Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरातून अनैतिक व्यवसायाविरोधातील मोठी कारवाई समोर आली आहे. एमआयडीसी परिसरातील गजानन कॉलनीमध्ये एका घरातच कुंटणखाना चालवून तीन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली असून, कुंटणखाना चालवल्याच्या आरोपावरून एका ५६ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. रजनी प्रभाकर डहाळे (वय ५६)असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC police station) संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. (Ahilyanagar Crime News)
बनावट ग्राहक अन् सापळा उघड
प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत होते.बुधवारी पोलिसांना गजानन कॉलनी परिसरातील एका घरात महिलांच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई न करता प्रथम या माहितीची खातरजमा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पंचांच्या उपस्थितीत पोलिसांच्या पथकातील एका कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून संबंधित घरात पाठवण्यात आले. तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित घरावर छापा टाकला.(Ahilyanagar Crime News)
Ahilyanagar News : गरिब आणि गरजू नागरिकांना अवघ्या १० रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणाऱ्या शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) योजनेबाबत अहिल्यानगर येथून मोठी दिलासादायक ...
तीन महिलांची सुटका, ५६ वर्षीय महिला ताब्यात
पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईदरम्यान रजनी डहाळे हिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिच्या घराची झडती घेतली असता तेथे तीन महिला आढळून आल्या. पोलिसांनी या महिलांची चौकशी केली असता त्यांनी रजनी डहाळे हिने आपल्याला वेश्याव्यवसायासाठी आणल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर त्यातील काही रक्कम संबंधित महिलांना देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचेही चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली असून, त्यांना पुढील प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेकडे सोपवण्यात आले आहे. तर या प्रकरणातील मुख्य संशयित रजनी डहाळे हिला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahilyanagar Crime News)
एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरु
दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः निवासी भागातील घरांचा वापर अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायासाठी केला जात असल्यास त्यावर लक्ष ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सुरू आहे. या व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच संबंधित महिलांना या ठिकाणी कशा प्रकारे आणण्यात आले होते, याबाबतही तपास केला जात आहे.





