Thursday, September 3, 2026

Cyber Crime : IPS अधिकाऱ्याच्या नावाने बनावट Facebook अकाउंट; १७ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून २ लाखांची रोकड जप्त

Cyber Crime : IPS अधिकाऱ्याच्या नावाने बनावट Facebook अकाउंट; १७ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून २ लाखांची रोकड जप्त

बंगळूर : पोलीस उपआयुक्त (इलेक्ट्रॉनिक सिटी विभाग) नारायण एम. यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून बंगळूर पोलिसांनी राजस्थानमधील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या बनावट खात्याच्या माध्यमातून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप असून, हा अल्पवयीन मुलगा एका मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा भाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Cyber Crime)

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या साथीदारांसोबत मिळून देशभरातील अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाती तयार केली होती. या खात्यांचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांची बतावणी केली जात होती आणि नागरिकांना विविध कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे मागितले जात होते. (Cyber Crime)

राजस्थानमधून चालत होते रॅकेट

इलेक्ट्रॉनिक सिटी विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट राजस्थानमधील कोटकुर्ड गावातून चालवले जात असल्याचा संशय आहे. चौकशीदरम्यान अल्पवयीन आरोपीने काही साथीदारांच्या मदतीने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी नियमानुसार त्याच्या पालकांना नोटीस बजावली. त्यानंतर त्याला देवनहल्ली येथील रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपास पथके तैनात आहेत. (Cyber Crime)

‘CRPF कमांडंट मित्र आहे’ सांगून नागरिकांना गंडा

डीसीपी नारायण एम. यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट फेसबुक खात्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर या फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश झाला. आरोपीने नागरिकांना एक वेगळीच कहाणी सांगत फसवणूक केली. त्याचा मित्र सीआरपीएफमध्ये कमांडंट असून त्याची दुसऱ्या ठिकाणी बदली झाली आहे. त्यामुळे त्याच्याकडील फर्निचर आणि घरातील वस्तू कमी किमतीत विकल्या जात आहेत, असा दावा आरोपीकडून करण्यात येत होता. या आमिषाला बळी पडलेल्या नागरिकांकडून आरोपीने पैसे घेतले; मात्र त्यानंतर त्यांना वस्तू न देता फसवणूक केल्याचा आरोप आहे. (Cyber Crime)

तांत्रिक पुराव्यांच्या आधारे राजस्थानमधून ताब्यात

फसवणुकीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासातून आरोपी राजस्थानमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून २ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा एक भाग असल्याचा संशय आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून, त्यांच्या भूमिकेचा तपास सुरू आहे. बनावट सोशल मीडिया खात्यांच्या माध्यमातून अशाप्रकारे आणखी किती नागरिकांची फसवणूक करण्यात आली, याचाही तपास पोलीस करत आहेत. (Cyber Crime)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >