Friday, September 4, 2026

Goregaon BEST Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली बेस्ट बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

Goregaon BEST Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली बेस्ट बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो स्थानकाच्या (Goregoan Metro Station) अगदी खाली उभ्या असलेल्या एका बेस्ट बसला अचानक आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या ज्वालांमध्ये जळून खाक झाली. या आगीतून निघणाऱ्या धुराचे प्रचंड लोट थेट वरच्या मेट्रो स्थानकात घुसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि परिसरात मोठा गोंधळ उडाला.

मेट्रो स्थानकात धुराचे साम्राज्य; प्रवाशांची जिवाच्या आकांताने पळापळ

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

ही दुर्घटना मेट्रो मार्गिका ७ वरील 'ओबेरॉय गार्डन सिटी' स्थानकाजवळ घडली. बसला लागलेल्या भीषण आगीमुळे निर्माण झालेला दाट धूर वेगाने थेट मेट्रो स्थानकात आणि प्लॅटफॉर्मवर पसरला. स्थानकात धूर साचल्याने प्रवाशांना श्वास घेणे कठीण झाले होते. गुदमरणाऱ्या धुरामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्थानकातून बाहेरच्या दिशेने धाव घेतली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मेट्रो स्थानकात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

सुरक्षेचा उपाय म्हणून २ स्थानकांवर मेट्रोचा थांबा रद्द

घटना घडताच सुरक्षेचा उपाय म्हणून मेट्रो प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवली. मेट्रो लाईन ७ वरील वाहतूक सुरू ठेवण्यात आली असली, तरी स्थानकातील धूर पूर्णपणे ओसरेपर्यंत खबरदारी म्हणून दोन महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवर मेट्रो गाड्यांना थांबा न देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अग्निशमन दल घटनास्थळी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

आगीची बातमी मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, पश्चिम द्रुतगती महामार्गासारख्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर ही दुर्घटना घडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहने रोखून धरण्यात आली. परिणामी महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रचंड वाहतूक कोंडी झाली. स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >