Saturday, September 5, 2026

Mumbai ANC Raid : मुंबईत 'ANC'ची मोठी कारवाई : कांदिवली युनिटकडून ६४ लाखांहून अधिक किमतीचे हेरॉईन हस्तगत, दोघांना अटक

Mumbai ANC Raid : मुंबईत 'ANC'ची मोठी कारवाई : कांदिवली युनिटकडून ६४ लाखांहून अधिक किमतीचे हेरॉईन हस्तगत, दोघांना अटक

मुंबई : मुंबईत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (Anti-Narcotics Cell) कांदिवली युनिटने वर्सोवा परिसरात एक धडक कारवाई करत अंमली पदार्थांची मोठी खेप हस्तगत केली आहे. या गुप्त कारवाईदरम्यान पोलिसांनी ६४ लाख ६० हजार रुपये किमतीचे तब्बल ३२३ ग्रॅम उच्च दर्जाचे 'हेरॉईन' जप्त केले आहे.

मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे कांदिवली युनिटच्या पथकाने वर्सोवा भागात सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना रंगेहाथ पकडले असून त्यांच्या ताब्यातून हे बेकायदेशीर हेरॉईन हस्तगत करण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेले हेरॉईन मुंबईत कोणाकडून आणले गेले होते आणि ते पुढे कोणाला विकले जाणार होते, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. या गुन्ह्यामागे एखादी मोठी आंतरराज्यीय अथवा स्थानिक अमली पदार्थ तस्करांची साखळी कार्यरत आहे का, यादृष्टीने कांदिवली युनिटचे पथक पुढील तपास करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >