Thursday, September 3, 2026

Shivendrasinhraje Bhosale : गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक नियोजन; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendrasinhraje Bhosale : गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक नियोजन; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - शिवेंद्रसिंहराजे भोसले

रायगड : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि कोंडीमुक्त राहावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. (Shivendrasinhraje Bhosale)

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांचा तसेच वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी महामार्गावरील सद्यस्थिती, सुरू असलेली कामे, वाहतूक नियोजन, सुरक्षितता तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. (Shivendrasinhraje Bhosale)

नागोठणे उड्डाणपुलावरील वाहतुकीचे नियमित निरीक्षण करा

गणेशोत्सव काळात नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. (Shivendrasinhraje Bhosale)

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत नागोठणे उड्डाणपुलावरील वाहतुकीचे नियमित निरीक्षण करावे. प्रत्यक्ष परिस्थितीनुसार आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना कराव्यात आणि या कालावधीतील वाहतूक व्यवस्थापनाचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Shivendrasinhraje Bhosale)

माणगाव व इंदापूर बायपासची कामे मुदतीत पूर्ण करा

पनवेल ते इंदापूर तसेच इंदापूर ते झाराप या मार्गावरील कामांचा आढावा घेताना माणगाव आणि इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

महामार्गाच्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता उत्तम राहावी, यासाठी प्रत्येक टप्प्यावर आवश्यक देखरेख ठेवावी. कामांमुळे नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही आणि वाहतुकीवर विपरीत परिणाम होणार नाही, यासाठी योग्य वाहतूक नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. (Shivendrasinhraje Bhosale)

महामार्गावर सुविधा केंद्रे उभारून प्रवाशांना आवश्यक सुविधा द्या

गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि वाहनांची ये-जा होणार आहे. त्यामुळे आवश्यक ठिकाणे निश्चित करून तेथे तात्पुरती सुविधा केंद्रे उभारावीत, अशा सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. या सुविधा केंद्रांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, वैद्यकीय मदत यांसह प्रवाशांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेशा प्रमाणात चलत स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (Shivendrasinhraje Bhosale)

पर्यायी मार्गांची चाचपणी करून अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवा

गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतुकीचा भार वाढल्यास वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संभाव्य पर्यायी मार्गांची चाचपणी करावी. आवश्यकतेनुसार अंतर्गत रस्त्यांचा वापर करता यावा, यासाठी त्यांची दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवावेत. गणेशोत्सवाच्या काळात ऐनवेळी कोणतीही गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक सर्व कामे आणि उपाययोजना आधीच पूर्ण कराव्यात, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.

टोलमाफीसाठी केंद्रीय मंत्र्यांशी थेट संपर्क

गणेशोत्सव काळात कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीचा विचार करून महामार्गावरील टोलमाफीच्या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट संपर्क साधून आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात वाहतूक, रस्ते, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Shivendrasinhraje Bhosale)

या बैठकीस रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सचिव (रस्ते) शरद राजभोज, सचिव (राष्ट्रीय महामार्ग) शेलार, मुख्य अभियंता राजाराम गोसावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. (Shivendrasinhraje Bhosale)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >