान केले. हा भारताचा तिसरा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार आहे. हवाई संघर्षादरम्यान कर्तव्याप्रती दाखवलेल्या असामान्य धैर्य आणि निष्ठेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

FLY91 एअरलाइनची सुरुवात कधी झाली?

गोवास्थित FLY91 या खासगी एअरलाइनने मार्च 2024 मध्ये व्यावसायिक सेवा सुरू केली. सध्या या एअरलाइनच्या ताफ्यात ATR 72-600 प्रकारची 6 विमाने असल्याची माहिती आहे. गोवा आणि हैदराबाद येथे कंपनीचे दोन ऑपरेशनल बेस आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >